By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात काल रात्री (शुक्रवार 6 डिसेंबर) 11 वाजून 40 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. पेटवल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या पीडितेचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. दोषींना सोडू नका, अशी शेवटची इच्छा व्यक्त करत पीडितेने प्राण सोडले.
उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला दोन दिवसांपूर्वी (5 डिसेंबर) आरोपींनी पेट्रोल ओतून जिवंत जाळलं होतं. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतरही पीडिता जवळपास एक किलोमीटर अंतरावर धावत गेली होती. त्यानंतर तिने स्वत: पोलिसांना फोन करुन घटनेविषयी सांगितलं होतं.
90 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पीडितेला ग्रीन कॉरिडॉर करुन लखनौ विमानतळावर पाठवण्यात आलं होतं. तिथून तिला हवाई रुग्णवाहिकेतून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते.
हॉस्पिटलमध्ये मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबानीत तिने पाच जणांची नावं सांगत आरोपींनी आपल्यावर चाकूने हल्ला करत पेट्रोल ओतून पेटवल्याचा दावा केला होता. या पाच जणांमधील दोघा आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ते नुकतेच जामिनावर सुटून बाहेर आले होते. त्यानंतर तिघा साथीदारांच्या मदतीने त्यांनी पीडितेला जाळलं. शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी या बलात्काराच्या आरोपींसह हरिशंकर द्विवेदी, रामकिशोर त्रिवेदी आणि उमेश वाजपेयी यांनी तिला जाळल्याचा आरोप आहे.पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवून तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा पीडितेची मृत्यूशी झुंज संपली.
रात्री 8.30 वाजल्यानंतर पीडितेची प्रकृती खालावू लागली होती. डॉक्टरांनी औषधाचा डोसदेखील बदलला. परंतु रात्री 11.40 वाजता कार्डिअॅक अरेस्टमुळे तिने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती डॉ. शलभ कुमार यांनी दिली.
अखेरची इच्छा
पीडितेला जेव्हा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं, तेव्हा वेदनांनी विव्हळत असतानाही तिने डॉक्टरांना विचारलं की ‘मी वाचेन ना?’ तिने आपल्या भावालाही सांगितलं, की ‘मला मरायचं नाही’. ‘दोषींना सोडू नका’, अशी याचनाही ती डॉक्टरांसमोर व्यक्त करत होती. यानंतर तिची प्रकृती वेगाने खालावत चालली.
शुक्रवार सकाळी जल्लोष आणि रात्री शोककळा
हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चार नराधमांचा एन्काऊंटर झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शुक्रवारी सकाळीच (6 डिसेंबर) ही बातमी आल्यामुळे देशभरात दिवसभर जल्लोष झाला, परंतु त्याच दिवसाची अखेर उन्नावमधील गँगरेप पीडितेसाठी काळरात्र ठरली.
उन्नाव बलात्कार
डिसेंबर 2018 मध्ये पीडितेचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. लग्नाच्या आमिषाने शिवम त्रिवेदी याने आपलं शारीरिक शोषण केल्याचा दावा पीडितेने केला होता. त्यानंतर उन्नाव गावात पंचायत बोलावली गेली. शिवमने माघार घेतली होतीच, मात्र तीन लाख रुपये देण्याचं सांगत त्याने पीडितेला पिच्छा सोडण्याची ताकीद दिली. अखेर ती न ऐकल्याने शिवमने शुभम त्रिवेदीच्या मदतीने तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर गँगरेप केला, असा आरोप आहे.
कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर १३ जुलै २०१६ रोजी त्यांच्याच गावातल्या ती....
अधिक वाचा