ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - वराहगिरी वेंकट गिरी

पोस्ट :  जानेवारी 09, 2020 07:06 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९७५ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते वराहगिरी वेंकट गिरी यांची थोडक्यात माहिती. 

        वडील श्री. जोगैया पंतुलु व आई श्रीमती वेंकट सुब्बया यांच्या पोटी दि. १० ऑगस्ट १८९४ रोजी ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यामधील बहरामपूर नामक कसब्यात, वराहगिरी वेंकट गिरी यांचा जन्म झाला. सात मुलगे व पाच मुली यांच्यातील हा दुसरा मुलगा. श्री. जोगैया पंतुलु एक नामांकित वकील होते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, खाते-पिते कुटुंब होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. नंतर मद्रासला सीनियर केंब्रिज परीक्षा पास करून, बहरामपूरच्या काली कोटा कॉलेजमधून स्नातक (ग्रॅज्युएट) पदवी घेतली. इ. स. १९१३  मध्ये वडिलांनी गिरींना कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्लंडला पाठविण्याचे ठरविले. पण इंग्लंडऐवजी ते आयर्लंडला अभ्यासासाठी गेले. 


        धैर्य, कुशलता, समाजसेवा, जनसेवा, असीम भक्तिभाव, पुस्तकांविषयी आदर-प्रेम, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे, मदिरा व मांस यापासून आमरण दूर राहणे हे सर्व ते लहानपणापासूनच शिकत होते. परदेशात जाताना हा देशभक्त तयार होता. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी बहरामपूरमध्ये एक ग्रंथालय तयार केले होते व त्यात दोन हजार पुस्तके जमविली. आयर्लंडमध्ये त्यांनी वकिलीबरोबरच प्रवासी भारतीयांची संघटना बनवली. 'अराजक समाज' या संघटनेचे गिरी सक्रीय सदस्य होते आणि 'इंडिया सोसायटी' या संघटनेचे ते मंत्री होते. आयर्लंडच्या या 'इंडिया सोसायटी'ने भारतीय स्वतंत्रता संग्रामात फार महत्त्वपूर्ण काम केले. आयर्लंडमध्ये असताना गिरींनी  'दक्षिण आफ्रिकेतील आतंक' नावाचे एक पुस्तक लिहिले. यात त्यांनी आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराची सर्व माहिती स्पष्ट करून सांगितली होती. मग हे पुस्तक गुप्त रूपाने छापून त्याच्या प्रती भारतात पाठविल्या. पण मुंबईला त्यांचे पार्सल पकडले गेले आणि इंग्रजांनी सर्व पुस्तके जप्त केली.


        भारतात परतल्यावर मद्रासच्या हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. त्यांची वकिली खूप चांगली चालत होती. इंग्रज सरकारने त्यांना मुन्सफ पद स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्यांनी ही सरकारी नोकरी ठोकरली. कारण भारताला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत सरकारी नोकरी न करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. १९२१ मध्ये वकिली सोडून त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांना कैद झाली. कैद्यांना मिळणारी वाईट वागणूक व जेवण या विरोधात तुरुंगात त्यांनी भूक-हरताळ केला. त्यामुळे राजकीय कैद्यांना मिळणारे अन्न व वागणूक यांत सुधारणा झाली. तीन महिन्यांच्या कारावासानंतर खडगपूरच्या रेल्वे कारखान्यातील कामगारांच्या कायदेशीर मागण्यांसाठी १४ फेब्रुवारी १९२७ ला गिरींच्या नेतृत्वाखाली फार मोठा हरताळ केला. यात ३५००० कामगार सहभागी झाले होते. हा हरताळ खूपच यशस्वी झाला आणि श्री. वराहगिरी वेंकट गिरी श्रमिक नेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला' जन्म दिला. इ. स. १९२७ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या संमेलनात 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. इ. स. १९३२ मध्ये भारतीय श्रमिक महासंघाच्या प्रथम अधिवेशनात गिरींनी अध्यक्षीय भाषण केले होते.


         इ. स. १९३७ मध्ये गिरी मद्रास विधानसभेत निवडून आले व २ वर्ष श्रम व उद्योगमंत्री झाले. नंतर इ. स. १९४६ मध्ये भद्रा विधानसभेसाठी निवडले गेले व वर्षभर श्रममंत्री होते. मग मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन श्रीलंकेमध्ये भारतीय उच्चायुक्त पदग्रहण केले. इ. स. १९६२ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन श्रममंत्री झाले. इ. स. १९५७ मध्ये गिरींनी उत्तर प्रदेशाचे राज्यपाल पद स्वीकारले. नंतर केरळ व म्हैसूर राज्यांचेही ते राज्यपाल झाले. त्यानंतर १३ मे १९६७ ला उपराष्ट्रपती झाले. दि. २४ ऑगस्ट १९६९ रोजी भारताच्या राष्ट्रपतिपदाची शपथ त्यांनी घेतली.


     आपल्या कार्यकाळात समाजवादी राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी अनेक कायदे केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, कमाल जमीनधारणा मर्यादा कायदा, भूतपूर्व नरेशांचे प्रिवी पर्स समाप्ती, प्रत्यक्ष भारत-पाक युद्धाच्या वेळी सीमेवर जाऊन सैनिकांना प्रोत्साहन देणे, पूर्व पाकिस्तानात जाऊन बांगलादेशाची निर्मिती अशी अनेक विधायक कामे श्री. गिरींनी पार पाडली. इ. स. १९७५ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान देऊन सरकारने श्री. वराहगिरी वेंकट गिरी यांना गौरविले. ६५ वर्षांच्या जनसेवेनंतर दि. २४ जून १९८० रोजी गिरी स्वर्गस्थ झाले.