By
DAYANAND MOHITE | प्रकाशित:
एप्रिल 23, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कसबा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर भाजपचा राजरोसपणे प्रचार करणा-या निवडणूक अधिका-याला काँग्रेसच्याच पदाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. प्रभाग क्रमांक 188 मधील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तिथे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . हा प्रकार कळताच महापौर मुक्ता टिळक यांच्यासह उमेदवार मोहन जोशी यांनी केंद्राकडे धाव घेतली. त्या निवडणूक अधिका-याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा सर्व प्रकार घडला. ते म्हणाले मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी राजेश भोसले हे मतदारांना ‘भाजपला मतदान करा’ असे सांगत होते. शासकीय अधिका-याने असे सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हा अधिकारी सकाळपासूनच हे मतदारांना सांगत होता. ही बाब निर्वाचन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर उमेदवार मोहन जोशी इथे आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले. हे प्रकार होत असतील ही लोकशाहीची विटंबना आहे. अशाप्रकारे भाजपला निवडणूका जिंकायच्या असतील तर त्या निवडणूकीला काही अर्थ नाही.याप्रकरणी संबंधित केंद्रावरील निर्वाचन अधिकारी यांच्याकडे आणि खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले आहे.