By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 06:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्याकडे एक प्रसिद्ध वाक्यप्रचार आहे, 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' आता थोडासा बदल करून असे म्हणता येईल,' ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी' गेल्या 5-6 वर्षात घडलेल्या घटना विचारात घेतल्या तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येईल ती म्हणजे सत्ताधार्यांनी विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाचा केलेला वापर. हा वापर करताना त्यांनी जी कारणे पुढे केली आहेत. ती वरकरणी पटणारी वाटत असली तरी त्यातील विरोधकांना संपविण्याचा हेतु लपून राहिलेला नाही. जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांनी कोट्यवधी रूपयांचा घोळ केला आहे, ज्यांनी देशाला लुटले आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. उलट अशा लुटारुना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणे करून पुन्हा अस धाडस कुणी करणार नाही, असेच कुणालाही वाटेल, पण एखादा नेता आपल्या विरोधात बोलतोय म्हणून त्याच्या मागे शुक्लकाष्ट लावण्याचे प्रकार जर घडत असतील, तर ते समर्थनीय ठरत नाही. दुसरीकडे भ्रष्टाचार केल्याचे किंवा घोटाळे केल्याचे ज्यांच्यावर पूर्वी आरोप केले गेले होते. इतकेच काय पण ज्यांची घोटळ्यांची प्रकरणे गाजली होती. अशी काही नेतेमंडळी सत्ताधार्यांच्या पक्षात गेल्यावर शुचिर्भूत कशी होतात? हा खरा सवाल आहे. याचाच अर्थ असा की, जे आपल्या सोबत येतील ते सज्जन ,प्रामाणिक आणि जे येणार नाहीत आपल्यावर टीका करतील त्यांची कितीही जुनी प्रकरणे असली तरी ती पुन्हा बाहेर काढून त्यांना गोवायचे , नामोहरम करायचे , हा जो काही प्रकार दिसतो, याला लोकांचा आक्षेप आहे. भ्रष्टाचारी , घोटाळेबाज देशाला लुटणारे मग कुणीही असतो . अगदी सत्ताधारी पक्षात जरी असले तरी त्यांच्यावर देखील कारवाई जेव्हा केली जाईल, तेव्हा सरकारच्या हेतुविषयी शंका कोणी घेणार नाही. पण आज अशी स्थिती दिसते की, आपली काळी कृत्ये लपविण्यासाठी किंवा आपण केलेले घोटाळे उघडकीस येऊ नयेत, आपल्या नेता म्हणून असलेल्या प्रतिमेला तडा जाऊ नये, उजळमाथ्याने सत्तापदे मिळविण्याच्या उद्देशाने सत्ताधारी पक्षात काही जण डेरेदाखल होतात. ज्यांचे प्रस्थ मोठे आहे पण ते कुठे तरी गुंतलेले आहेत. अशांना त्यांच्या प्रकरणाची भीती दाखवून सामील करून घेतले जाते, असा दावा जुने जाणते नेतेही आता उघड उघड करू लागले आहेत. काही जण प्रसारमाध्यमाशी बोलताना याचा स्पष्टपणे उल्लेख करतात, तेव्हा सत्ताधार्यांच्या हेतुविषयी शंका घेण्यास वाव मिळतो . मग सत्ताधार्यांनी कितीही नि:पक्षपातीपणाचा आव आणला तरी सत्य लपत नाही. दुसरीकडे सुडाचे राजकारण सत्ताधारी करीत असल्याचेही म्हटले जाते. त्यालाही तेच कारण आहे. सत्ताधार्याविरुद्ध बोलणार्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचा खेळ सत्ताधारी करीत असल्याचे जानकरांचे मत आहे. असे असले तर ते लोकशाहीला घातक आहे. सत्ताधार्यांना टीकाही पचविता आली पाहिजे . लोकशाहीमध्ये मतस्वातंत्र्य आहे. त्याची गळचेपी करण्याचे प्रकार फार काळ चालणार नाहीत. केवळ सत्ताधार्यांचा उदोउदो करीत राहिल्यास विकासातील त्रुटी , सत्ताधार्यांच्या चुका झाकल्या जातील. ते देशाच्या हिताचे ठरणार नाही.!
मानवी जीवनाच्या रंगमंचावर कधी कधी इतिहासाची पुंनरावृती होताना दिसते. आपण त....
अधिक वाचा