ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - सत्यजीत राय

पोस्ट :  जानेवारी 23, 2020 07:15 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९२  मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते सत्यजीत राय यांची थोडक्यात माहिती.

 

          वडील सुकुमार राय व आई सुपर्णा राय यांचा मुलगा सत्यजित राय याचा जन्म एका बंगाली कुटुंबात दि. २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे आजोबा किशोर राय चौधरी हे अत्यंत आकर्षक बालकथा लिहीत असत बंगालमध्ये उच्च दर्जाच्या छपाईचे काम त्यांनी सुरू केले होते. वडील सुकुमार राय यांनी बंगाली काव्यात एका नव्या प्रथेला जन्म दिला होता. आई सुपर्णा राय एक प्रसिद्ध गायिका होती. अशा साहित्य, संगीत व कलेचा वारसा मिळालेल्या घराण्यातला यांचा जन्म होता. याचेच त्यांनी स्वप्रयत्नांनी सोने केले. त्यांचा विवाह विजयादास नावाच्या एका सुंदर, सुशील बंगाली मुलीशी झाला. सत्यजित लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणून त्यांचे बालपण मामाकडे भवानीपूरला गेले. सत्यजित आपल्या निकटवर्ती व मित्रपरिवारात ‘माणिक दा' म्हणून प्रसिद्ध होते.


         बालीगंज स्कूलमध्ये पहिले शिक्षण झाल्यावर कलकत्त्याच्या 'प्रेसिडेंसी कॉलेज'मधून पदवी शिक्षण सत्यजितनी घेतले. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व अर्थशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला होता. मग ते गुरूदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये गेले. तेथे ३ वर्षांपर्यंत चित्रकलेचा अभ्यास केला. इथल्या कला भवनच्या आर्ट स्कूलमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार नंदलाल बसू यांच्याकडून भारतीय कलेच्या मूल्याचे सिद्धान्त आत्मसात केले. वृक्ष व दुसऱ्या चेतन वस्तूंच्या चरित्राची अनुभूती घ्यायला शिकले. विनोद बिहारी बोस यांच्यकडून रंगस्पर्शाचा अनुभव घेतला.

 

        वास्तविकतेला सौदर्यातून सादर करणारे, भारतीय सिनेमाला वैश्विक उंची प्राप्त करून देणारे, कलेच्या क्षेत्रात घडलेले बहुआयामी व्यक्तिमत्व सत्यजित राय ऊर्फ माणिक दा कलकत्त्याच्या एका ब्रितानी विज्ञापन एजन्सीमध्ये व्यावसायिक कलाकाराच्या रूपात कामाला लागले. तिथे ते लवकरच कला निर्देशक बनले. पण त्यांची मनापासूनची आवड सिनेक्षेत्राची होती. म्हणून समविचारी सहयोगी मित्रांबरोबर त्यांनी १९४७ मध्ये 'कलकत्ता फिल्म सोसायटी'ची स्थापना केली.


        इ. स. १९५० मध्ये सत्यजितजी लडनला गेले. तेव्हा साडेचार महिन्यांच्या त्यांनी शंभर फिल्म पाहिल्या. त्या सगळ्या फिल्मस्चा त्यांच्या मनावर विदा जबरदस्त परिणाम झाला की, भारतात परत येताना बोटीवरच प्रवासात ती पाथेर पांचाली' नामक पटकथा लिहिली. आर्थिक व इतर अनेक अडचणींचे डोंगर पार करत माणिकदांनी इ. स. १९५५ मध्ये 'पाथेर पांचाली' ही बंगाली फिल्म तयार केली आणि खरंच अशी तन, मन धन अर्पूण निर्माण झालेली ही अपूर्व कलाकृती फिल्मजगतात एक मैलाचा दगड ठरली. जपानच्या श्रीमती कावाकिता यांनी या फिल्मला 'विश्वातील सर्वांत महान फिल्म' म्हटले. केन्स फिल्म समारंभात 'पाथेर पांचाली'ला प्रथम आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि या फिल्मला 'मानवीय दस्तऐवज' म्हटले. १९५७ मध्ये सॅन्फ्रेंसिस्को फिल्म समारंभात सर्वश्रेष्ठ निर्देशनाचा पुरस्कार प्राप्त झाला. इतकेच नाही तर बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार या फिल्मला मिळाले. 


         सत्यजितजींची दुसरी फिल्म 'अपराजिता.' या सिनेमाला व्हेनिस फिल्म समारंभात सेंटमार्कचा ‘स्वर्णसिंह' प्रदान केला गेला होता. त्यांची पहिली हिंदी फिल्म होती 'शतरंज के खिलाडी'. मुन्शी प्रेमचंदांच्या कथेवर असलेल्या या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सत्यजितजी हे फिल्म निर्मितीच्या क्षेत्रात निर्देशक, कला निर्देशक, कथा-लेखक, संगीतकार हे सर्व काही होते. माणिकदा हे एक कथा व बालसाहित्य लेखकही होते. त्यांच्या फलुदा, सोनारकिला, बक्सा-रहस्य, प्रोफेसर शोंकू, विषय चल-चित्र, कई बोले शूटिंग, जब मैं छोटा था' इ. कलाकृती साहित्य जगतात उल्लेखनीय आहेत. शिवाय ते एक लेखक व संपादकही होते.


       ‘संदेश’ नावाच्या बाल-पत्रिकेचे संपादन त्यांनी अतिशय कौशल्याने केले होते. 'आवर फिल्म, देअर फिल्म' या पुस्तकात त्यांच्या फिल्मसंबंधी लेसंग्रह आहे. शिवाय सत्यजित राय हे एक उच्च कोटीचे, वैज्ञानिक व हेरकथा लेखकही होते. त्यांची ‘कल और आज, कांचनजंघा, नायक (नाट्यकृती), बारह कहानियाँ' इ. पुस्तके प्रसिद्ध होती. यांच्या या व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना इ. स. १९५९ मध्ये ‘पद्मश्री', इ. स. १९६५ मध्ये 'पद्मभूषण', इ.स १९७६ मध्ये ‘पद्मविभूषण' हे किताब दिले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 'डॉक्टरेट' पदवी दिली. चार्ली चॅप्लीननंतर हे दुसरे व्यक्ती होते, ज्यांना ही पदवी मिळाली. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा मितरां यांनी स्वतः कलकत्त्याला येऊन सत्यजितजींना ‘सीज ऑफ आचर' उपाधी प्रदान केली. इ. स. १९६७ मध्ये पत्रकारिता व साहित्य सेवेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 'मॅगसेसे अॅवॉर्ड' मिळाले. इ. स. १९७१ मध्ये 'ऑर्डर ऑफ युगोस्लाव फ्लेग' सन्मान प्राप्त झाला. मे १९६१ पर्यंत सत्यजितदांनी सात कथा-चित्र, तीन वृत्तचित्र आणि रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनावर आधारित फिल्मची निर्मिती केली होती. इ.स. १९७१ पर्यंत माणिकदांना ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. ५ जुलै १९७४ ला ब्रिटनच्या 'रॉयल कॉलेज ऑफ आर्टस्'ने त्यांना डॉक्टरेट ची पदवी दिली होती. इ. स. १९७८ मध्ये 'ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी'नेही डॉक्टरेट पदवी दिली. १९९१ मध्ये हॉलिवूडनेसुद्धा फिल्मी दुनियेचा सर्वांत उच्च विशेष ऑस्कर' पुरस्कार देऊन गौरविले. हा पुरस्कार मिळणारे राय हे पहिले भारतीय आहेत.


         सत्यजित राय यांनी जवळजवळ ३६ सिनेमे बनविले. त्यातील विशन श्रेष्ठ पुरस्कार मिळालेल्या फिल्म- 'पाथेर पांचाली (१९५५), अपराजिता (१९५६), पारस पाथर (१९५७), जल सागर (१९५८), अपूर ससा (१९५९), देवी (१९६०), रवींद्रनाथ टागोर वृत्त फिल्म १९६१, तीन कर (१९६१), कांचनजंघा (१९६२), अभिज्ञान (१९६२), महानगर (१९६३) चारुलता (१९६४) कापुरुषओ महापुरुष (१९६५), नायक (१९६६), चिडियाखाना (१९६९)  सोनार किला (१९७३) जनअरण्य (१९७३), शतरंज के खिलाडी (१९७७), जय बाबा फेलूनाथ (१९७८) हीरक राजार देशे (१९८०) गणशत्रू (१९८९), शाखा-प्रशाखा (१९९०) आंगतूक (१९९१)' या उल्लेखनीय आहेत.


         सत्यजितजी तीन वेळा भारतीय फिल्म महोत्सवात ज्युरी-सदस्य होते. तसेच मास्को, बर्लिन व केन्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म समारोहाचेसुद्धा ते एक ज्युरी-सदस्य होते. बहुमुखी प्रतिभासंपन्न सत्यजित राय यांनी कला आणि व्यवसाय यांमधील धोका न स्वीकारण्याचा सुरक्षित मार्ग कधीच स्वीकारला नाही. नेहमीच आर्थिक व इतर परिस्थितीला तोड देत ते फिल्मनिर्मिती करीत राहिले. लंडनमध्ये त्यांनी एक वर्षभर नावीन्यप्रवाह असलेले युरोप व अमेरिकी सिनेमे बघितले. जीन रेनोइर (Jean Renoir) जेव्हा भारतात त्यांची फिल्म 'द रिव्हर'चे शूटिंग करायला आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर माणिकदा सगळीकडे फिरले. फिल्मनिर्मितीमधील बारीकसारीक गोष्टी, तंत्र सगळे निरखून, पारखून, शिकून घेतले. सत्यजित रायना मिळालेला साहित्य, कला, संगीत, संस्कृतीचा- कौटुंबिक, परंपरागत, पिढीजात वारसा; खंबीर, परिस्थितीला तोंड देणारा, धोका पत्करणारा, धडपड्या स्वभाव, उच्च कोटीची बौद्धिक क्षमता, फिल्मनिर्मितीची जबरदस्त लालसा या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांच्या आतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यता पावलेल्या, एकापेक्षा एक सरस फिल्मस् ! त्यांच्या सिनेमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'दर्शकांच्या मानवीय संवेदना, अत्यंत प्रभावशाली ढंगाने जागृत करणे.' प्रामाणिकपणाची मूल्ये जागवताना, पाखडी समाजाचा पोकळ भारदस्तपणा उघड करणे ; दलित, दुःखी व शाषितासाठी हार्दिक सहानुभूती व्यक्त करणे.

        विशेषतः भारतीय संस्कृतीने आणि जगाला दाखविलेले स्त्री पात्राचे यथार्थ व आदर्श असे अद्भुत रसायन प्रेक्षकांच्या मनात उभे करणे. पुरुष पात्रसुद्धा प्रामाणिक अशा सरळ-साध्या व्यक्तिमत्त्वातील अत्यंत जटिल बारकाव्यात जाण्याचे दुःसाहस करताना दिसतात. वास्तवात त्यांचा सिनेमा म्हणजे अत्यंत डोळसपणे गेलेले स्वाभाविक दर्शन व वातावरणाचा दृश्याविष्कार आहे. त्या सिनेमातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा ही अस्मितेच्या शोधात भटकणाऱ्या, सुंदर व यथार्थवादी भारतीयाचे प्रतीक आहे. रायनी भारताची मदार दर्शकांसमोर आपल्या फिल्ममधून उजागर केली आहे. वास्तवाची करा निराशा दाखवत दर्शकांना हसविण्याची ताकद सत्यजितजींच्या फिल्म आहे. भ्रष्टाचार व मानवी मूल्यांच्या विघटनाचे प्रभावशाली दिग्दर्शन पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मन व बद्धीला गदगदा हलविणारे दिग्दर्शन समोर येते महानता, लोकप्रियता व कलेच्या ज्या उच्च शिखरावर सत्यजित राय यांनी पोहोचून जगाला आपले कर्तृत्व दाखवून दिले. तेथपर्यंत विश्वाच्या फिल्मी दुनियेतील कोणीही व्यक्ती अजूनपर्यंत पोहोचली नाही. सिनेमाच्या माध्यमातून दर्शकांची संवेदनशीलता रायजींनी ज्या पद्धतीने जागवली ती अपूर्व होती.


       त्यांचे मनोबल अखेरपर्यंत खूपच सशक्त होते. इ. स. १९८३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यातून पूर्ण बरे होऊन त्यांनी 'शाखा- प्रशाखा', 'आगंतुक'सारख्या फिल्म काढल्या. दि. २० मार्च १९९२ रोजी भारत सरकारने सत्यजित रायना भारतातील सर्वोच्च बहुमानाचा 'भारतरत्न' किताब देऊन भूषविले. असे हे बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी, सिनेमा जगतात भारताला आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून देणारे, विचार व कल्पना यांचा संगम असलेले, महान फिल्म- निर्माता, निर्देशक, कला-मर्मज्ञ, चित्रकार, कथालेखक, संगीतकार सत्यजित राय दीर्घ आजाराशी झगडत होते. अखेर दि. २३ एप्रिल १९९२ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. ते अनंतात विलीन झाले.