By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 09:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
दोन लाख रुपयांची लाच घेताना कोल्हापुरात ‘बडा मासा’ एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मूळ सोलापूरचे असलेले 45 वर्षीय प्रदीप सुर्वे हे कोल्हापुरात मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मत्स्य उत्पादकाला शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी सुर्वे यांनी लाच मागितल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे आणि मासे उत्पादन करण्यासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्याबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेली पूरग्रस्तांसाठीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रदीप सुर्वे तक्रारदाराकडून लाच घेत असल्याचा आरोप आहे. कोल्हापुरात 2019 मध्ये झालेल्या महापुरात संबंधित तक्रारदाराचं मोठं नुकसान झालं होतं.
भरपाई मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांचा हप्ता प्रदीप सुर्वे स्वीकारत होते. त्यावेळी रमण मळा येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. कोल्हापुरात मत्स्य व्यवसाय कार्यालयातील लाचखोरीतील बडा मासा पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात सापडल्याचे बोलले जाते.
काय आहे प्रकरण?
कोल्हापुरात 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तक्रारदाराच्या जलाशयातील मासे आणि मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. महसूल विभागाने तक्रादाराच्या संस्थेच्या जलाशयाचा पंचनामा केला होता. त्यानुसार नुकसान भरपाईचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्सविभाग कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.
राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर त्यांना 26 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. ती सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाच्या खात्यावर जमा झाली. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुर्वे यांनी एकूण नुकसान भरपाई पैकी 40 टक्के म्हणजे दहा लाख रुपयांच्या रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच न दिल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही असे सुर्वे यांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला. तडजोडीत ही रक्कम पाच लाखांवर आली, तर दोन लाखांचा पहिला हप्ता गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
खोट्या टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना दिवसेंदिवस अधिक माहीती आणि पुरावे ....
अधिक वाचा