ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - पुरुषोत्तम दास टंडन

पोस्ट :  जानेवारी 01, 2020 07:17 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६१ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते पुरुषोत्तम दास टंडन यांची थोडक्यात माहिती. 

 

          राधास्वामी मताचे अनुयायी श्री. शाळिग्राम टंडन यांच्या प्रयागमधल्या घरी १ ऑगस्ट १८८२ रोजी पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म झाला. वयाच्या १५ व्या वर्षी, मुरादाबाद येथील श्री. नरोत्तमदास यांची १२ वर्षांची सरळ स्वभावाची धर्मपरायण मुलगी चंद्रमुखी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.


         पुरुषोत्तमदास टंडनजींना 'राजर्षी' म्हटले जात असे. मौलवी साहेबांकडून देवनागरी शिक्षण घेऊन सी. ए. वी. शाळेमधून इ. स. १८९७ मध्ये एन्ट्रन्स परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत पास केली. मग कायस्थ पाठशाळा इंटर कॉलेजमधून इंटर पास करून इ. स. १९०४ मध्ये बी. ए. झाले. वकिलीचा अभ्यास केला. नंतर इतिहास विषयात एम. ए. केले. अभ्यासाबरोबरच क्रिकेट व बुद्धिबळ या खेळातही ते प्रवीण होते. रफी अहमद किडवई यांच्याबरोबर तासन्तास बुद्धिबळ खेळत असत.


           कुटुंब, राष्ट्र, समाज सर्वांसाठी असलेले आपले कर्तव्य ते पार पाडीत होते. सन १९०८ मध्ये अलाहाबादला वकिली सुरू केली. कामाची तळमळ व सत्यनिष्ठेमुळे वकिलीमध्ये ते खूप यशस्वी झाले. हायकोर्टातही त्यांची प्रॅक्टिस होती. 


         वकिलीबरोबरच हिंदी प्रचाराचे काम ते करीत. बाळकृष्ण भट्ट, पं. मदनमोहन मालवीय यांसारख्या विद्वानांच्या सल्ल्याने त्यांनी हायकोर्टातील वकिली सोडून नाभा नरेशांकडे कायदा मंत्री झाले. विदेश मंत्रीही झाले. इ. स. १९१८ मध्ये त्यांना 'साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाला जाण्यासाठी नाभा नरेशानी सुट्टा नाकारली, म्हणून त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि अधिवेशनात भाग घेऊन पुन्हा हायकोर्टात पॅक्टिस सुरू केली. 


         इ. स. १९२० मध्ये स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय आंदोलनात वकिली सोडून टंडनजी उतरले. त्यामुळे इ. स. १९२१ मध्ये त्यांना पहिल्यांदा कारागृहात जावे लागले. एकूण सात वेळा त्यांना कैद झाली. जेलमधून सुटल्यावर लाला लजपतराय यांच्या सांगण्यावरून पंजाब नॅशनल बँकेत ते मॅनेजर झाले. तेव्हा टंडनजी 'साहित्य संमेलनात' भाग घेत असत, पण त्यांना राजकीय चळवळीत सक्रीय रूपात सहभागी होता येत नव्हते, लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर मात्र गांधीजींच्या सांगण्यावरून पंजाब नॅशनल बँकेच्या मॅनेजरपदाची नोकरी सोडून ते लोकसेवा मंडल (सव्हॅटस् ऑफ द पीपल सोसायटी) या संस्थेचे अध्यक्ष झाले. तेव्हा अर्थातच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. अलाहाबादच्या रहिवाशांनी त्यांना नगरपरिषदेचे चेअरमन बनविले. त्या वेळी प्रांताच्या लखनौहून प्रयागला आलेल्या गव्हर्नरना अंघोळीच्या बाथ-टबला पाणी नाकारून टंडनजींनी आपला स्पष्टवक्तेपणा व निर्भीड वृत्ती दाखविली. कारण त्या काळात प्रयागला पिण्याच्या पाण्याचा मोठा दुष्काळ होता.


        हिंदी साहित्य व भारतीय राजनीती दोन्हीमध्ये ते समान रूपाने कार्यरत होते. टंडनजींचे सौम्य व्यक्तिमत्त्व, साधूवृत्ती, अभ्यास, परिश्रम, त्याग व निष्ठा या गुणांमुळे ते खूप लोकप्रिय होते. त्याच काळात त्यांनी 'प्रयाग विद्यापीठाची स्थापना केली. इ. स. १९२३ मध्ये ते संमेलनाचे अध्यक्ष झाले; तर आचार्य महावीरप्रसाद द्विवेदी स्वागताध्यक्ष होते. टंडनजींनीच संमेलनाची प्रथम नियमावली बनविली. हिंदीला देशाच्या राजभाषेचे स्थान देण्यासाठी गांधीजी व राजेंद्रबाबूंबरोबर महत्त्वाचे कार्य करत राहिले. हिंदी भाषेला देशामधले आजचे स्थान मिळण्यामध्ये पुरुषोत्तमदास  टंडन यांचा सिंहाचा वाटा आहे.


          इ.स. १९३०-३१ मध्ये 'किसान आंदोलनाचे ते पुढारी होते. त्यांच्यामध्ये नवजागृती निर्माण करून, त्यांच्या सभा घेऊन, त्यांच्या समस्या, अडचणी या संदर्भात शेतकऱ्यांना खरीखुरी मदत करणारे, संपूर्ण देशात शेतकरी आंदोलन पसरविणारे, ते बळीराजाचे त्राता झाले. उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष, भारतीय काँग्रेस मिटी कार्यालय, विधान परिषद प्रत्येक पदावर असताना, प्रत्येक ठिकाणी, टंडनजींनी हिंदी भाषेच्या प्रचार, प्रसार व विकासासाठी कार्य केले. 


      दि. १५ एप्रिल १९४८ रोजी 'देवराहा बाबा' द्वारा प्रयागच्या विशाल जनतेसमोर टंडनजींना 'राजर्षी' पदवी दिली गेली. त्यांना कुठल्याच पदाचा मोह कधीही नव्हता. राज्यपाल पदही त्यांनी नाकारले. हिंदी भाषेवर तर त्यांचा पूर्ण विश्वास होता. खऱ्या अर्थाने ते ऋषिजीवन जगले. इ. स. १९१० पासून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत टंडनींनी हिंदी साहित्य संमेलनाच्या हिताचे कार्य करून 'संमेलन विधेयक' बनवून आपली साधना व मेहनतीने 'हिंदी साहित्य संमेलन' ही राष्ट्रीय स्तराची संस्था बनविली. हे लक्षात घेऊन दिल्ली प्रादेशिक साहित्य संमेलनाने प्रयागमध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दि. २३ ऑक्टोबर १९६० रोजी त्यांना अभिनंदन ग्रंथ भेट दिला. तीच त्यांच्या जीवनकार्याची खरी पावती होती. 


         टंडनजी नवीन परंपरा व सिद्धान्त निर्माण करणारे होते. त्याग व तपश्चर्या त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते. आत्मसन्मान व सिद्धान्ताचे रक्षण हे त्यांचे ब्रीद होते. हिंदी व टंडनजी एक दुसऱ्यापासून भिन्न नव्हतेच. टंडनजी अतिशय तत्त्वनिष्ठ होते. तत्त्वपालनासाठी ते काहीही करायला पहिल्यापासून निडरपणे तयार असत. स्वातंत्र्यानंतरही कुठल्याही पदाच्या प्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. उलट ओरिसाचे राज्यपालपद नाकारले. तरीही स्वातंत्र्यानंतर बराच काळ ते उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते.


       राष्टभाषा हिंदीचे टंडनजी उद्धारकर्ते होते. ते नेहमीच 'हिंदी राष्ट्रभाषा व्हावी व लिपी देवनागरी असावी.' या मताचे समर्थक होते व सतत प्रयत्नशील होते. पं. मालवीयजींसमोर त्यांनी भारत देशात हिंदीची प्रतिष्ठा वाढविण्याचा संकल्प केला होता व तो अखेरपर्यंत पाळला. 'हिंदी साहित्य संमेलनासाठी नियमावली, हिंदी पत्र अभ्युदयचे संचालन, 'साहित्य भवन'ची स्थापना, अलाहाबादमध्ये हिंदी विद्यापीठा'ची स्थापना, भारतीय संविधानात हिंदीला यथायोग्य स्थान' ही सर्व कार्ये पुरुषोत्तमदास टंडन अखेरपर्यंत करत राहिले.


         शेतकऱ्यांचा प्रश्न, जमीनदारांचा त्यांना होणारा जाच या विरुद्ध सतत आवाज उठवत राहिले. शेतकरी सभेचे पहिले सभापती तेच होते. स्वातंत्र्यानंतर जमीनदारी समूळ नष्ट करण्याची सचना सरकारसमोर मांडली. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात सर्वांत प्रथम जमीनदारी नष्ट झाली. टंडनजी विद्यार्थी जीवनापासूनच 'साधी राहणी व उच्च विचारसरणी'चे होते. भारतीय संस्कृतीचे पुजारी होते. पाश्चात्य राहणी त्यांना कधीच पटली नाही. नेहमीच त्यांचे खादीचे कपडे व साधे जेवण असे. अहिंसावादी होते. दूधही ते पीत नसत. विदेशी वस्तू, औषधे याबद्दल त्यांना अत्यंत चीड होती.


        भारताच्या फाळणीच्या ते विरुद्ध होते. म्हणूनच १५ ऑगस्ट, १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर ते स्वातंत्र्य समारंभात सामील झाले नाहीत. लालबहादूर शास्त्रींनी टंडनजींना 'उत्तर प्रदेशचे गांधीजी' म्हटले होते. कारण ते त्यागी व आदर्शवादी होते. भारत सरकारने आदर्शवादी, अहिंसावादी, भारतीय संस्कृती व हिंदीचे कट्टर समर्थक राजर्षी पुरुषोत्तम टंडन यांना इ. स. १९६१ मध्ये 'भारतरत्न' घोषित केले. दि. १ जुलै १९६२ ला सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन झाले.