ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - कुमारस्वामी कामराज

पोस्ट :  जानेवारी 10, 2020 07:12 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९७६ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते कुमारस्वामी कामराज यांची थोडक्यात माहिती. 


       कुमारस्वामी कामराज यांचा जन्म दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या विरुटपली नामक कसब्यात, त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या नाडार जातीच्या एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील कुमारस्वामी नाडार गावाचे मुखिया होते. आईचे नाव शिवकामी व आजी पार्वती अम्माल होती.


        वयाच्या ५ व्या वर्षी स्थानिक शाळेत त्यांचे शिक्षण सुरू झाले. लहान असतानाच त्यांचे आजोबा व वडील वारले. गरिबीमुळे शिक्षण सोडून कामाला जुंपून घ्यावे लागले. 'वंदे मातरम्', 'होमरूल' या चळवळींमुळे ते देशभक्तीच्या चळवळीत ओढले गेले. पण त्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने गावच सोडले व त्यांच्या लग्नाचा प्रयत्न केला; पण लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व अखेरपर्यंत ते अविवाहितच राहिले.


        डॉ. वरदराजुल नायडू, गांधीजी यांच्या चळवळींचा त्यांच्यावर फार परिणाम झाला. इ. स. १९३० मध्ये त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना २ वर्षांची कैद झाली. इ. स. १९३१ मध्ये कामराज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य निवडले गेले. इ. स. १९३५ मध्ये तमिळनाडू काँग्रेसचे मंत्री झाले व चार वर्षांनंतर इ. स. १९५४ पर्यंत ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. इ. स. १९४२ च्या 'भारत छोडो' आदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना ३ वर्षांची कैद झाली. इ. स. १९४७ मध्ये मद्रास विधानसभेचे सदस्य. इ.स. १९५१ ला संसद सदस्य व इ. स. १९५४ मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणत त्यांची निवड झाली.


        मुख्यमंत्री असताना कामराजनी हायस्कूलपर्यंतचे शिक्षण व खाण्याची व्यवस्था मोफत करून राज्याचा शैक्षणिक विकास केला. एकूणच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोणामुळे त्यांची प्रशासनिक कुशलता दिसून आली. ९ वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर त्यांनी पं. नेहरूंच्या सल्ल्याने जी योजना तयार केली, ती 'कामराज योजना' म्हणून प्रसिद्ध आहे. या योजनेनुसार इ. स. १९६३ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मग त्यांना अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून नेमले.


         अपार कष्ट, दृढ संकल्प, अतूट निष्ठा, जीवनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेली मेहनत या सगळ्या गुणांनी एका सामान्य गरीब मुलाला मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन पोहोचविले. भारतीय राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या. केवळ खुर्चीला चिकटून राजकारण करीत बसण्यापेक्षा खुर्ची सोडून राजकारण करणे जास्त चांगले, या मताचे ते होते. म्हणूनच त्यांनी 'कामराज योजना आखली व स्वत: त्याप्रमाणे वागले. गांधीजींनी सुरू केलेल्या अस्पृश्योद्धार आंदोलनात ते प्रथम सत्याग्रही झाले. मिठाचा सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते. 


       यासाठी त्यांना तुरुंगावासही झाला होता. लहान वयातला हत्तीबरोबरचा प्रसंग, चोराला पकडण्याचा प्रसंग अशा सारखे त्यांचे धैर्याने तोंड दिलेले प्रसंग प्रसिद्ध आहेत. आपल्या सत्तेच्या काळात लहानात लहान व्यक्तीलाही त्यांनी प्रेम व योग्य तो न्याय मिळवून दिला. गरीब, श्रमिक व दलित वर्गाला त्यांनी नेहमीच मदत केली. भारतीय राजकारणात श्री. कामराज यांच्यासारखे, कमी शिक्षण व इतर विशेष साधनांचा अभाव असतानासुद्धा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचूनही संपूर्ण निर्लिप्त राहणारे असे राजकारणी क्वचितच आढळतात.


       दि. २ ऑक्टोबर १९७५ ला अल्पशा आजाराने श्री. कामराज यांचा देहान्त झाला. त्या वेळेला त्यांच्याकडे विरुदपट्टीमध्ये मामाच्या एका झोपडीव्यतिरिक्त स्वत:चे असे काहीही नव्हते; पण भारतवासी गरीब जनतेकडून त्यांना मिळालेला सन्मान व प्रेमाची पुंजी मात्र निश्चितच होती. या त्यांच्या दीर्घकालीन देशसेवेसाठी भारत सरकारने श्री. कुमारस्वामी कामराज यांना इ. स. १९७६ मध्ये मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले.