By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दोघे यांची आज 18 वी पुण्यतिथी आहे. म्हणजेच दिघेना जावून 18 वर्षे झाली. पण आजही आनंद दिघे यांचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात जाणवत आहे. शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टर किंवा बॅनरवर आनंद दिघे यांचेही छायाचित्र असते. आधुनिक ठाण्याचा इतिहास लिहिला गेलाच तर तो आनंद दिघे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, इतके त्यांचे काय प्रभावी आणि जनताभिमुख होते. साधा शिवसैनिक ते शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि धर्मवीर ही त्यांची अवघ्या 15-20 वर्षाची कारकीर्द अविस्मरणीय ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसेना भक्कम होण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. ठाण्यात शिवसेना म्हणजे आनंद दिघे असेच समीकरण जुळून आले होते. कारण आनंद दिघे यांनी शिवसेनेलाच वाहून घेतले होते. म्हणूनच 'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' असा त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायचा. त्यांच्या 'आनंद आश्रमात' सकाळी 6 वाजल्यापासूनच अनेक जण तक्रारी घेवून आलेल्या इसमाचे काम झाले नाही, असे कधीच झाले नाही. समस्या तात्काळ सोडविण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. म्हणूनच ठाण्यात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते.
आनंद दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी झाला. त्यांचं नाव आनंद चिंतामणी दिघे होते. त्यांचे टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमोघ वकृत्वाचा प्रभाव आनंद दिघेंवर पडला आणि तरुण दिघेनी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून 70 च्या दशकात काम सुरू केले. शिवसेनेच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यामुळेच त्यांनी लग्नसुद्धा केले नाही, अस म्हणतात. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून शिवसेनेने त्यांच्याकडे पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर दिघेनी सेनेच्या कार्यालयातच मुक्काम ठोकला. कार्यकर्ते त्यांना डब्बा आणून द्यायचे.
दरम्यान आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच आनंद आश्रमची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात 'जनता दरबार' भरायचा. या दरबारात तक्रारी घेवून आलेल्या सामान्यातील सामान्य माणसाच्याही तक्रारीची दखल घेतली जात होती. आनंद दिघे तक्रारी ऐकून घ्यायचे . तक्रार योग्य वाटल्यास ते लगेच संबंधितांना फोन लावायचे. सांगूनही काम झाले नाही तर ते रोखठोक भूमिका घेत अशी आठवण अनेक जण सांगतात. काही प्रसंगात त्यांनी हात ही उचलल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्यांपासून प्रशासनापर्यंत दिघेचा आदरयुक्त दरारा तयार झाला. सामान्यांमध्ये 'आपला नेता' अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. लहानसहान भांडंनापासून ते घरातील कौटुंबिक तक्रारीपर्यंत अनेक विषय दिघेच्या जनता दरबारात यायचे.
ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेनी अनेक प्रयत्न केले. अनेकांना स्टॉल उभारून दिले. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकर्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कारणामुळे ते ठाण्यातील प्रभावी नेते म्हणून लोकप्रिय झाले. त्यांना देवधर्माच्या कार्याचीही विशेष आवड होती. त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरू केला. तसेच टेंभी नाक्यावरच दिघेनी पहिला मोठा दहीहंडी उत्सव ही सुरू केला. याच त्यांच्या कार्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना 'धर्मवीर' ही उपाधी दिली. असे असले तरी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही की कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नाही.
24 ऑगस्ट 2001 रोजी पहाटे आनंद दिघे गणेशोत्सव असल्याने कार्यकत्यांच्या घरी भेटी देत होते. अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ ठाण्याच्या सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. 26 ऑगस्टला त्यांच्या पायावर शत्रक्रिया करण्यात आली. पण संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. त्याच दिवशी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. 7.25 ला त्यांना दूसरा मोठा झटका आला. अखेर रात्री 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अनाद दिघे आपल्यातून गेले, असे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले. तेव्हा रुग्णालयाबाहेर जमलेल्या दिघेंच्या दीड हजाराहून अधिक चाहत्यांनी रुग्णालय जाळले. या प्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले. 34 जणांना अटक करण्यात आली. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आले. असे असूनही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. या घटनेला 18 वर्षे झाली. पण आजही आनंद दिघे यांचा प्रभाव ठाण्यावर असल्याचे जाणवते, यातच त्यांच्या कार्याचे महत्व सामावलेले आहे.