ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. राजेंद्र प्रसाद

पोस्ट :  जानेवारी 03, 2020 04:48 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६२ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. राजेंद्र प्रसाद यांची थोडक्यात माहिती. 

 

          मूळ उत्तर प्रदेशातील महादेव सहाम यांचा सर्वांत लहान मुलगा डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म दि. ३ डिसेंबर १८८४ ला बिहार प्रांतामधील सारन जिल्ला जीरादेई गावात एका कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या मोठ्या भावाचे प्रसाद होते व त्यांना ३ बहिणी होत्या.


          लहानपणापासून राजेंद्र हुशार विद्यार्थी होता. प्राथमिक शिक्षण घरी पूर्ण केल्यावर वयाच्या नवव्या वर्षी त्यांना छपराच्या जिल्हा शाळेत घातले. इ. स. १९०२ मध्ये कलकत्ता विद्यापीठात मॅट्रिक परीक्षेत सर्वांत प्रथम येऊन जी झाले. एफ. ए. परीक्षाही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले म्हणून त्यांना महिना ५० रु. स्कॉलरशिप मिळू लागली. इ. स. १९०६ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून दोन विषयांत बी. ए. ऑनर्स केले म्हणून दोन शिष्यवत्ती मिळाल्या, इ. स. १९०७ मध्ये एम. ए. व १९१५ मध्ये एम. एल. परीक्षाही प्रथम श्रेणीत पास केली. या शिक्षणकाळात त्यांना अनेक शिष्यवृत्ती व पदके मिळाली. 


         राजेंद्र बाबूंना समाज व देशसेवेची प्रेरणा पंजाब केसरी लाला लजपतराय, क्रांतिकारी अरविंद घोष, गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बानर्जी, पंडित मदन मोहन मालवीय, सतीशचंद्र मुखर्जी, सिस्टर निवेदिता, सर गुरुदास बॅनर्जी आदी थोर स्वतंत्रता सेनानींकडून मिळाली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजेंद्र बाबूंनी कलकत्त्यात बिहारी क्लबची स्थापना केली.


         कलकत्त्याला वकिली करीत असताना इ. स. १९०९ मध्ये ते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'सहँट्स् ऑफ इंडिया सोसायटीत' सामील झाले. इ. स. १९११ मध्ये ते कलकत्ता हायकोर्टात वकिली करू लागले. त्यांची निपुणता पाहून मुख्य न्यायाधीश आशुतोष मुखर्जीनी त्यांना लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर पदावर नियुक्त केले. येथे ते १९१४ पर्यंत कार्यरत होते.


         चंपारण्याच्या दौऱ्यासंदर्भात १९१६ पासून ते गांधीजींबरोबर होते. हिंदी, हरिजनोद्धार व बिहारच्या भूकंपाच्या संकटात राजेंद्रबाबूंनी केलेले कार्य हे स्पृहणीय होते. त्यामुळे ते 'बिहारचे गांधी' झाले. काँग्रेसचे अध्यक्षही झाले. तेव्हा त्यांनी भारताचा दौरा केला. सततचे दौरे, भाषणे व कैद यामुळे त्यांना दम्याने घेरले. प्रकृती खूप नाजूक झाली. नंतर काळजी घेऊनही शेवटपर्यंत दम्याने साथ सोडली नाही. राजेंद्रबाबूंची स्वत:ची उन्नती, देशसेवेची तळमळ, समजदारी व विनम्र स्वभाव यामुळे त्यांनी गांधीजींसकट सगळ्या जनतेचा विश्वास जिंकला.


        इ. स. १९१८ मध्ये जेव्हा पाटण्याला हायकोर्ट सुरू झाले, तेव्हा त्यांनी तेथे वकिली सुरू केली ती इ. स. १९२० पर्यंत. त्याच वेळी देशसेवेचे कार्य व भारतीय हिंदी साहित्य संमेलनात सहकार्य देत राहिले. त्याच सुमारास पाटणा विद्यापीठाची स्थापना झाली. राजेंद्रबाबूंनी त्याच्या विधेयकात काही सुधारणा केल्या. ते सिनेटचे सदस्य झाले. इ. स. १९२० मध्ये त्यांनी वकिली सोडली. देशाच्या असहकार आंदोलनात, चंपारण्याच्या सत्याग्रहात भाग घेऊन, त्याचे अत्यंत कुशल नेतृत्व करून, विद्यार्थ्यांच्या सहभागासह, फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन यशस्वी करून दाखविले. सगळे तुरुंग सत्याग्रहींनी भरून गेले.


         हिंदीप्रेमासाठीही राजेंद्रबाबू प्रसिद्ध आहेत. इ. स. १९१८ मध्ये बिहारमधून त्यांनी 'सर्च लाइट' नावाचे इंग्रजी पत्र व 'देश' नावाचे हिंदी साप्ताहिक सुरू केले. इ. स. १९२६ मध्ये बिहार प्रांतीय हिंदी साहित्य संमेलन, दरभंगा, इ. स. १९२७ मध्ये संयुक्त प्रांताचे हिंदी साहित्य संमेलन, कांगडी अधिवेशन, इ. स. १९३६ मध्ये अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन, नागपूर अधिवेशन या सर्व 'अधिवेशनांचे ते सभापती होते. “बिहार विद्यापीठ' नावाचे एक राष्ट्रीय विद्यापीठ त्यांनी स्थापन केले होते.


        दि. ६ एप्रिल १९३० च्या देशव्यापी सत्याग्रहात बिहारचे नेतृत्व केले. हा सत्याग्रह जूनपर्यंत चालला होता. दि. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भयंकर भूकंपात मदतकार्यासाठी त्यांनी 'बिहार अर्थक्वेक सोसायटी' स्थापन करून त्याद्वारे प्रचंड मदतकार्य केले.


        इ.स. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनात त्यांना कैद झाली. ते इ. स. १९४५ पर्यंत कैदेतच होते. दि. २ सप्टेंबर १९४६ मध्ये बनलेल्या आंतरिक सरकारमध्ये राजेंद्रबाबू कृषी व खाद्य मंत्री होते. स्वतंत्र भारताचे संविधान बनविणाऱ्या 'संविधान समिती'चे अध्यक्ष होते. दि. २४ जानेवारी १९५० स्वतंत्र भारताच्या लोकसभेने एकमताने राजेंद्र प्रसादांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले. इ. स. १९५७ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते राष्ट्रपतिपदावर निवडले गेले. सलग १० वर्षे ते या देशाच्या सर्वोच्च पदावर होते.


      अत्यंत साधे, विनम्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. धोतर, कुडता, टोपी असा त्यांचा साधा वेश असे. खादी त्यांना प्रिय होती. त्यांचे कपडे खादीचे असत. जेव्हा ते राष्ट्रपती भवनात राहायला आले तेव्हा त्यांनी इंग्रजांच्या वेळचा साज-सज्जा, गादीचा पलंग सर्व बाजूला केले व ती जागा खादीच्या वस्तूंनी घेतली. विशाल भवनातल्या २-३ खोल्या राखल्या. चटई-चरखा अशा गोष्टी ठेवल्या. यावरून त्यांची ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी' दिसून येते. इ. स.
१९६२ मध्ये त्यांनी राष्ट्रपतिपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली व पाटण्यातील सदाकत आश्रमात राहू लागले. 


         राजेंद्रबाबूंच्या या आयुष्यभराच्या देशसेवेसाठी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च 'भारतरत्न' हा किताब देऊन गौरविले. त्याच्या पुढच्याच वर्षी दि. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.