By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोरोना काळात कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षकांनी हा प्रकार उघडकीस आणत रुग्णालयाला खासगी दराप्रमाणे बिल आकारणी करायला भाग पाडलं आहे. या कारवाईनंतर रुग्णाचं बिल एक-दोन हजाराने नाही, तर तब्बल दीड लाखांनी कमी झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागील दीड महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्ण वाढीचा वेग देखील जास्त असल्याने आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णलयं हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे तीव्र आणि अतितीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांना आता खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
याचाच फायदा घेत खासगी रुग्णालयांनी आता रुग्णांची जणू पिळवणूकच सुरु केली आहे. वारंवार याबाबतच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांच्या बिल तपासणीसाठी लेखापरीक्षक नियुक्त केले. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची कशी फसवणूक केली जाते याचे एक-एक उदाहरणच समोर येत आहेत.
शुक्रवार पेठेत राहणाऱ्या एका कोरोना रुग्णाला शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेतले. पाच दिवसाच्या उपचारानंतर या रुग्णालयाकडून अडीच लाखांचं बिल रुग्णाला देण्यात आलं. यावर नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखा परीक्षण केले असता रुग्णालयाने तब्बल एक लाख 65 हजार रुपयांची जादा आकारणी केल्याचे समोर आलं.
पीपीई किट, रुम चार्जेस, डॉक्टर आणि नर्सेस व्हिजिटसाठी दुपटीहून अधिक चार्जेस आकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. बिल तपासणीसाठी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांनी आतापर्यंत अशा पद्धतीने शहरातील पाच ते सहा खासगी रुग्णालयांचा पर्दाफाश केला आहे.
कोरोनामुळे मानसिक दृष्ट्या खचलेल्या रुग्णांची अवास्तव बिल आकारणी करत खासगी रुग्णलयं त्यांना आर्थिक दृष्ट्या ही त्रासच देत आहेत. वारंवार आवाहन करुनही खासगी रुग्णालयांची मनमानी सुरुच आहे. त्यामुळे आता केवळ सूचना देण्यापेक्षा अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचाची गोळ्या घालू....
अधिक वाचा