ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

साप्ताहिक राशि फल - 21-04-2019 - 27-04-2019

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साप्ताहिक  राशि फल - 21-04-2019 - 27-04-2019

शहर : मुंबई

 

 

मेष

आठवडयाच्या सुरवातीस आपणास कामात काहीसा थकवा व कंटाळा जाणवेल. असे असले तरीही नियोजित कामे आपण टप्प्या टप्प्याने पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत आपणास अधिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. नोकरीत बोनस किंवा बक्षिसाच्या स्वरूपात लाभ होईल, तर व्यापारात नवीन ऑर्डर्स मिळू शकतील. कामात आपली व्यस्तता वाढल्याने कुटुंबास आपण पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. अर्थात आपल्या कुटुंबियांच्या सौख्यासाठीच आपण कष्ट घेत असल्याची जाणीव आपल्या कुटुंबियांना असल्याने त्या बद्धल कोणाचीही तक्रार असणार नाही. विद्याभ्यासात सुरवातीस अडथळे येतील. हे अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेश व माता सरस्वतीचे स्मरण करून अभ्यासास सुरवात करावी. ज्यांना गूढ विद्या, जादू, मंत्र, तंत्र इत्यादींची आवड आहे ते आठवडयाच्या सुरवातीस ह्या क्षेत्रात काही नवीन शिकू शकतील. दि. २३ नंतर आपल्या स्वभावात चिडखोरपणा वाढेल. आठवडयाच्या उत्तरार्धात कार्यस्थळी एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीकडे आपण आकर्षित व्हाल किंवा आपल्यातील जवळीक वाढेल. आठवडयाच्या सुरवातीस प्रकृती संबंधी जरी काही काळजी निर्माण झाली तरी हळू हळू त्यात सुधारणा होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. शक्यतो ह्या आठवडयात प्रवास टाळावेत. प्रवासा दरम्यान एखादी जखम होण्याची किंवा ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हे प्रवास टाळावेत. ह्या व्यतिरिक्त प्रवासाचा थकवा सुद्धा जाणवेल.

वृषभ

ह्या आठवडयात आपली मनःस्थिती दोलायमान होत असल्याचे आपणास जाणवेल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस आपल्या विषयी अंदाज बांधता येणार नाही व त्यामुळे कोणाशीही जुळवून घेणे आपणास अवघड होऊन बसेल. सुरवातीस खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल. आठवडयाच्या मध्यास विशेषतः दि.२३ च्या संध्याकाळ नंतर ते दि. २५ च्या रात्री पर्यंत आपणास काही ना काही कारणाने काळजी वाटत राहील. कार्यालयात कामाचा ताण वाढेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकणार नाही. कोणाशीही चर्चेत सहभागी होऊ नये, अन्यथा आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल. आठवडयाची अखेर शुभ व अनुकूलता मिळवून देणारी असेल. कुटुंबीय, वरिष्ठ, सहकारी ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती संभवते. विद्यार्थ्यांना सध्या चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. पहिल्या दिवशी अभ्यासाकडे लक्ष दिल्या नंतर आपले लक्ष इतर प्रवृतींकडे वेधले जाईल. आठवडयाच्या मध्यास सामान्य अभ्यासाकडे पाठ फिरवून आपण परा विज्ञानाकडे वळाल. आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी प्रेमाची भावना निर्माण होईल, परंतु आपण ती व्यक्त करू शकणार नाही. कदाचित त्यामुळे आपण चुकीच्या व्यक्तीस प्रेम व्यक्त करून त्या व्यक्तीचे प्रेम मिळविण्या ऐवजी तिरस्कार मिळविण्याची शक्यता आहे. सुरवातीस वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल. आठवडयाच्या सुरवातीस रागावर नियंत्रण न ठेवल्यास एखादी अप्रिय घटना घडू शकेल. आजारी व्यक्तीस नवीन उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी हा आठवडा अनुकूल नाही. आठवडयाच्या मध्यास प्रकृतीची काळजी घेतल्यास मोठा आजार संभवत नाही. ईश्वराची प्रार्थना व जप जाप्य केल्याने बरे वाटेल. शक्य असल्यास रोज सकाळी शंकराची आराधना, ''ॐ नमः शिवाय'' मंत्र व महामृत्युंजय मंत्र ह्यांचा जप केल्याने कोणतेही अरिष्ट टाळू शकाल.

मिथुन

आठवडयाच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंतची वेळ चांगली आहे मात्र त्या नंतर आपली प्रकृती काहीशी नरम गरमच राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकेल. आपण अधिक उत्साहाने पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल व सहकाऱ्यांसह ठोस नियोजन करून सर्वाना प्रभावित करू शकाल. व्यवसायात सुद्धा आपली कुशाग्र बुद्धी व नवीन विचार ग्राहकांना आकर्षित करण्यास उपयोगी होऊ शकेल. वडिलधार्यांच्या आशीर्वादाने आपले मनोबल दृढ होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आपल्या कामाची प्रशंसा होऊन पगारवाढ सुद्धा होईल. विविध साधने, मशीनरी, मालमत्ता, वाहन इत्यादीत खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे. अगोदर पासून आर्थिक नियोजन न केल्यास पैश्यांची चणचण भासू शकेल. विद्यार्थ्यांची सुरवात चांगली होईल, परंतु पहिल्याच दिवशी दुपार पर्यंत आपला उत्साह ओसरू लागल्याने अधिक परिश्रम करण्यास तयार राहावे लागेल. आठवडयाच्या अखेरच्या दिवसात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. प्रणयी संबंध टिकवून ठेवण्यासाठी सध्या खूप प्रयत्नशील राहावे लागेल. कदाचित आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी काहीतरी करून दाखवावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवून समर्पण भावना वाढविल्यास संबंध टिकवून ठेवण्यात मदत होऊ शकेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. विवाहेच्छुकांसाठी भरपूर प्रस्ताव येतील, मात्र कोणताही निर्णय गंभीरतेने व विचारपूर्वक घेऊनच पुढील वाटचाल करावी. ह्या आठवडयात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ऋतुमानातील बदलामुळे आपणास वारंवार प्रकृती विषयक समस्येस सामोरे जावे लागेल. ह्या व्यतिरिक्त एखाद्या अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

कर्क

कष्ट करण्यात आपण कमी पडत नाहीत, त्यामुळेच आजवर आपण घेतलेल्या परिश्रमाच्या फळाच्या स्वरूपात कार्यात यश आपली वाट पहात आहे. ह्यामुळे आपला आनंद व उत्साह द्विगुणित होईल. आठवडयाच्या सुरवातीस घर - कार्यालय, समाज किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जेथे जाल तेथे आपल्या सिद्दीची व प्रगतीचीच चर्चा होईल व आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. नशिबाची साथ लाभेल. कार्यक्षेत्री प्रतिस्पर्ध्यांवर आपण मात करू शकाल. व्यावसायिक क्षेत्रात आठवडयाच्या मध्यास क्षुल्लक बाबत किंवा गैरसमजामुळे सहकाऱ्यांशी भांडण किंवा तीव्र वाद होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या वाणीस व क्रोधास संयमित ठेवावे. जमीन - वाहन संबंधित कोणत्याही दस्तावेजाच्या कार्यवाहीसाठी आपणास अनुकूलता लाभल्याने कामे पूर्ण होऊ शकतील. आठवडयाच्या सुरवातीस व अखेरीस आपल्यात भिन्नलिंगी आकर्षण व रोमँटिक विचारांचे प्रभुत्व उत्तम राहील. ह्या दरम्यान आपल्या प्रिय व्यक्तीशी आधुनिक माध्यमांद्वारा संपर्कात राहण्याची दाट शक्यता आहे. आठवडयाच्या मध्यास स्नायूंचे दुखणे, सांधेदुखी, कफ, छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा आपणास त्रास होईल. संतती किंवा आरोग्यासाठी खर्च झाल्याने आर्थिक चिंता वाढतील. अनिद्रेचा त्रास होईल. आठवडयाच्या मध्यास आपला कल आध्यात्मिकतेकडे झाल्यास काहीसे बरे वाटू लागेल.

सिंह

आपणास प्रत्येक कामात यश लाभल्याने मन प्रफुल्लित होईल. आर्थिक आघाडीवर आपली प्रगती उत्तम होईल. मित्र व स्नेहीजनांची भेट घडल्याने घरातील वातावरण आनंदी व उत्साही होईल. आठवडयाची सुरवात अस्थिर मनाने होईल. मानसिक थकवा जाणवेल. नवीन कार्यास सुरवात करण्याची प्रेरणा होईल, परंतु विचारात स्थैर्य नसल्याने काही बाबतीत गोंधळ उडेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण स्पर्धात्मक राहील. कामा निमित्त छोटे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. ह्या प्रवासा दरम्यान भविष्यात लाभ होऊ शकेल असे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृतीस थोडी अस्वस्थता व बेचैनी जाणवेल. आठवडयाची सुरवात आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायी ठरेल. व्यवसायात नवीन आयोजन करू शकाल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करता येईल. परोपकारासाठी केलेल्या कामाने आपले मन प्रसन्न होईल. धार्मिक वृत्तीत वाढ होईल. लोकांच्या संपर्कात सतत राहू शकाल. प्रकृतीच्या काही तक्रारी संभवतात. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे आयोजन करू शकाल. एखाद्या धार्मिक किंवा मंगल प्रसंगात आपणास सहभागी व्हावे लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी महत्वाच्या मुद्यांवर विचार - विनिमय होऊ शकतील.

कन्या

आपण केलेल्या गुंवणूकीतून चांगल्यात चांगला परतावा आपणास मिळू शकेल. धनलाभ होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. भावंडांकडून लाभ होऊ शकेल. आपण आपली नियोजित कामे पूर्ण करू शकणार नाहीत. परंतु धीराने आपली कामे करत राहावे. आपल्या कार्याचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आठवडयाच्या अखेरच्या दिवसात आपण भावंडे व मित्रांसह दिवस घालविण्यास पसंती द्याल. अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे. शस्त्रक्रियेची सुद्धा शक्यता आहे. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. कोर्ट - कचेरीच्या कामात अपयश पदरी पडेल. मानसिक चिंता वाढतील. धार्मिक यात्रेसाठी अनुकूल आठवडा आहे. विदेश गमनासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. वडिलांची प्रकृती नरम गरम राहिल्याने आपल्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करावा लागण्याची शक्यता आहे. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे दिसत आहे. सरकारी कामात फायदा होईल. कुटुंबात जर तणावाचे वातावरण निर्माण झाले असेल तर त्यात सुधारणा होऊ लागेल. विदेश प्रवासात त्रास संभवतो. पैतृक संपत्तीच्या वाद - विवादामुळे कोर्ट - कचेरी करावी लागेल. प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी, अन्यथा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल.

तूळ

आठवडयाच्या सुरवातीस आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आनंदाचे वातावरण राहील. सुरवातीच्या दिवसात आपले लक्ष अधिक प्रमाणात प्राप्तीत वाढ करण्यावर केंद्रित होईल, व त्यामुळे व्यावसायिक आघाडीवर आपली सक्रियता वाढेल. आर्थिक, शारीरिक किंवा सामाजिक दृष्टया आपण समाधानी राहाल. कामा निमित्त बाहेर जाण्याचे आयोजन कराल व आपला प्रवास फलद्रुप सुद्धा होईल. व्यापारी वर्गास परदेशातून किंवा दूरवरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक आघाडीवर कुटुंबियांचे सहकार्य मिळू शकेल. आपल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम आहे. अभ्यासात दुर्बल असणार्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या टेबलावर स्फटिकाचा गोळा किंवा पिरॅमिड लटकवून ठेवावा. उच्च शिक्षणात सुद्धा अडचणी उदभवण्याची शक्यता जास्त आहे. आपल्या वाकचातुर्याने आपली कामे इतरां कडून करवून घेऊ शकाल. प्रेमासाठी आठवडयाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. कार्यालयात सुद्धा भिन्नलिंगी व्यक्तींशी जवळीक वाढू शकते. संबंधात अहंकारास दूर सारावे लागेल. प्रिय व्यक्ती प्रती आपल्या आकर्षणात वाढ होईल व त्यांची भेट संस्मरणीय ठरेल. मित्र व भावंडे आपणास योग्य तितका वेळ देत नसल्याचे आपणास वाटेल, परंतु परिस्थितीनुसार ते आपल्या पासून दूर गेले असून त्यांच्या मनात आपल्या विषयी प्रेम नक्कीच आहे. आठवडयाच्या अखेरच्या दिवसात आप्तां बद्धलच्या आपल्या भावना द्विगुणित होतील. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी प्रवासा दरम्यान वातावरणातील बदलामुळे किंवा आहारातील अनियमिततेमुळे आरोग्यास त्रास होऊ शकतो. गुप्तांगाचे विकार असणाऱयांनी विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिक

आठवडयाच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंत काही अंशी बेचैनी व प्रतिकूलतेस सामोरे गेल्यावर लगेचच शारीरिक व मानसिक प्रफुल्लता व ताजेपणा ह्यांसह आपण नव्याने सुरवात कराल. नवीन कार्याचा आरंभ करण्यासाठी आठवडयाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. सुरवाती पासूनच आपल्यात जोम व उत्साह भरपूर असेल तसेच आत्मविश्वासाने व्यावसायिक आघाडीवर आपण पुढील वाटचाल कराल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाची चर्चा होऊन त्यांच्या कृपेचा वर्षाव होण्याची सुद्धा शक्यता आहे. हाती घेतलेली कामे किंवा प्रकल्प वेळेवर झाल्याने आपला उत्साह वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आपली आर्थिक उन्नती होण्याची सुद्धा शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. जे भविष्यातील अभ्यासा बद्धल निर्णय घेऊ इच्छितात, प्रवेश प्रक्रिया करावयाची असेल किंवा कोणाचे मार्गदर्शन हवे असल्यास आठवडयाचे मधले दिवस अनुकूल आहेत. मात्र, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आठवडयातील अखेरच्या दोन दिवसात भिन्नलिंगी मित्र व स्नेहीजनांच्या भेटीने आपण आनंदित व्हाल. आपण मित्र मंडळातील एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची सुद्धा शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी आपले संबंध उत्तम राहतील. आरोग्याच्या बाबतीत ह्या आठवडयात काळजीचे काहीच कारण नाही. मात्र, पित्त कारक आहार टाळावा. तसेच शरीरात अचानकपणे उष्णता वाढू नये म्हणून आहारात प्रवाही पदार्थांचे प्रमाण अधिक ठेवण्याचा प्रयत्न करावा.

धनु

आठवडयाच्या सुरवातीस सर्वात महत्वाचे म्हणजे आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या आरोग्यासाठी पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. नकारात्मक विचार येऊन आपण चुकीच्या मार्गास लागणार नाहीत, ह्याची काळजी घेण्यास श्रीगणेशजी सांगत आहेत. पहिल्या दिवशी दुपार पर्यंत आपण शांततेत दिवस घालवू शकाल, मात्र त्या नंतर मानसिक अशांततेने आपण पछाडले जाल. हि स्थिती आपणास व्यावसायिक आघाडीवर प्रतिकूलता मिळवून देईल. कामाचा कंटाळा येईल. स्वभावात उग्रता येईल. यश मिळविण्यासाठी झगडावे लागेल. उगीचच कोणाशी वाद घालू नये. धाडसी विचार, वागणूक किंवा आयोजना पासून दूर राहावे. दि.२४ पासून आपल्यात आत्मविश्वास निर्माण होऊन तो आपणास प्रगती पथावर नेण्यास मदतरूप ठरेल. विद्यार्थ्यांना सध्या प्रत्येक विषयात खोलवर अभ्यास करण्याची ईच्छा होऊन त्यात यश लाभेल, परंतु दि.२३ च्या दुपार पर्यंत अनुकूलता लाभणार नाही. ज्यांचे पूर्वी पासून प्रेम प्रकरण चालू आहे त्यांना आठवडयाच्या पहिल्या दिवसाच्या दुपार पासून ते दि.२३ च्या संध्याकाळ पर्यंत संबंधात काही ना काही त्रासास सामोरे जावे लागेल. त्या नंतर सुद्धा परस्पर विश्वासाची परीक्षा घेतली जाईल, तेव्हा समाधानी वृत्ती बाळगावी. आठवडयाच्या सुरवातीस आरोग्य विषयक तक्रारींना सामोरे गेल्या नंतर आठवडयाच्या मध्या पासून आरोग्यात सुधारणा होऊ लागेल. आठवडयाच्या शेवटच्या दोन दिवसात प्रकृती चांगली होण्याची शक्यता आहे.

मकर

आठवडयाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आपल्यावर विविध लाभांचा वर्षाव होईल. आठवडयाच्या सुरवातीस आपले लक्ष व्यावसायिक बाबींवर अधिक राहील. सध्या नवीन धाडस करण्यासाठी आपण मनात एखादी योजना आखाल, परंतु त्याची अंमल बजावणी करण्यासाठी थोडी वाट पाहिल्यास जास्त फायदा होईल. विद्यार्थ्यांना जर स्मरणशक्तीची समस्या असली तर अभ्यासात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज सकाळी स्फटिकाची माळा घेऊन माता सरस्वतीच्या नावाचा जप करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दि.२३ च्या दुपार पासून ते दि.२५ च्या संध्याकाळ पर्यंत अभ्यासात जरी थोडे कमी लक्ष लागले तरी इतर दिवस चांगले आहेत. प्रेम प्रकरणात आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जेणे करून अनावश्यक संघर्ष टाळता येईल. विवाहेच्छुकांसाठी आठवडयाच्या सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. आपल्या आवडत्या व्यक्ती समक्ष आपल्या मनातील भावना आपण सांगण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. आपण वैवाहिक जोडीदारासह सृष्टी सौंदर्याच्या स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. मित्र मंडळीत आपण अधिक व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आपल्या प्रकृतीत चढ - उतार होण्याची शक्यता आहे. सुरवात जरी चांगली झाली तरी दि.२३ च्या दुपार पासून ते दि.२५ च्या संध्याकाळ पर्यंत अशक्तपणा, हाडांचे विकार, स्फूर्तीचा अभाव ह्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.

कुंभ

सध्या आपण नवीन कार्यासाठी जे आयोजन केले आहे ते साकारण्यासाठी ह्या आठवडयाचे सुरवातीचे दिवस अतिशय अनुकूल असे आहेत. व्यापार्यांना व्यापारात लाभ होईल. वसुली होऊ शकेल. नोकरी करणार्यांना सुद्धा वरिष्ठांची शाबासकी मिळेल. पगारवाढ, बढती किंवा बढतीसह बदली होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांची ख़ुशी किंवा गरज ह्यासाठी आपण वाहन खरेदी कराल किंवा जुन्या वाहनाची दुरुस्ती करवून घ्याल, मात्र त्यासाठी भरपूर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. पिता, मित्र किंवा मोठया भावंडा कडून काही लाभ होऊ शकतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आठवडयाच्या मध्यास सामाजिक क्षेत्रात आपली ख्याती वाढेल. उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे आयोजन करणार्यांसाठीदिवस अनुकूल आहेत. आठवडयाचे अखेरचे दोन दिवस वगळता बहुतांश काळ आपण अभ्यासाप्रती समर्पित व्हाल. प्रेम - प्रकरणात विचार पूर्वक पाऊल टाकावे लागेल. असे असले तरीही दि.२३ च्या संध्याकाळ पासून ते दि. २५ च्या रात्री पर्यंत आपल्या मनात प्रेमाच्या भावना उफाळून येतील. कुटुंबियांशी व्यावहारिक बाबींमध्ये सध्या विनम्र राहावे, विशेषतः आठवडयातील शेवटच्या दोन दिवसात काळजी घ्यावी लागेल. आठवडयाच्या सुरवातीस आपली प्रकृती चांगली राहील व त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या व्यावसायिक आघाडीवर पडल्याचे दिसून येईल. मात्र, अखेरच्या दोन दिवसात प्रकृती काहीशी नरम राहील. मन अस्वस्थ राहील.

मीन

ह्या आठवडयाची सुरवात अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असल्याचे आपणास जाणवेल. पहिल्या दिवशी दुपार पर्यंत थोडी मानसिक अस्वस्थता व बेचैनी जाणवली तरी त्या नंतर स्थितीत सुधारणा होईल. आपल्या वैचारिक समृद्धीत वाढ होत असताना बौद्धिक प्रतिभा लाभदायी ठरू शकेल. व्यापार - व्यवसाय व नोकरीत प्रगती करण्यासाठी सक्रिय व्हाल. कामासाठी लागणारी वसुली किंवा कर्जा संबंधी कामे झपाटयाने होतील. कामात प्रगती करण्याची संधी लाभेल. आपला बहुतांश वेळ हा नोकरी किंवा व्यापाराशी संबंधित प्रवृतींसाठी जाईल. सुरवातीस आयात - निर्यातीच्या कामात विशेष लाभ होईल. कार्य सिद्धीच्या यशस्वितेची हवा डोक्यात जाणार नाही ह्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मागील आठवडयाच्या उत्तरार्धात ज्या काही अडचणी आल्या असतील त्या ह्या आठवडयाच्या सुरवातीस दूर होतील. विशेषतः उच्च शिक्षण घेणार्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपल्या चेहेर्यावरील स्मितहास्य व वाणीतील गोडव्यामुळे भिन्नलिंगी व्यक्तीस आपण सहजपणे प्रभावित करू शकाल. विवाहितांना वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल. विवाहेच्छुकांना आठवडयाच्या अखेरीस योग्य जोडीदार मिळण्याची किंवा त्या दिशेने प्रगती होण्याची शक्यता दिसत आहे. मागील आठवडयात आपणास प्रकृतीचा जो त्रास झाला होता तो आता दूर होईल. आपली साहसवृत्ती संतोषण्यासाठी आपण एखाद्या साहसी खेळात सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्यांना श्वसनाचे विकार किंवा छातीच्या भागाशी संबंधित विकार आहेत त्यांनी सध्या उपचारांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

मागे

गुरुवार  18 एप्रिल २०१९ चे राशीभविष्य
गुरुवार 18 एप्रिल २०१९ चे राशीभविष्य

मेष - काही नवीन अनुभव येऊ शकतात. काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यात य....

अधिक वाचा

पुढे  

 राशीभविष्य - 22 एप्रिल 2019
राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

मेष आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वे....

Read more