By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी रोख मदतीसह इतर काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी यावेळी समोर आली आहे. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडत निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना मारहाण केली असून यात एक पूरग्रस्त महिला आणि एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. यावेळी एका महिला पत्रकारालाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेक छावण्या बनवण्यात आल्या आहेत. या छावण्यात पूरग्रस्तांना जेवणासह इतर आवश्यक गोष्टींची सुविधा पुरवण्यात येत. सांगलीतही मराठा सेवा संघ या ठिकाणी एक खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. त्या ठिकाणी जवळपास 500 ते 550 लोक राहत आहे.
पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार या ठिकाणी आल्या. त्यांनी या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही असा दावा करायला सुरुवात केली. त्यांचा हा दावा खोडून टाकण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूरग्रस्तांबाबत विचारणा केली. त्यावेळी आम्ही अशाप्रकारे कोणतीही तक्रार केलेली नाही असे पूरग्रस्तांनी सांगितले. यानंतर त्या नगरसेविकेला संताप अनावर झाला. त्यांनी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक पूरग्रस्त महिला, महिला पत्रकार आणि एक कार्यकर्ता असे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या नगरसेविका आणि तिच्या कार्यकर्त्यांनी या खासगी पूरग्रस्त निवारा केंद्रातील मदतीचे सामानही घेऊन गेल्याचा दावा मराठा सेवा संघांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.
दक्षिणी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश पार्ट-टू भागात एका प्रसिद्ध खाजगी शाळेत सफ....
अधिक वाचा