ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सरदार वल्लभभाई पटेल

पोस्ट :  जानेवारी 21, 2020 05:53 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९१  मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची थोडक्यात माहिती.

 

       सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दि. ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी, गुजरात येथील नडियादमधील बोरसद तालुक्यातील करमसद गावात वडील झबेरभाई पटेल व आई श्रीमती लदवा यांच्या पोटी झाला. वडील झबेरभाई हे संयमी, साहसी व वीर पुरुष होते. ते १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यामधून इंग्रजांशी लढले होते. साहस, निडरता हे गुण असे परंपरेनेच वल्लभभाईंमध्ये आले होते. ते लेवा पट्टीदार नामक एका प्रसिद्ध लढवय्या कृषक जमातीशी संबंधित होते. करमसद या जन्मगावी शालेय शिक्षण झाले. पाचव्या इयत्तेपर्यंत इंग्रजी शिक्षण घेतले. नंतर २२ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास केली. मग नाडियादमध्ये जिल्हा वकील बनले. त्याआधी १८९३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी झवेरबाई नावाच्या कन्येशी विवाह झाला. ती मुलगी सच्छील आणि विनम्र होती. 


          त्यानंतर १९१० मध्ये विलायतेला जाऊन त्यांनी बरिस्टरी पास केली. कितीही कठीण प्रसंगात ते कायम स्थिरचित्त राहत असत व अत्यंत धीरोदात्तपणे परिस्थितीला तोंड देत. एकदा ते एक खटला चालवत असताना त्यांना पत्नी झवेरबाईच्या मृत्यूची तार मिळाली. ती त्यांनी वाचून तशीच खिशात ठेवली व कोर्टातले काम संपल्यावर मग तिकडे गेले. त्या वेळी त्यांचे वय ३३ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा विवाह केला नाही. त्या वेळी त्यांची मुलगी मणिबेन पाच वर्षांची होती. तिने वडील वल्लभजींना कधीच आईची उणीव जाणवू दिली नाही. शेवटपर्यंत कौटुंबिक व राजनैतिक पटावर मणिबेनने वडिलांना साथ दिली. तिचे हे योगदान फारच महत्त्वपूर्ण होते.


           इ. स. १९१६ मध्ये गांधीजींबरोबर वल्लभभाईंनी गोधरामधील बेगार-प्रथा बंद केली. २९ जून १९१७ ला खेडा सत्याग्रह यशस्वी झाल्याचा समारंभ गांधीजींबरोबर साजरा केला. 'रौलेट अॅक्ट'च्या विरोधात संपूर्ण गुजरातमध्ये  'असहकार आंदोलन' मोठ्या प्रमाणावर राबवून यशस्वी केले. इ. स. १९२० मध्ये वल्लभभाई गुजरात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवडले गेले. त्यानंतर बोरसदाचा सत्याग्रह व नागपूरच्या झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले. 'बारडोलीच्या ऐतिहासिक सत्याग्रहाने' वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी बहाल केली. त्यानंतर अनेक सत्याग्रहांत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले. इ. स. १९३१ ला कराचीमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले. त्या वेळी अध्यक्षपदावरून त्यांनी खूपच मर्मस्पर्शी भाषण केले. ८ ऑगस्ट १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या वेळी इतर नेत्यांबरोबर सरदार पटेलनाही अहमदनगर किल्ल्यात नजरकैद केले. तीन वर्षांनंतर दि. १९ जून १९४५ रोजी 'सिमला-कॉन्फरन्ससाठी' इतर नेत्यांबरोबर सरदार पटेलनाही सोडले.


         १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारताचे सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्याच वेळेला गृहखाते व रियासती विभागाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवला. या पदावरून नवीन स्वतंत्र भारतात त्यांनी क्रांतिकारी परिवर्तन घडविले. भारताच्या इतिहासात स्थायी स्वरूपाची रक्तहीन क्रांतीच घडवून आणली. भारतातील सुमारे ६०० रियासतींचे एकीकरण केले. २१९ लहान संस्थानांना वेगवेगळ्या प्रदेशांत विलीन केले. त्या वेळी हैदराबादच्या निजामाने प्रचंड विरोध केला. अनाचार, अत्याचार, कत्लेआम सुरू केले. रझाकारांनी बंड पुकारले. शेवटी जनतेच्या-सार्वभौम भारताच्या हितासाठी नाइलाज होऊन वल्लभभाईंनी पोलीस कारवाई केली आणि तीन दिवसांत निजामाच्या सत्तेचा अंत केला. तसेच जुनागढ संस्थानही स्वतंत्र भारतात सामील केले. या प्रमाणे विखुरलेल्या भारतातील तुकड्यांना एकसंध करून सार्वभौम एकसूत्री भारत-प्रजासत्ताक बनवण्याचे काम या महापुरुषाने केले. म्हणूनच त्यांना भारताचे 'पोलादी पुरुष' म्हटले जाते. त्यांची बुद्धिमत्ता, प्रयत्न, कूटनीती, निर्भीडता, साहस व लक्ष्य प्राप्त करण्याची जिद्द यामुळेच हे अत्यंत अवघड काम पार पडले. काहींच्या मते जर हे काम सरदार पटेलांच्या हातात नसते तर आज परिस्थिती पूर्णत: भिन्न असती. जसा आज काश्मीरचा प्रश्न प्रलंबित आहे. कारण हे कार्य त्यांच्याकडे नव्हते ना!


         जगाच्या इतिहासातील निवडक महापुरुषापैकीच सरदार वल्लभभाई पटेल हे एक ज्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य या कार्यात सिद्ध केले. लंडन टाइम्सच्या सार संस्थानांच्या विलीनीकरणाच्या इतिहासात सरदार पटेलांचे स्थान हे बिस्मार्कच्या समकक्ष किंवा त्याहीपेक्षा वरचे होते. इ. स. १९४९ मध्ये पटेलांची प्रकृती ठीक नव्हती. तरीही १० मार्च १९५० ला ते कलकत्त्याला गेले आणि पूर्व बंगालमधील हिंदूंचे निर्वासित होणे थांबविण्यासाठी पाकिस्तानला समज दिली. त्यामुळे ८ एप्रिल १९५० रोजी पाकिस्तान अल्पसंख्यांक हिंदूचे रक्षण करणे व त्यांची संपत्ती त्यांना परत द्यायला तयार झाले. १७ नोव्हेंबर १९५० रोजी त्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर कडाडून हल्ला केला आणि तिबेट हडपण्याचा प्रयत्न म्हणजे विश्वशांतीलाच धोका आहे, हे दाखवून दिले. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या आतड्याच्या जुन्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. म्हणून त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथेच उपचारादरम्यान पुन्हा दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला व त्यातच १५ डिसेंबर १९५० च्या मध्यरात्री त्यांचा स्वर्गवास झाला. 


         संपूर्ण देश एका कुशल राज्यकर्त्याला मुकला आणि शोकसागरात बुडाला. त्या वेळचे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले की, “सरदार पटेलांची स्मृती भारतीय मानसात अमर राहील.' सर्वांनीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचा गंभीर चेहरा पाहून वाटायचे की, हे अत्यंत कठोर व निर्दयी आहेत. कर्तव्यपालनाचे वेळी ते तसेच होते. पण इतर वेळी ते अतिशय सहृदयी होते.म्हणून तर ते साऱ्या भारताला एका सूत्रात जोडू शकले. असो. अशा या 'सरदार वल्लभभाई पटेल' नावाच्या भारताच्या 'लोहपुरुषाला' दि. १३ जुलै १९९१ रोजी भारताचा सवाच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' मरणोत्तर देऊन भारत सरकारने त्याच्या कार्याचा यथोचित सन्मानच केला.