By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2020 11:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना सहकार्य, तसेच तपासादरम्यान संशयास्पद भूमिका वाटल्याने एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सदर कारवाई केली आहे. हे दोन्ही अधिकारी कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिका पदुकोण हीची मॅनेजर करिश्मा प्रकाश या प्रकरणाशी संबंधित होते
निलंबनाबरोबरच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश ही समीर वानखेडे यांनी दिले आहेत. ड्रग्ज प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची तत्काळ सुटका आणि इतर एका आरोपीवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा दावा या अधिकाऱ्यांविरोधात करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांसोबत विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांना देखील भारतीच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाचे नेमके कारण
ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. 22 नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर केलं असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायलयीन कोठडी होताच दोघांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन मिळाला. या जामीनाच्या सुनावणी वेळी सदर प्रकरणाशी संबंधित अधिकारी कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळे भारतीच्या जामीन अर्जाला विरोध केला गेला नाही. तसेच, त्यांनी भारतीच्या जामीन अर्जाबाबत एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही कळवलं नाही
तर, दुसरीकडे करिश्मा प्रकाश हिच्या तपासाबाबतही संबंधित अधिकाऱ्याने आरोपीला सहकार्य होईल, या दृष्टीने काम केलं आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरीदेखील एनसीबीकडून धाड टाकण्यात आली होती.
या छाप्यादरम्यान करिश्मा प्रकाशच्या घरी भारतात प्रतिबंधित असलेल्या सीबीडी ऑइल या ड्रग्जच्या 3 बाटल्या सापडल्या होत्या. त्याचबरोबर गांजा ही सापडला होता. यानंतर करिश्मा प्रकाश हिला तात्काळ अटक होणं आवश्यक होतं. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ कारवाई केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, करिश्मा ही अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई कोर्टात गेली आणि गेल्या एक महिन्या पासून ती तात्पुरत्या अटक पूर्व जामिनावर मुक्त फिरत आहे. संबंधित अधिकाऱ्याने तिला तात्काळ अटक करणं आवश्यक होतं. मात्र, तसं झालं नाही. हा ठपका या दोन्हीही संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या कर....
अधिक वाचा