By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : lucknow
लखनऊ : उत्तर प्रदेशात फरुखाबादमध्ये एनएसजी कमांडोंनी आरोपी सुभाष बाथम या आरोपीला अखेर चकमकीत ठार मारून त्याने ओलीस ठेवलेल्या २३ मुलांची सुखरूप सुटका केली. हे थरारनाट्य सुमारे ११ तासांनी संपुष्टात आले. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस आणि एनएसजी पथकाला उत्तर प्रदेश सरकारने १० लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, आरोपी सुभाष बाथम याने दोन वर्षापूर्वी आपल्या एका नातेवाईकचा खून केला होता. या गुन्ह्यात तो तुरुंगात होता. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्याला एक १० वर्षाची मुलगी आहे. काल मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्याने गावातील मुलांना आपल्या घरी बोलावले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास २३ मुले त्याच्या घरी दाखल झाली. ही मुले येताच त्याने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी आली. तेव्हा सुभाषने मुलांना ओलीस ठेवल्याचे तिला कळले. तिने तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले.
सुभाष बाथम तुरुंगात असताना काही लोकांनी त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. त्या आरोपींना समोर आणावे, अशी त्याची मागणी होती. शिवाय सरकारी योजनेतून त्याला घर आणि शौचालय बनवून हवे होते. मात्र यातील काहीच न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. त्याने ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे आवाहन त्याने धुडकावून लावले. दरम्यान संतप्त झालेल्या गावकर्यांनी त्याच्या घरावर दगडफेक केली. यात त्याच्या घराचा दरवाजा तुटला. हीच संधी साधून पोलिसांनी कारवाई सुरू केली. तेव्हा त्याने देशी बनावटीच्या कट्टयातून गोळीबार केला. शिवाय बॉम्बफेक देखील केली. यात घराजवळील भिंत ढासळली. काही पोलीस जखमी झाले. हा सारा गंभीर प्रकार लक्षात घेऊन सरकारने एनएसजी कमांडोंच्या पथकाची मदत मागितली. काही वेळातच कमांडोचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कमांडोंनी तात्काळ कारवाई करीत आरोपी बाथमला ठार करीत सर्व मुलांची सुटका केली. ११ तास चाललेल्या या थरारक घटनेत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाले आहेत. आरोपी बाथमच्या घरातून एक रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले.
नवी दिल्ली : दिल्लीत जामियानगर परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद....
अधिक वाचा