By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 09:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रेल्वे पोलिसांनी एका अशा इसमाला अटक केली आहे, जो लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देण्याच सिंडिकेट चालवत होता. इतकच नाही तर त्याने ज्या प्रवाशांना खोटे क्यूआर कोड पास बनवून दिले त्यांना सुद्धा रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खोटे क्यूआर कोड पास बनवल्या प्रकरणी एकूण सहा गुन्ह्यांची नोंद झाली असून हे सर्व क्यूआर कोड अनिस राठोडकडून बनवण्यात आले होते.
वडाळा जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनिस राठोड मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात राहत होता. तिथूनच तो लोकांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देत होता. ज्याच्या मोबदल्यात तो त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये घेत होता. हे सर्व तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा वडाळा GRP ने वडाळा स्टेशन वरून दोघांना खोटे क्यूआर पास असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं. या दोघांकडून अनिस राठोडच नाव समोर आलं. अनिस कडूनच यांनी क्यूआर कोड बनवून घेतले होते. वडाळा रेल्वे पोलिसांनी अनिस राठोडच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांनी त्याच्याकडून कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त केरून त्याला अटक केली. ज्या लोकांनी त्याच्याकडून क्यूआर कोड पास बनवून घेतले होते, ते छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरु केली होती. आणि याचाच फायदा घेण्यासाठी फेक क्यूआर कोड बनवणारी टोळी सक्रिय झाली. अनिस राठोडने आतापर्यंत 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले असल्याची कबुली दिली आहे.
रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हे रॅकेट अजून किती दूरपर्यंत पसरलं आहे याचाही शोध घेत आहेत. जेणेकरून या रॅकेटला उध्वस्त केलं जाऊ शकेल. अनिस राठोडवर इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या सर्वांची माहिती घेत आहेत.
अनिसकडून पास बनवणाऱ्यांमध्ये मस्जिद बंदर येथे काम करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं अनिसकडून पोलिसांना सांगण्यात आलं आहे. रेल्वे सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरु असल्यामुळे इतर नागरिकांसाठी प्रवास करण्यास मनाई आहे. ज्यामुळे लोकांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. मात्र या प्रवासात लोकांना दिवसाचे 6 ते 7 तास घालवावे लागत आहेत. तर कामावरचे तास वेगळेच. ज्यामुळे वेळ वाचवण्यासाठी लोक खोटे क्यूआर कोड बनवण्यासाठी अनिसच्या संपर्कात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हावळे आणि चव्हाण, पोलीस हवालदार प्रवीण एवळे, सागर रणवारे, पोलीस शिपाई तुषार कवठेकर सागर गायकवाड या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून क्यूआर कोड रॅकेट उध्वस्त करण्यात या पथकाला यश आले आहे.
देशाला हादरवणाऱ्या हाथरस गॅंगरेप आणि हत्याकांड घटनेनंतर देशभरातून संताप ....
अधिक वाचा