By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2020 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. या नंतरच लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते.
तुळशी विवाहाची अख्यायिका
जालंदर नावाच्या असुर हा देवलोकांना छळत होता. त्यांच्या कृत्याने सगळेच देव आणि ऋषीमुनी हैराण झाले होते. पण त्याचा पराभव करणे देवांना जमत नव्हते कारण जालंदरची पत्नी वृंदा ही अतिशय पुण्यवान होती. तिच्या पुण्याईने जालंदरचा नाश करणे देवांनाही अशक्य बनले होते. अशा वेळी वृंदेची पवित्रता भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा नाश करणे अशक्य आहे या विचारापर्यंत देवलोक पोहचले. एकदा जालंदर नसताना त्याचे रुप घेऊन विष्णूनी वृंदाचे सत्व हरण केले. त्यामुळे तिची पवित्रता नष्ट झाली आणि जालंदरचा पराभव झाला. वृंदाने देहत्याग करताना भगवान विष्णूंना दगड म्हणजेच शाळिग्राम होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूनी वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला. पुढे सती वृंदा हिच तुळशी रूपाने प्रगट झाली.
वृंदेचे महात्म वाढावे म्हणून विष्णूंनी तुळशीसोबत लग्न केले. तेव्हापासून आपल्या समाजात तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते आणि या घटनेची आठवण म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला भगवान विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीला विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही असेही सांगितले जाते. तुळशीच्या मंजिरीची पूजा केली अथवा तिला नमस्कार केला असता तो देवांपर्यंत पोहोचतो असा समज आहे.
अंगणात तुळसीचे रोप असणे म्हणजे पवित्र मानले जाते. तुळशीमुळे हवा शुध्द राहून आरोग्यही उत्तम राहते. आयुर्वेदात तुळशीच्या पानांचा वापराचे अनेक फायदे सांगितले आहेत.
कार्तिकी एकादशीपासून मंगलकार्यांची सुरुवात
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन फुलांनी सुशोभित केले जाते. त्याच्या मुळाशी चिंचा, सिताफळे, बोरं आणि आवळे ठेवली जातात. मांडवाच्या रुपात त्यास उसाच्या खोपटांनी सजवले जाते. तुळसीच्या मुळापाशी बाळकृष्णाची मुर्ती ठेऊन मंगलाष्टके म्हणून त्याचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. त्यावेळी तुळशीचे कन्यादान केले जाते. नंतर तिची आरतीही केली जाते. आपल्या घरच्या कन्येला श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा हेतू त्यामागे असतो. त्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते.
कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीदिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो अशी अख्यायिका आहे. कार्तिकी एकादशीपासून घरातील सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. या मुहूर्तानंतरच लग्नांच्या मुहूर्तांची सुरुवात होते.
कार्तिकी एकादशी : बुधवार, 25 नोव्हेंबर 2020.
एकादशी प्रारंभ : मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 रोजी मध्यरात्री 02 वाजून 46 मिनिटे.
एकादशी समाप्ती : गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 05 वाजून 10 मिनिटे.
द्वादशी प्रारंभ : गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 05 वाजून 11 मिनिटे.
द्वादशी समाप्ती : शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 07 वाजून 46 मिनिटे.
देश आज संविधान दिवस साजरा करत आहे. देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा क....
अधिक वाचा