By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याच्या अनेक भागांत सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने कडाक्याच्या थंडीला पोषक स्थिती आहे. त्यामुळे प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातील गारठय़ात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये विदर्भात नागपुर तसेच अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे सध्या येथील तापमानात किंचितशी वाढ होऊन थंडीची लाट ओसरली आहे.
मुंबईसह कोकण विभागात सर्वच ठिकाणी बुधवारी किमान तापमान घसरले. विदर्भात तीन दिवस थंडीची लाट आली होती. अनेक ठिकाणी किमान तापमान ६ ते ८ अंशांपर्यंत खाली आले होते. कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३१ डिसेंबरला कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर झाल्याने नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येपासून या विभागांत थंडीत वाढ झाली. गेले चार ते पाच दिवस राज्यातील सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदविले जात होते.
मात्र, बुधवारी राज्यातील सर्वात कमी तापमान मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे १०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात १०.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. सातारा येथील तापमान सरासरीच्या खाली आले आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली आदी भागांत तापमान सरासरीजवळ आले आहे.
कोकण विभागातील मुंबईत १७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी कमी असल्याने मुंबई परिसरात थंडी वाढली आहे. अलिबाग, रत्नागिरी आदी भागातही किमान तापमानात घट झाली आहे. वर्षांच्या पहिल्याच दिवशी मुंबई परिसरात तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली गेला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.