ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - पंडित जवाहरलाल नेहरू

पोस्ट :  डिसेंबर 26, 2019 03:51 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९५५ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर  नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांची थोडक्यात माहिती.

         
          पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दि. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल वकील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी होते. जवाहरलाल नेहरूंचे काका नंदलाल हेही वकील होते. नेहरूंचे वडील त्या काळातले भारतातले ते प्रसिद्ध वकील होते. त्यांनी खप धनदौलत कमविली आणि अलाहाबादला एक मोठी कोठी खरेदी करून त्यात अत्यंत इतमामाने राहत होते. या कोठीला त्यांनी 'आनंद भवन' नाव दिले होते. बालक जवाहरलाल वयाच्या ११ व्या वर्षापर्यंत एकुलते एक होते. त्यामुळे त्यांचेच सगळे लाङकोड झाले. नंतर त्यांच्या बहिणी स्वरूप (विजयालक्ष्मी) व कृष्णा यांचा जन्म झाला.


         मूळचे त्यांचे पूर्वज काश्मिरी होते. इ. स. १७६१ मध्ये ते दिल्लीला आले. त्यांचे घर 'नहर'च्या समोर होते; म्हणून परिचितांमध्ये ते नेहरू' झाले. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचे सर्व काही गेले म्हणून नंतर ते आग्रा मुक्कामी आले. पं. मोतीलाल नंतर अलाहाबादला राहू लागले. त्यांची सर्व राहणी, खाणे-पिणे, रीतीरिवाज इंग्रजी पद्धतीचे होते. 


        जवाहरलालचे प्राथमिक शिक्षण लाडाकोडात घरीच झाले. कित्येक इंग्रजी शिक्षक त्यांना घरी शिकवायला येत असत. या सर्वांत मिस्टर एफ. टी. ब्रुक्स मुख्य होते. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना इंग्रजी राहणी, शिष्टाचार यांचे विशेष आकर्षण वाटू लागले. त्यांच्यासाठी ठेवलेल्या इंग्रजी दाया त्यांना उठणे-बसणे, चालणे-बोलणे हे सर्व इंग्रजी रिवाज शिकवत होत्या. एक पंडित त्यांना संस्कृत शिकवत असे. वडिलाचे मुन्शी मुबारक अलींकडून जवाहरलाल तासन्तास गोष्टी ऐकत असत. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी मुन्शीजी सांगत असत. घरातल्या मोठ्या स्त्रिया रामायण, महाभारत, पुराणांतील गोष्टी सांगत. या प्रकारे पश्चिमी सभ्यतेबरोबरच भारतीयत्वाची शिकवणही त्यांना मिळत होती. घोडेस्वारी, पोहणे व टेनिस तिन्हीची त्यांना खूप आवड होती. 


        याच काळात जवाहरलाल वडील मोतीलालजींबरोबर इंग्लंडला गेले. बरोबर आई व बहीण स्वरूपही होती. मे १९०५ मध्ये लंडनला प्रसिद्ध हरी स्कूल पाहिले. ते त्यांना खूपच पसंत पडले. जवाहरलालच्या शिक्षणासाठी त्यांना अशीच संस्था हवी होती. तिथे त्यांचे शिक्षण सुरू झाले. दोन वर्षांनंतर उच्च शिक्षणासाठी केंब्रिजच्या 'ट्रिनिटी कॉलेज मध्ये दाखल झाले. इथे बी. ए. व एम. ए. करून बॅरिस्टर होण्यासाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला. दोन वर्षांनंतर वयाच्या २३ व्या वर्षी 'इनरटेंपल'हून बॅरिस्टर भारतात परतले. आता बाप-लेक दोघांनीही अलाहाबादच्या हायकोर्टात वकिली सुरू केली.


        सन १९१६ च्या वसंत पंचमीला दिल्लीतील जे. एल. कौल यांची कन्या कमलादेवीबरोबर जवाहरलालजींचा विवाह झाला. १९१६ मध्येच ते पहिल्यांदा गांधीजींना भेटले होते. त्यांचे नाव ते ऐकून होते. दि. १९ नोव्हेंबर १९१७ रोजी जवाहरलालजींना एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी प्रियदर्शिनी इंदिरा ठेवले. हीच पुढे भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली. इ. स. १९२० पर्यंत जवाहरलालजी वकिली करीत होते. त्या काळात गांधीजींनी विदेशी मालावर बहिष्कार' आणि 'असहयोग आंदोलनाला' सुरुवात केली होती. त्यात सहभागी होण्यासाठी नेहरूंनी वकिली सोडून दिली. पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांनी भारतीय शासनप्रणालीमध्ये सुरुवात करण्याऐवजी 'रौलेट अॅक्ट' सारखा कायदा लागू करून दडपशाहीला सुरुवात केली. या कायद्यान्वये संशयित व्यक्तीला अनिश्चित काळापर्यंत बंदी बनवून कैदेत ठेवता येत होते. त्याच्या विरोधात गांधींनी असहयोग व अवज्ञा आंदोलन छेडले. नेहरूही या आंदोलनात उतरले. मोतीलालजींनी आपल्या मुलाला थांबविण्याचा प्रयत्न केला; पण जवाहरलाल आपल्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले. याचा परिणाम व देशातील एकूण परिस्थिती पाहून वडिलांनी मुलाला आशीर्वाद तर दिलाच व स्वता: ही यात उतरले. इ. स. १९२१ मध्ये त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. शिवाय नंतर इ. स. १९२२ मध्ये १८ महिन्यांचा कारावास झाला. यावर्षी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महामंत्री बनविले गेले. 


             ३० नोव्हेंबर १९२८ रोजी जेव्हा सायमन कमिशन लखनौला पोहोचले तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी कित्येक हजार लोक गटागटाने स्टेशनकडे चालले होते. स्टेशनवर पोहोचल्यावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यांच्या घोडेस्वारांनी त्यांना तुडवले. यातील एका दलाचे नेतृत्व नेहरू करीत होते. निर्दयपणे पोलिसांचा लाठीहल्ला सुरू झाला. स्वातंत्र्याच्या या वीर सैनिकाला। गोऱ्या सरकारने लखनौ, बरेली, डेहराडून, अहमदनगर इ. ठिकाणी तुरुंगात डांबले. त्यांना एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगावा लागला.


           इ. स. १९२९ मध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते अध्यक्ष होते. तेथेच रावी तटावर २६ जानेवारी १९२९ ला संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत केला गेला व सर्व देश एका विशाल संघर्षासाठी तयार झाला. इ. स. १९३० मध्ये गांधींनी 'मिठाचे आंदोलन' सुरू केले. त्या काळात नेहरूंवर संकटांचा डोंगर कोसळला. वडिलांचा मृत्यू झाला. पाच वर्षांनंतर पत्नी कमला नेहरू व सात वर्षांनंतर आईचा मृत्यू झाला. तरीही त्यांनी आपले देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले. 


          दि. २० जून १९३८ रोजी पॅरिस नभोवाणीवरून प्रसारित झालेल्या त्यांच्या भाषणाने जगभरात खळबळ माजली. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनामध्ये नेहरूंना कैद झाली. ते १९४५ पर्यंत जेलमध्ये होते. शेवटी १९४७ ला सत्तेचे हस्तांतरण झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित झाले. त्या वेळेला नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून देशाची जबाबदारी त्यांच्या हातात होती. त्यांनी देशाच्या प्रजासत्ताकाचा पाया घातला. सांप्रदायिकता दूर ठेवण्यासाठी राजनीतीपासून धर्म वेगळा केला. कोणत्याही गटात सामील न होता, जगातील भांडणे, झगडे, लढाया थांबविण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी पंचशील' तत्त्वाचा प्रचार व प्रसार केला.


          देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील गरिबी हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. त्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करून राबविल्या. त्यामुळे एका नव्या युगाची भारतात सुरुवात झाली. नवनवे कारखाने, मोठमोठे वीजप्रकल्प, बंधारे, धरणे, विकास योजना हे सर्व कार्यान्वित झाले. यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. पं. नेहरू हे एक लेखक व विचारवंत होते. 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री', 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया', 'लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. नेहरू विश्वशांतीचे पुरस्कर्ते होते. इ. स. १९६२ मध्ये माओवादी कम्युनिस्ट चीनने 'मित्रदेश' म्हणत भारतावर आक्रमण केले; याचे त्यांना खूप दुःख झाले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता नेहरूंवर जास्तच प्रेम करू लागली. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिले होते की, 'मला माझ्या देशातील जनतेने, भारतीय बंधू-भगिनींनी इतके प्रेम दिले आहे की, मी कितीही केले तरी त्याचा एक लहानसा भागही होणार नाही. खरं तर प्रेम ही अशी गोष्ट आहे की, त्याच्या बदल्यात काही देणे अशक्यप्राय आहे.'               
          देशबांधवांबरोबरच भारतभूची पवित्र माती व गंगा-यमुनेशीही त्यांचे तितकेच भावबंध होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी इच्छा व्यक्त केली होती- 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी अलाहाबादला पाठवाव्यात. त्यातील मूठभर गंगेमध्ये टाकाव्यात. त्यामागे माझी काही धार्मिक भावना नाही. लहानपणापासूनच मला गंगा-यमुनेविषयी प्रेम वाटते. उरलेल्या अस्थी उंचावरून शेतात विखरून द्याव्यात, जिथे भारतीय शेतकरी कष्ट करतात. त्यातून त्या भारतभूमीत मिसळून त्या भूमीचाच भाग बनून जातील.'

         अशा या देशसेवेसाठी दि. १२ जुलै १९५५ रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' दिला गेला. भारतातील मुलांसाठी ते 'चाचा नेहरू' म्हणून प्रसिद्ध होते. यासाठी १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्म दिवस 'बालदिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. दि. २७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देहावसान झाले.