By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2020 08:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
ऐन कोरोनाच्या काळात झांबियात व्यवसाय असलेल्या दोन भारतीयांनी पुणे शहरातील व्यावसायिकांना तब्बल पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित व्यवसायिकांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पुण्यातील व्यापाऱ्यांकडून आधी शालेय वह्या, पीव्हीसी पाईप, सॅनिटायझर, इलेक्ट्रीकल वस्तू आदींची मागणी केली. मात्र, पैसे अदा करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी हात वर केले आणि पोबारा केला.
एजाज रियाज शेरकर (49, रा. भंडारी लॅण्डमार्क, कोंढवा), प्रविण वसंत माटे (शोभा पार्क, कर्वेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांचाही झांबियात व्यवसाय आहे. याप्रकरणी विकास मनोहर सावंत (59, रा. मॉडेल कॉलनी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार मनोहर सावंत यांचा इंडवे इंटरनॅशनल नावाचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. ते पत्नीसह भागीदारीमध्ये घरातूनच हा व्यवसाय करतात. त्यांची आरोपी एजाज शेरकर बरोबर 2016 मध्ये ओळख झाली होती. शेरकर याने झांबिया येथे राहण्यास असून भारतातून वेगवेगळ्या मालाची आयात करुन विक्री करत असल्याचे सांगितले.
आरोपीने आपला झांबियात मोठा व्यवसाय असून तक्रारदार सावंत यांच्याकडे भारतातून माल निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवला. शेरकर याने सावंत यांच्याशी वारंवार संपर्क करुन त्यांना निर्यातीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे घेऊन माल न पाठवता फसवणूक केली. याप्रकारे आरोपींनी विकास सावंत यांच्याबरोबर इतर आठ जणांचीही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
या तक्रारीनंतर विदेशात व्यवसाय असल्याची बतावणी करुन अनेक व्यवसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोरोना काळात कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट ....
अधिक वाचा