By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कोलंबोमध्ये सिवोय सिनेमाजवळ बुधवारी सकाळी आणखी एक स्फोट झालाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विस्फोटकं मोटारसायकलवर ठेवण्यात आली होती. या स्फोटात अद्याप कुणीही जखमी झाल्याची अथवा मृत झाल्याची माहिती नाही.
रविवारी ईस्टरच्या दिवशीच झालेल्या आत्मघातकी साखळी बॉम्बस्फोटात प्राण गमावणाऱ्यांची संख्या ३५९ वर पोहचलीय. या प्रकरणी २४ संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली होती. एकूण सात आत्मघातकी हल्लेखोरांचा यात सहभाग होता. तीन चर्च आणि तीन पंचतारांकीत हॉटेलात हे स्फोट झाले. ईस्टरची प्रार्थना सुरू असताना सकाळी ८.४५ वाजता हे स्फोट झाले. कोलंबो आणि बाट्टीकाओला या दोन शहरात हे स्फोट घडवून आणण्यात आले. सेंट अँथनी चर्च, सेंट सेबेस्टीअन चर्च ही दोन कोलंबोमधली चर्च आणि बाट्टीकोआला भागातलं एक चर्च इथे तीन स्फोट झाले तर शांग्री ला, सिन्नामॉन ग्रँड आणि किंग्जबरी या तीन पंचतारांकीत हॉटेलात तीन स्फोट झाले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी या बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. आयसिसने आपल्या अमाक न्यूज वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली. अबु उबायदा, अबु अल मुख्तार, अबु खलील, अबु हम्जा, अबु अल बारा, अबु मोहम्मद आणि अबु अब्दुल्लाह अशी या हल्लेखोरांची ओळख पटलीय. कुणी हल्ला केला, याचाही उल्लेख इस्लामिक स्टेटनं या दाव्यात केलाय.
श्रीलंकेच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी, न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च हल्ल्याचा बदला म्हणून श्रीलंकेत बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा दावा संसदेत केलाय. १५ मार्च रोजी ब्रेन्टन टॅरेंट या हल्लेखोराने ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर हल्ला करून बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला होता. स्थलांतरित मुसलमानांना हकलण्यासाठी आणि युरोपच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा हल्ला केल्याचे ब्रेन्टन टॅरेंटने सांगितले होते.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी....
अधिक वाचा