By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 10, 2021 09:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : भंडारा
भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कारभाराची लख्तरं वेशीवर टांगली गेली आहे. आता राज्यातील सर्वच रुग्नालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून इथल्या जिल्हा रुग्णालयाचंही गेल्या 2 वर्षांपासून फायर ऑडिट झालेलं नाही.
जिल्ह्यात दोनच फायर ऑफिसर!
नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालयासह जिल्ह्यातील 18 ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचं 2 वर्षांपासून फायर ऑडिटच झालं नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. जिल्हात फक्त दोनच फायर ऑफिसर असल्यामुळे वेळेवर फायर ऑडिट होत नसल्याची माहिती बाधकाम विभागानं दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
10 चिमुकल्यांचा जीव गेला!
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशु केअर युनीटला शुक्रवारी मध्यरात्री शॉट सर्किटमुळे आग लागली होती. या आगीत 10 चिमुकल्यांचा जीव गेला. त्यात 8 लहान मुली आणि 2 मुलांचा समावेश होता. यातील 3 बाळांचा मृत्यू होरपळून तर 7 बाळांचा मृत्यू गुदमरुन झालाय. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. टीव्ही 9 मराठीला रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 6 वर्षांपासून रुग्णालयाचं फायर ऑडिटच झालं नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पण आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे 10 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला, तर त्या बिचाऱ्या आईंची कूसही रिकामी झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा दौऱ्यावर
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयाला भेट देणार आहेत. तसंच ज्या चिमुकल्यांचा या आगीत जीव गेला त्यांच्या पालकांनाही मुख्यमंत्री भेटणार आहेत. दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या 10 चिमुकल्यांचा रुग्णालयातील आगीत जीव गेला त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सैन्यात आणि रेल्वे विभागात नोकरी ....
अधिक वाचा