ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. जाकिर हसैन

पोस्ट :  जानेवारी 04, 2020 04:25 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६३ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. जाकिर हसैन यांची थोडक्यात माहिती. 

 

         जाकिर हुसैन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील फिदा हुसैन एक नामांकित वकील होते. 'आइने-दकन' नावाच्या कायदेविषयक पत्राचे ते संपादक होते. जाकिर यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले. इंग्रजी शिकविण्यासाठी घरी खास वेगळे शिक्षक येत असत. नवव्या वर्षी त्यांचे वडील फिदा हसैन निर्वतले. त्यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्या पूर्वजांच्या गावी प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील कायमगंज नामक कसब्यात राहायला आले. पाच वर्षांनंतर प्लेगने आईचाही मृत्यू झाला. तेव्हा ते परीक्षेसाठी आग्ऱ्याला गेले होते.

 

          आईच्या मृत्यूनंतर त्यांनी इटावामधून मॅट्रिक केले. इ. स. १९१८ मध्ये अलीगढच्या 'मुस्लीम अँग्लो ओरिएंटल कॉलेज'मधून इंग्रजी साहित्य व अर्थशास्त्रात
बी. ए. केले. नंतर कायदा व अर्थशास्त्र विषयात एम. ए. चा अभ्यास सुरू केला व त्याच कॉलेजात कनिष्ठ प्रवक्त्याच्या पदावर काम करू लागले; पण तेव्हाच गांधींच्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे सर्व सोडून दिले. त्यानंतर त्यांनी अलीगढमध्ये जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना केली.

 

         त्यानंतर काही वर्षांनी ते अर्थशास्त्रात संशोधन करण्यासाठी जर्मनीला गेले. तेथे प्रसिद्ध विद्वान सोम्बार्त यांच्या मार्गदर्शनाने काम करून डी. फिल, पदवी मिळवली. जर्मनीमध्ये गांधीवादी विचारांचे व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाले. तेथे जर्मन भाषेत व्याख्याने देऊन लिखाण केले. 


        
          इ. स. १९२६ मध्ये भारतात परतल्यावर डॉ. अन्सारी, हकीम अजमल खाँ, गांधी, नेहरू यांच्या सांगण्यावरून 'जामिया मिलिया' अलीगढहून दिल्लीला आणला व डॉ. जाकिर हुसैन तेथे उपकुलपती झाले. ते २२ वर्ष या पदावर होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेवटी महिना केवळ १०० रु. वेतनावर त्यांनी हे काम केले. लहान मुलांना शिकविणे, शिस्त, स्वच्छता, स्वत:चे काम स्वतःच करणे हे सर्व त्यांना आवडत असे. इ. स. १९४८ ते १९५६ दरम्यान अलीगढ विद्यापीठाचे डॉ. जाकिर हुसैन कुलपती होते. गरीब विद्यार्थ्यांना ते मदत करीत असत. इ. स. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण' हा सन्मान दिला. जुलै १९५७ मध्ये ते बिहार प्रदेशचे राज्यपाल झाले. इ. स. १९६२ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आणि इ. स. १९६७ मध्ये भारताचे तृतीय राष्ट्रपती निवडले.


 
           डॉ. जाकिर हुसैनना सर्व भारतीयांची एकता हवी होती. काँग्रेस-मुस्लीम लीगमधली भांडणे, मतभेद, राजकारणातल्या जाती-धर्माच्या सांप्रदायिक भावना त्यांना नको होत्या. इ. स. १९१६ मध्ये 'जामिया'च्या रजत जयंती सोहळ्यात त्यांनी सर्व भारतीयांना भांडणे सोडून एक होण्याचे आवाहन केले. त्या वेळी त्या कार्यक्रमाला गांधी, नेहरू, मौलाना आजाद, राजाजी, जिन्ना व लियाकत अली खान हे प्रमुख नेते उपस्थित होते.

 

           इ. स. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रांतामध्ये लोकप्रिय सरकारे बनली, तेव्हा गांधीजींनी डॉ. हुसैनना मुलांसाठी 'मूलभूत शिक्षणाचा' अभ्यासक्रम बनविण्याच्या समितीचे अध्यक्ष नेमले. त्यांनी बनविलेला अभ्यासक्रम सर्वांना खूप पसंत पडला. तेव्हा गांधींनी एक हिंदुस्तानी तालीम संघ बनवला. त्याचे प्रमुख डॉ. जाकिरना नेमले. 
 


           डॉ. जाकिरना सौंदर्य, सुंदर वस्तू, फुले, नव्या प्रकारचे दगड, चित्रे, रत्ने इ. चा खूप शौक होता. त्याचे एक संग्रहालय त्यांच्याकडे होते. हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन या धर्मांच्या भिंतींपेक्षा मानवतेवर त्यांचा विश्वास होता. १९६७ मध्य त्यांना भारताचे तिसरे राष्ट्रपती निवडून भारताने धर्मनिरपेक्षता दाखवली होती. ते गांधींनी दाखविलेल्या रस्त्याने जीवनाचा मार्ग चालत होते, असे त्यांनी सांगितले. जन्माने ते मुसलमान असले तरी मुळातले, विचारांनी भारतीय होते.

 

         अशा गुणसंपन्न, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय विचारांच्या डॉ. जाकिर हुसैन यांना भारत सरकारने इ. स. १९६३ मध्ये 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरविले. ३ मे १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.