ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - डॉ. पांडुरंग वामन काणे

पोस्ट :  जानेवारी 06, 2020 05:59 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६३ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते डॉ. पांडुरंग वामन काणे यांची थोडक्यात माहिती. 

 

         श्री. पांडुरंग वामन काणे यांचा जन्म दि. ७ मे १८८० रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम गावी त्यांच्या आजोळी झाला. आई-वडिलांची दोन्हीही कुटुंबे पूर्वजांपासून वैदिक धर्म पाळणारी होती. वडील वामनराव दापोलीत वकिली करीत होते. म्हणून बालक पांडुरंगाला शिकण्यासाठी मिशनरी शाळेत घातले. इ. स. १८९७ मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इ. स. १९०१ मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून 'भाऊदाजी संस्कृत पारितोषिक' मिळवून बी. ए. केले. त्यांना कित्येक शिष्यवृत्ती, विल्सन कॉलेजमध्ये दोन वर्षांसाठी दक्षिण फेलोशिप मिळाली होती. इ. स. १९०३ मध्ये इंग्रजी व संस्कृतमध्ये एम. ए. केले. इ. स. १९०८ मध्ये एल. एल. बी. प्रथम श्रेणीत पास केले.


          श्री. काणे यांना रत्नागिरीतल्या एका शाळेत महिना ६० रु.पगारावर अध्यापक पदावर नोकरी मिळाली. तिथे त्यांनी बी. टी. केले. तसेच अलंकार साहित्याचा इतिहास' हे पुस्तक लिहिले, त्याला सुवर्णपदक मिळाले. हे पुस्तक त्या वेळी एम. ए. च्या अभ्यासक्रमात लावले होते. 


          डॉ. काणे यांना ‘साहाय्यक इन्स्पेक्टर ऑफ स्कूल' पदावर बढती दिली; पण ती त्यांनी नाकारली. भारताच्या प्राचीन संस्कृतीशी संबंधित लेखांना आतापर्यंत दोन-तीन बक्षीसेही मिळाली होती. इ. स. १९०७ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन स्कूलमध्ये संस्कृत विभागाचे मुख्य पंडित म्हणून नेमणूक झाली. तिथे त्यांचे शोधकार्य चालू राहिले.


         इ. स. १९०८ मध्ये त्यांनी एल, एल. बी. केले, कॉलेज संस्कृत प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यांनी वकिली सुरू केली व एन एम.ही केले, त्या वेळी मुंबई हायकोर्टात आलेली एका विधवेची त्यांनी स्मृती व पुराणातील बिनतोड पुरावे सादर करून जिंकली य विधावेला न्याय मिळवून दिला.


         श्री. पां. वा. एक तळमळीचे समाजसुधारक होत. ते केवळ व्यावसायिक वकील नव्हते. समाजातील प्रचलित रूढी, अंधश्रद्धा, चुकीच्या पद्धती मुळातना उखडून फेकण्याची त्यांची वृत्ती होती, मुंबई ब्राह्मण समच सभापती म्हणून त्यांनी हरिजनांनाही गणपती उत्सवात सहभागी होण्याची अनुमती दिली, पण हे सदिग्रस्त धर्ममार्तंडांना रुचले नाही. त्यांनी कोर्टात केस केली. त्यांचे वकील मोहम्मद अली जिना होते. श्री. काणे यांनी शास्त्रीय बिनतोड पुरावे सादर करून ही केस जिंकली व स्वतः ब्राह्मण असूनही हरिजनांना गणपती उत्सवात सामील होण्याची वैधानिक अनुमती मिळवून दिली.


    इ. स. १९४२ मध्ये मुंबई सरकारने त्यांच्या विद्वत्तेची जाण ठेवून त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी दिली. अलाहाबाद विद्यापीठाने श्री. काणेना ‘डॉक्टार ऑफ लिटरेचर' ही पदवी दिली. इ. स. १९४७ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती झाले. इ. स. १९४६ मध्ये नागपूरला झालेल्या ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्सच्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते. इ. स. १९४८ मध्ये पॅरिस येथे बोलाविलेल्या प्राच्यविद्या परिषदेमध्ये डॉ. राधाकृष्णन् यांच्याबरोबर डॉ. काणे व सुनीती कुमार चटर्जी या दोघांनीही भाग घेतला होता. याच परिषदेच्या निमंत्रणावरून ते इस्तंबुल व केंब्रिजलाही गेले. इ. स. १९५३ ते ५८ व त्यानंतर दोन वेळा ते राज्यसभेचे मानद सदस्य होते. इ. स. १९५९ मध्ये त्याना भारतीय प्राच्यविद्येचे राष्ट्रीय प्राध्यापक नेमले गेले. या पदावरून ते भारताच्या कोणत्याही भागात जाऊन शोधकार्य करू शकत होते. त्यांच्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथनिर्मितीसाठी त्यांना याची गरज होती. 


         डॉ. काणे हे एक समाजसुधारक होते. अनेक सामाजिक कार्यात त्या सहभाग असे. रॉयल एशिया हिंदू सोसायटी, मंबई शाखा, मुंबई ब्राह्मण सभा मुंबईच्या इतर अनेक सामाजिक संस्थांत ते कार्यरत होते.


         डॉ. पां. वा. च्या मते, दुसरीकडे जे कुठेच मिळणार नाही. ते सगळे धर्मशास्त्रात मिळते. धर्मशास्त्र हा एक विशाल समुद्र आहे, ज्यात सगळे काही आहे. ते नेहमी एका लहानशा भाड्याच्या खोलीत राहत असत. पुस्तकांनी भरलेल्या कपाटांमध्ये स्वत:च्या धुंदीत धर्मशास्त्राच्या इतिहासात ते दंग होऊन जात. हे कामच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते. 'धर्मशास्त्राचा इतिहास' ६ हजार पानांचा मूळ इंग्रजी ग्रंथ लिहिण्याची कारणे म्हणजे पाश्चात्य विद्वानांना प्रभावित करणे. इंग्रजांचा हिंद धर्माबद्दल असलेला पक्षपाती दृष्टिकोन बदलणे. दुसरे म्हणजे इंग्रज व पाश्चात्य विद्वान असा अपप्रचार करीत होते की, 'भारताची कुठलीच प्राचीन संस्कृती नाही. हिंदूंनी केवळ काही तरी अपप्रचार चालविला आहे.' लॉर्ड मेकॉलेने संस्कृत साहित्याबद्दल एकदा टीका केली होती की, 'संस्कृत साहित्य हे एका कपाटाची बरोबरी करण्याइतकेही नव्हते.' या सगळ्या टीकेमुळे, दृष्टिकोणांमुळे डॉ. पांडुरंग वामन काणे हे पेटून उठले. त्यांनी या सर्वांना उत्तर देऊन, हिंदू धर्माविषयीचा जगाचा दृष्टिकोण बदलण्याचा विडा उचलला. तशी शपथ घेतली. यासाठी आपली वकिली सोडली.

 

          आयुष्याची २५ वर्षे निष्ठेने रात्रंदिवस सतत कठोर मेहनत केली. यासाठी जर्मन व फ्रेंच भाषा शिकल्या. भारतीय विद्या व शास्त्राला विदेशी विद्वानांपर्यंत पोहोचवून त्यांचा चुकीचा दृष्टिकोण दूर करून, हिंदू धर्म संस्कृतीचा सत्य इतिहास जगाच्या प्रकाशात आणण्यासाठी ६००० पानांचा 'धर्मशास्त्राचा इतिहास' इंग्रजी भाषेमध्ये लिहून काढला. या तपश्चर्येने ते आधुनिक ऋषी झाले. आपल्या ग्रंथात त्यांनी शिलालेख, काव्य, नाटके आणि अन्य साधनसामग्रीच्या आधाराने हे सिद्ध केले की, 'हिंदू धर्माचा विकास हा ऋग्वेद काळापासून होतो आहे. 'या प्रदीर्घ, वैविध्यपूर्ण काळामध्ये अनेक आघात सहन करून, पचवून हिंदू धर्म अधिकाधिक शक्तिशाली व परिपक्व होत आलेला आहे.'


           याचबरोबर श्री. काणे यांनी आणखी दोन महत्त्वाचे ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले- 'संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास' व 'भारतीय रीतीरिवाज व आधुनिक विधान. या ग्रंथलेखनावरून एकच व्यक्ती अत्यंत दुष्कर, दुर्लभ कार्यही करू शकते, हे दिसून येते. १९१८ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून हिंदू धर्माची नवी व्याख्या प्रस्तुत केली आणि सांगितले की, 'हिंद धर्म हा नेहमी विकसनशील व परिवर्तनशील राहिलेला आहे.' वेगवेगळी विद्यापीठे डॉ. काणेंना अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करू लागली. त्यांच्या शोधकार्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळतच होत्या. जीवनभर ते वकिली, शोधकार्य व भाषणे देणे हे करीत होते.


    'धर्मशास्त्राचा इतिहास' या रूपाने त्यांनी एक अमर ग्रंथ निर्माण केला. या ग्रंथनिर्मितीसाठी महान धैर्य, विद्वत्ता व तळमळ आवश्यक होती. सारे जग त्यांच्या या अजोड ग्रंथाची कधीच उपेक्षा करू शकणार नाही व विसरूही शकणार नाही. या त्यांच्या अथक साहित्य सेवेचा सन्मान म्हणून भारत सरकारने इ. स. १९६३ मध्ये देशाचा सर्वोच्च किताब 'भारतरत्न' डॉ. पांडुरंग वामन काणे यांना देऊन त्यांचा सन्मान केला. 


        दि. १८ एप्रिल १९७२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी, हा धर्मप्राण ऋषी डॉ. पांडुरंग वामन काणे हे जग सोडून गेला. तेव्हा संशोधित साहित्याचे युगच त्यांच्याबरोबर संपले असे वाटले. त्यांचे हे ऋषितुल्य पवित्र जीवन संपूर्ण विश्वाला नेहमीच मार्गदर्शन करेल. ही दुनिया इतर माणसांचे स्मारक उभारते; पण 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथरूपाने त्यांनी स्वत:चे स्मारक उभारले आणि मग ते या धर्मशास्त्राच्या अनंतात विलीन झाले.