By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्याला १५ ऑगस्टला स्वतंत्र दिन, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि १ मे रोजी कामगार दिन हे राष्ट्रीय उत्सव म्हणून माहिती असतात. परंतु १५ जानेवारीला भारतीय लष्कर दिन असतो, हे कित्येकांना माहितीच नसते. मात्र हा १५ जानेवारीचा दिन आपले जवान मोठ्या श्रेद्धेने साजरा करतात. त्याचबरोबर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत असतात. तसेच लष्कर प्रमुखास लष्करातर्फे मानवंदना देण्यात येते. हा लष्कर दिन साजरा का करतात, याविषयी थोडक्यात माहिती.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय लष्कर ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर म्हणून ओळखले जात होते. पुढे ब्रिटिश भारतीय लष्कर असा उल्लेख करण्यात येऊ लागला. १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारताची जशी फाळणी झाली त्याचप्रमाणे तत्कालीन ब्रिटिश भारतीय लष्कराचीही विभागणी करण्यात आली. चार गोरखा सैन्य दलाला ब्रिटिश भारतीय सेनेत स्थलांतरित करण्यात आले. त्यावेळी भारतीय लष्कराची सूत्रे लेफ्टनंट जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होती. मात्र १५ जानेवारी १९४८ रोजी भारतीय लष्करातील तत्कालीन लेफ्टनंट जनरल के.एम.करिअप्पा यांनी सेनेची सूत्रे हाती घेतली आणि ते भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख फील्ड मार्शल झाले. त्या निमित्त हा लष्कर दिन साजरा करण्यात येतो. आज साजरा होत असलेल्या भारतीय लष्कराचा ७२ वा लष्कर दिन आहे. नवी दिल्लीतील गॅंरीसन मैदानात या निमित्त लष्करातर्फे दिमाखदार संचलन आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याचबरोबर विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना लष्करातर्फे सलामी देण्यात आली.
लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येला जनरल नरवणे यांनी जवानांना संदेश देताना संगितले की, चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून सुरू असलेल्या आगळिकींना तोंड देण्यासाठी लष्कराने २४ तास सतर्क राहावे. जवानांच्या सर्व गरजा विनाविलंब पूर्ण केल्या जातील, असे आश्वासनही करवणे यांनी दिले. तर कॅप्टन विक्रम बित्रा यांनी म्हंटले आहे की, आर्मी मॅन हे खरे हीरो आहेत. एक तर आम्ही तिरंगा फडकावून येऊ किवा तिरंग्यात लपेटून येऊ हे नक्की. लष्करी जवानांच्या शौर्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
आपले स्वातंत्र आणि संरक्षण हे लष्करी जवानांवर निर्भर आहे. देशाचे नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून कडाक्याची थंडी असो की, प्रचंड उष्णता असो, मुसळदार पाऊस असो, की दमट हवामान असो, दिवस असो, रात्र असो हे जवान डोळ्यात तेल घालून उभे असतात. हिमालयात असा खडा पहारा देताना हिमस्खलनात अनेक जवान प्राणासही मुकतात. बर्फाचे प्रचंड कडे कोसळून त्यात जवान गाडले जातात. कधी दहशतवाद्यांशी मुकाबला करावा लागतो. तर कधी शत्रू सैन्याशी सामना करावा लागतो. सीमेवर २४ तास जवान पहारा देत असतात. म्हणूनच आपण सुरक्षित आहोत.
स्वातंत्र्यापूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटचा समृद्ध असा इतिहास आहे. जातीवरून आणि प्रदेशावरून रेजिमेंटन नावे दिली गेली. प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धांमध्ये भाग घेऊन शौर्य गाजविले आहे, यथोचित सन्मान मिळविले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणापासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठावणे, ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्ये आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीचावेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जात असते. भारतीय लष्कराने पाकिस्तान व चीनबरोबर केलेल्या युद्धाप्रमाणेच ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचा शांती सेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या भारतीय लष्करात १३ लाख ५० हजार नियमित सैनिक व ११ लाख ५५ हजार राखीव सैनिक आहेत.
भारतीय लष्कर दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला आमचा सलाम!