By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती प्राथमिक चौकशीदरम्यान पुढे आली आहे. 'एएफपी' या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या उपसंरक्षणमंत्र्यांकडून संसदेत ही माहिती देण्यात आली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी या बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ही समितीन दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. मात्र, प्राथमिक चौकशीदरम्यान या बॉम्बस्फोटांमागील धागेदोर हाती लागायला सुरुवात झाली आहे. या प्राथमिक चौकशीनुसार, या बॉम्बस्फोटांचा संबंध न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे झालेल्या घटनेशी असण्याची शक्यता आहे. १५ मार्च रोजी ब्रेन्टन टॅरेंट या हल्लेखोराने ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर हल्ला करून बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला होता. स्थलांतरित मुसलमानांना हकलण्यासाठी आणि युरोपच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा हल्ला केल्याचे ब्रेन्टन टॅरेंटने सांगितले होते.श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये आठ शक्तिशाली स्फोट झाले होते. यामध्ये आतापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५०० जण जखमी झाले आहेत. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा बिमोड केल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये श्रीलंकेत शांतता होती. मात्र, रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंकेसह संपूर्ण जग हादरले आहे. या स्फोटांचा छडा लावण्यासाठी श्रीलंकेला भारतासह अनेक देश मदत करत आहेत. या प्रकरणी २४ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरित दहशतवादी सागरी मार्गाने देशाबाहेर पळून जाण्याच्या बेतात आहेत. त्यासाठी श्रीलंकेनजीकच्या समुद्रात भारतीय तटरक्षक दलाने डॉर्नियर टेहळणी विमान आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत.
बॉम्बस्फोटाच्या मालिकेमुळे हादरलेल्या श्रीलंकेतील दहशत अजूनही कायम आहे. ....
अधिक वाचा