ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मानकरी - मदर टेरेसा

पोस्ट :  जानेवारी 11, 2020 07:47 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९८० मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या थोर नेत्या मदर टेरेसा यांची थोडक्यात माहिती. 

 

         बालिका अॅग्नेसे गोंकशे बोजशियु जन्म युगोस्लावियातील सोप्जे शहरात अलवेनियन कुटुंबात दि. २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला. टेरेसा सात वर्षांच्या असताना लढाईमध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. युद्धाची भीषणता व वडिलांचा मृत्यू या दोन्हीचा त्यांच्या बालमनावर मोठा आघात झाला होता.

 

       वयाच्या १२-१३ व्या वर्षी युगोस्लावियातील सोप्जेमधल्या शाळेत शिकत असताना दार्जिलिंग, कलकत्ता इथल्या गोष्टींचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. 'लेडी विथ द लॅप' पाठाचा अभ्यास करताना फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या चरित्राचा ठसा मनावर उमटला आणि त्याच वेळी त्यांचा निर्णय झाला की आपणही असहाय, दीन, दुबळ्या गरिबांची सेवा करायची. 

 

        २५ सप्टेंबर, १९२८ रोजी वयाच्या १८ व्या वर्षी 'सिस्टर्स ऑफ लोरेटो'ला जॉइन करून त्या आयर्लंडला गेल्या. काही महिन्यांनी २३ मे १९२९ ला त्यांनी लोरेटो नेविशिएटमध्ये प्रवेश घेऊन आपली गुरू सेंट टेरेसा ऑफ लीसेक्सच्या नावावर दि. २५ मे १९३१ पासून 'सिस्टर टेरेसा' या नावाने आपल्या कार्याला सुरुवात केली. नंतर २५ मे १९३७ ला त्यांनी 'मदर टेरेसा' हे नाव घेतले. 

 

         दि. १० सप्टेंबर १९४६ रोजी मदर टेरेसा जेव्हा आगगाडीने कलकत्त्याहून दार्जिलिंगला जात होत्या, तेव्हा त्यांनी खिडकीबाहेर असहाय, गरीब, दीन, दुःखी स्त्रिया, पुरुष व मुले बघितली. त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा काहीही नव्हते. हे पाहून त्यांचे मन अत्यंत दु:खी झाले. त्यांच्या जगण्याला एक नवी प्रेरणा मिळाली. त्या क्षणापासून लोरेटोच्या वैभवशाली वातावरणात बाहेर पडून, फूटपाथवरच्या असहाय गरिबांची सेवा करण्याचा उचलला.

 

         खिश्चन मिशनरी, नर्स वा समाजसविकच्या रूपात जेव्हा दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्याना त्याच्या मिशनरी संघाचे नियम पाळावे लागतात. टेरेसांना जी सेवा करायची होती, त्यासाठी संघाच्या नियमातून त्यांना सूट हवी होती. म्हणून त्यांनी 'फादर-कलकत्त्याचे बिशप व रोमचे पोप' यांच्याकडून आज्ञा मिळवली. इ. स. १९४८ मध्ये पोपची आज्ञा मिळाल्यानंतर कलकत्त्याच्या वस्त्यांमध्ये जाऊन सेवाकार्याला सुरुवात केली. इ. स. १९४८ मध्येच टेरेसा यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. आपली वेशभूषा बदलून निळ्या किनारीची खादीची साडी नेसली. मग पाटण्याला जाऊन नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले.

 

        आता कलकत्त्याच्या रस्त्यावर गरिबांची सेवा करण्यासाठी टेरेसांकडे केवळ पाच रुपये होते. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत दि. २१ डिसेंबर १९४८ रोजी मोतीझील वस्तीमध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. इ. स. १९५० मध्ये मदर टेरेसांना पोपने मान्यता दिली. दि. ७ ऑक्टोबर १९५० रोजी 'मिशनरीज ऑफ चॅरिटी सिस्टर्स'चा दिवा उजळला. दीन-दुःखितांसाठी कालीघाटच्या काली मंदिराच्या मागे एक जुनी धर्मशाळा कलकत्त्याच्या नगर सभेने मदर टेरेसांना आश्रमासाठी दिली. त्यावर इंग्रजी व बंगाली भाषेत पाटी लिहिली-'कलकत्ता आणि प्रतिष्ठान, निर्मल हृदय, मुमूर्ष निराश्रितांचे आश्रय स्थान.' अर्थात या सगळ्याला सुरुवातीला विरोधही झालाच. 

 

       पण एकदा त्या मंदिराचे पुजारी टी. बी.ने आजारी झाले. तेव्हा मदर टेरेसांनी त्यांची पुत्राप्रमाणे काळजी घेऊन त्याला मरणाच्या दाढेतून वाचवले. तेव्हा त्यांना मदर टेरेसा याच काली माता वाटल्या. ते पुजारी मदर टेरेसांचे भक्त झाले. तसेच इतरही पुजारी भक्त झाले. आज कालीघाटावरच्या निर्मल हृदय आश्रयस्थानाप्रमाणे भारतभरात आणि साऱ्या विश्वात तीन डझनांच्या वर अशी आश्रयस्थाने कार्यरत आहेत. कोडी, टी. बी. क्लिनिक, चिकित्सालय, कमर्शियल स्कूल, टेक्निकल विद्यालय आदी अनेक संस्था सर्वार्थाने कार्यरत आहेत. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, वेनेजुएला, फ्रान्स, अमेरिका, कॅनडा, इटली, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, डेन्मार्क, इंग्लंड, न्यूझलड इ. अनेक देशांत 'मिशनरीज ऑफ चॅरिटीज'चे अनेक दिवे झगमगतात. मदर टेरेसांची यशोगाथा सांगतात.

 

       मदर टेरेसा यांना जीवनात १२४ पुरस्कार मिळाले आहेत. ऑग. १९६२ मध्ये 'पद्मश्री' किताब मिळाला. एक वर्षानंतर 'रॅनन मॅगसेसे अॅवार्ड’. जानेवारी १९७१ मध्ये वॅटिकन सिटीमध्ये पोप जॉन पॉल तेरावे यांचे जॉन पीस प्राइज', त्याच वर्षी दोन अन्य पुरस्कार 'गुड सॅमॅरिटन अॅवॉर्ड' आणि 'जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल ॲवॉर्ड' हे सर्व पुरस्कार त्यांना मिळाले. त्याच वर्षी कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेने 'डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स'ची उपाधी प्रदान केली. पुढच्या वर्षी नोव्हेंबर १९७२ मध्ये 'जवाहरलाल नेहरू पुरस्कार' मिळाला. इ. स. १९७९ मध्ये विश्व शांतीचा 'नोबेल पुरस्कार' दिला गेला.

 

       एक अत्यंत सामान्य मुलगी मदर टेरेसाच्या रूपात करुणा, सेवा व ममतेची साक्षात देवी बनली आणि अगणित 'निर्मल हृदय आश्रयस्थानांच्या माध्यमातून साऱ्या विश्वाला आपल्या ममता आणि छायेच्या पदराची ऊब देत राहिली. त्यांनी आपल्या सेवाकार्याच्या संस्थेचे नाव 'मिशनरी ऑफ चॅरिटी' ठेवले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या तरुणींसाठी नियम होता की त्यांनी जन्मभर अविवाहित राहावे. आज कलकत्त्याच्या निर्मल हृदय' व दुसऱ्या अनेक आश्रम व सेवा संस्थांचे जाळे भारतातच नाही, तर जगात पसरले आहे. 

 

        मदर टेरेसा यांनी लोकांचे शारीरिक व मानसिक कष्ट दूर करणे आपले प्रथम कर्तव्य मानले. अनाथ मुले, विधवा व रुग्णांसाठी अनेक ठिकाणी केंद्रे उघडली. मदर टेरेसांच्या नि:स्वार्थ सेवेने प्रभावित होऊन अनेक सरकारांनी त्यांना पुरस्कार दिला; पण त्याचबरोबर आर्थिक मदतही केली. मार्च १९८० मध्ये मदर टेरेसांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन गौरविले. दि. ५ सप्टेंबर १९९७ ला हृदयविकाराच्या धक्क्याने कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.