By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या : काठी न घोंगड घेऊ द्या की रं, मला बी यात्रेला येव द्या की !
गण्या : आऱ संत्या गान म्हणत अंगात संचारल्यागत नाचत नाचत का येतोयस ?
मन्या : कोणत्या यात्रेला तुला जायचं हाय ?
गण्या : पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला झाली. आता कुठली यात्रा ?
संत्या : तुमास्नी काय बी माहिती दिसत न्हाय.
मन्या : आता तूच सांग.
संत्या : आऱ यंदा यात्रेला चांगल दिस आलतं.
गण्या : म्हंजे ? कोणत्या यात्रांना चांगलं दिस आलेत?
संत्या : गेल्या म्हैन्यात युवराजांची 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू झाली. ह्या 1 तारखला मुख्यमंत्रांनी 'महाजनादेश यात्रा' सुरू केली. ६ तारखला जाणत्या राजाच्या पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' निघनार हाय.
मन्या : बरं मग पुढं काय ?
संत्या : त्यातच भौजींची माऊली "संवाद यात्रा' सुरू व्हनार हाय .
गण्या : मग तू कोणत्या यात्रेत जाणार म्हंतोस ?
संत्या : आऱ आता आपल्याला कोण ईचारतो ? तरी पण आमी निष्ठावंत असल्यामुळं आपलं इथंच नाचत समाधान मानायचं, दुसर काय.
मन्या : खरं तर पूर्वी यात्रा म्हणलं की, देवाच्या उत्सवांची नावं पुढ यायची.
गण्या : पंढरपूरची यात्रा, मारलेश्वरची यात्रा, कुंकेश्वराची यात्रा,अमरनाथ यात्रा, या यात्रा माहीत व्हत्या.
मन्या : पण स्वातंत्रपूर्व काळात बापुनी मिठावरील कराच्या इरोधात पहिली दांडी यात्रा काढली.
संत्या : त्यानंतर गाजली ती 'रामरथ यात्रा'.
गण्या : त्यावरचं 'रामा'यण अजून बी सुरूच हाय .
मन्या : रथयात्रा काढणारे आज वनवासात असल्यासारखे राजकारणातून बाजूला फेकले गेलेत.
संत्या : त्यांनी तवा यात्रा काढली नसती तर आज हे सत्तेवर दिसले असते काय ?
गण्या : पन तवापासून दर निवडणुकीला रथयात्रा काढण्याची स्पर्धाच सुरू झाली बग.
संत्या : अगदी पालिकेच्या निवडणुकीसाठी उभे र्हाणारेही रथयात्रा काढत्यात.
गण्या : हा आता त्यांच्या रथाला घोडे नसतात, ही गोष्ट येगळी.
मन्या : फक्त या यात्राना येगयेगली नाव देत्यात.
संत्या : पण हेतु एकच आस्तो न्हवं.
गण्या : ज्यांच्या हातात सत्ता हाय ते पुन्हा सत्ता मिळावी म्हनून तर जे सत्तेच्या भायर हायत ते सत्ता मिळावी म्हनून यात्रा काढतात.
मन्या : या यात्रांचं आणखी एक इशेष हाय.
संत्या : एका पक्षाच्या नेत्यानं यात्रा काढली की मागून इतर पक्षही त्याचीच री वडत्यात.
मन्या : ते तर हायच, पन या यात्रा शहरातून, मोठ्या रस्त्याने काढल्या जानार .
गण्या : सजवलेल्या गाडीमधन प्रमुख नेता फिरल . त्याचा प्रभाव वाढला की आपोआप पक्षाला फायदा व्हनार.
संत्या : पर अजून जुन्या पक्षाच्या यात्रेची घोषणा कशी झाली न्हाय?
मन्या : यात्रा न काढणार्या पक्षांच्या नावाची यादी तशी मोठी व्हईल .
गण्या : ह्या यात्रांचे मार्गही ठरलेले हयात. त्यांना म्हनावं, शेरातल्या झोपड्यामधी, खेड्यागावात खरा म्हाराष्ट्र हाय. तिथ जावा की.
संत्या : आता परतेकाला म्हाराष्ट्राचा पुळका आलाया.
मन्या : कुनाला आपल्या सपनातला म्हराष्ट्र घडवायचाय , तर कुनाला म्हराष्ट्राचा आणखीन इकास करायचाय तर कुणाला आपली पॉवर वाढवायची हाय ?
गण्या : जुन्या पक्षाच्या युवक गटानं 'वेक अप अभियान' सुरू करायचं ठरवलय. ते यात्रेच्या भानगडीत पडणार न्हायत आसं दिसतंय.
संत्या : दुसरीकड मतदानं यंत्राइरूद्ध इरोधक एकवटल हायत.
मन्या : हे म्हंजी नाचता येईना आंगन वाकड, आसच ना ?
संत्या : त्यांचा मोर्चा निघनार हाय म्हंने .
गण्या : एकून काय, आता सर्व जागे झालेत.
मन्या : यात्रांच्या माध्यमातून आपली प्रतिमा लोकांमध्ये ठसविण्याचे साधन म्हणून यात्रांकडे पाहिले जात आहे. याचा फायदा कुणाला झाला ते निवडणुकीनंतर समजालच की,
संत्या : आपून कशाला त्याचा ईचार करायचा ?
गण्या : आपली पदयात्रा आता घराकडे सुरू करूया ! चला.
ज्या क्रांतीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या ऑगस्ट क्रांतीचे विस्मर....
अधिक वाचा