By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
उत्तर प्रदेशच्या हाथरस इथं झालेल्या घटनेतून देश अजूनही बाहेर आलेला नाही. अशात पुन्हा एक हादरवून सोडणारी बलात्काराची घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. तरुणीचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर 9 नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तब्बल 8 दिवस पीडितेवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. ही घटना राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातली (Churu District) आहे. आरोपींनी राजगड, जयपूर आणि नीमकाथाना या परिसरात तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नराधमांना पोलिसांचा धाक नसल्याची टीका जिल्ह्यातून होत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या मुद्द्यावर गहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट करत जंगलराज सुरू असल्याची टीका केली आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलिसांनी विक्रम पूनिया, देवेंद्र पूनिया, बंटी, राहुल, शुभम, हेमंत, मुकेश गुर्जर आणि आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पीडिता सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राजगडमधून केलं तरुणीचं अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने राजगड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ती 24 डिसेंबर रोजी राजगड बस स्थानकात उभी होती. यावेळी तिला विक्रम पूनिया भेटला. विक्रम आणि पीडितेची आधीपासूनच ओळख होती. विक्रमने तिला SSC फॉर्म भरण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. कारमध्ये आधीच देवेंद्र पूनिया आणि आणखी दोन मुलं बसली होती. आरोपींनी पीडितेला राजगडमध्ये एका खोलीत बंद केलं आणि चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला.
व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल
पीडितेला जयपूरमधल्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. जिथे तिच्यावर अत्याचार करत तिला तोंड उघडलं तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. यानंतर पीडितेला नीमकाथाना इथल्या एका गावी नेलं. जिथं नराधमांनी वारंवार तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी 1 ऑक्टोबरला याच परिसरातून पीडितेला सोडवलं होतं आणि तिच्या कुटुंबियांकडे सोपवलं. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोळसा मंत्रीपद भूषव....
अधिक वाचा