By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचा उत्सव सोमवार दि. 2 सप्टेंबर ,भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार्या या उत्सवानिमित श्रीगणरायाची यथासांग पूजा अर्चा करून आराधना करण्यात येईल. महाराष्ट्रात विशेषता कोकणात घरोघरी श्रीलंबोदराच्या मूर्तीची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो. तसे पाहिले तर वर्षाच्या 12 महीने आणि महिन्याचे 30 दिवस मंदिरांमध्ये श्रीगजाननाची पूजा आरती केली जाते; पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरात गणपती आणून पूजा करण्याची प्रथाही खूप जुनी आहे.
तथापि, स्वातंत्र्यपूर्व काळात 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. त्या लोकमान्य टिळक यांनी 125 वर्षापूर्वी पुणे येथे प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला. या उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यावे, ब्रिटीशाविरोधात जनजागृती व्हावी, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे, असा टिळकांचा उद्देश होता. जनजागृतीसाठी अन्य मार्गही निवडता आले असते. पण मग टिळकानी गणेशोत्सवावरच भर का दिला ? त्यांचे महत्वाचे कारण म्हणजे एरवी राजकीय बैठकांना विरोध करणारे इंग्रज धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नव्हते. ते त्याबाबत दूर राहणेच पसंत करीत. नेमकी हीच गोष्ट टिळकानी हेरली आणि त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली. त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि ऐक्याचा अभाव ही होती. जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर वृद्धिंगत होत नाही. तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यांच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. यासाठीच टिळकांनी घरातला गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर पुढे पुणे, मुंबई, ठाणे आदि शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या वाढत गेली. मुंबईसारख्या शहरात आज 10 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा उत्सव साजरा करीत आहेत. सुरवातीच्या काळात म्हणजे जेव्हा या उत्सवात स्पर्धा नव्हती. तोपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, प्रबोधन करणे, तरुणांमधील कलागुणांना वाव देणे, असे उद्देश ही सफल झाले. इतकेच काय पण बोलपटाचा जमाना सुरू झाला, तेव्हा मराठी रंगभूमी ओस पडली होती. मराठी रंगभूमीवर गंडातर आले. रंगभूमीवरील अनेक कलावंत बोलपटाकडे वळले, त्यावेळी याच उत्सवाच्या माध्यमातून हौशी कलावंतांनी नाट्यकला जीवंत ठेवली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. शाहीर, कीर्तनकार यांनाही यानिमिताने कला सादर करण्याची संधि मिळायची. नाटक, व्याख्यानांचे फड रंगायचे. भाविकही मोठ्या संख्येने त्यासाठी गोळा व्हायचे त्यावेळी गणपतीची मूर्ती किती उंच आहे, त्या ठिकाणी डेकोरेशन (सजावट) किती आकर्षक आहे, याला महत्व नव्हतं. तर तेथे कोणता कार्यक्रम होणार आहे, याची जिज्ञासा अधिक होती. काळ बदलला. टी.व्ही. आला,संगणक आला, इंटरनेटमुळे सर्व जग मुठीत आल आणि सार्वजनिक उत्सवाच मेगा इवेंटमध्ये रूपांतर होऊ लागलं. त्यातच मंडळा-मंडळांमध्ये चुरस,ईर्षा वाढली. त्यातूनच श्रीगणेश मूर्ती ऊंची हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. 18-20 फुटांपासून 30-35 फुट उंच गणेशमूर्ती बसविण्यात येत आहेत. लाखो रुपये सजावटी व रोषणाई वर उधळण्यात येत आहेत. आपल्या मंडळांचा गणपती पाहण्यासाठी गर्दी व्हावी , म्हणून अनेक क्लृप्त्या पदाधिकारी योजू लागले. सेलिब्रिटींना आवर्जून आणले जाऊ लागले. प्रसारमाध्यमांना हाताशी धरून आपल्याच मंडळाचा गणेशोत्सव सर्वात मोठा आहे. हाच गणपती नवसाला कसा पावतो, याचा रीतसर प्रसार करण्याचीही स्पर्धा सुरू झाली, पुढे या आराध्य दैवताचा विभागाचा, गल्लीतला राजा-महाराजा म्हणून प्रचार करण्यात येवू लागला. आता कधी नव्हे तो या मंडळाच्या राजाचा पाटपूजन सोहळा, पाद्यपूजन सोहळा, वेळेआधी आगमन सोहळा आदींचेही इवेंट सुरू करण्यात आले आहे. विसर्जन सोहळा सारेच काही भव्य दिव्य स्वरुपात साजरे केले जात आहे. त्यासाठी डीजे वाजविणे, बीभत्स नाचगाणी , चित्रपटाची उत्सवाला अनुसरून नसलेली गीते लावणे, मोठ मोठे मंडप, डोळे दीपविणारी रोषणाई, भव्य ऐतिहासिक देखाव्याचे सेट आदि सजावट आणि विशाल गणेश मूर्ति अशाप्रकारे या उत्सवाला इवेंटचे स्वरूप आल्यामुळे या उत्सवातील पावित्र्य, श्रद्धाच हरवल्याचे दिसत आहे. एकूणच हा उत्सव मेगा इवेंट झाल्याचे जाणवत आहे.
आज शिक्षक दिन. आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन य....
अधिक वाचा