By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 02:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जर्मनीचा हुकूमशहा अडोल्फ हिटलरची ऑफर धुडकावणारे आणि 'क्रिकेटचे पितामह' म्हणून ज्यांचा उल्लेख होतो. ते त्या डॉन ब्रॅडमन यांनी देखील ज्यांच्या खेळाचे कौतुक केले ते भारताचे हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन 29 ऑगस्ट. त्यांचा जयंती दिन हा 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आणि प्रथम दर्जाच्या हॉकी सामन्यांमध्ये 1 हजारपेक्षाही अधिक गोल करणार्या मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या वयाच्या 51 व्या वर्षी 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. ध्यानचंद यांचं चित्र असलेलं पोस्टाच टिकीटही सरकारने छापले. औस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये ध्यानचंद यांचा चतुर्भुज पुतळा उभारण्यात आलाय. ज्यात त्यांच्या चारी हातात हॉकीस्टीक आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने 1928, 1932 आणि 1936 ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. यात ध्यानचंद यांचीही कामगिरी अविस्मरणीय ठरली. विशेषता 1936 मध्ये जर्मनीत झालेल्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी असा इतिहास घडविला, ज्यामुळे तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावले.
1936 मधील ऑलिंपिककडे सध्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. कारण जर्मनीचा जगातला सर्वात मोठा क्रूर हुकूमशहा अडोल्फ हिटलरच्या जर्मनीत बर्लिनमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार होत्या. स्वत: हिटलर या सामन्यानंतर नजर ठेवून होता. तर दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावून भारतीय हॉकी संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे बर्लिनमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो. याची उत्सुकता अवघ्या जगाला लागून राहिली होती. जगाच लक्ष बर्लिनकडे आणि बर्लिनच ध्यानचंद यांच्याकडे लागले होते.
कारण जर्मन प्रसारमाध्यमांत फक्त ध्यानचंद यांच्याच नावाची चर्चा होती. या ऑलिंपिकच वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच यांचं चित्रीकरण होणार होत. या ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकीसंघाने जबरदस्त खेळ करीत हंगेरीला 4-0, अमेरिकेला 7-0, जपानला 9-0 आणि सेमी फायनलमध्ये फ्रांसवर 10-1 ने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात भारताची गाठ जर्मनीशी पडणार होती.
या सामन्यासाठी जर्मनीतील वृतपत्रांमध्ये ‘द ऑलिंपिक कॉम्प्लेक्स नाऊ हॅज अ मॅजिक शो’, 'व्हिजिट द हॉकी स्टेडीयम टू वॉच द इंडियन मॅजिशियन ध्यानचंद इन अॅक्शन’ असे मथळे झळकले होते. बर्लिन शहर एखाद्या नववधूसारखं सजलेल होते. खुद्द हिटलर हा अंतिम सामना बघण्यासाठी उपस्थित होता. त्यांचं दडपण भारतीय खेळाडूंच्या चेहर्यावर जाणवत होत. सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मॅनेजर पंकज गुप्ता यांनी सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. त्यांनी आपला बॅगेतून कोंग्रेसच्या आंदोलकाचा तिरंगा काढला. या तिरंग्याची शपथ देत हिटलरच दडपण घेऊ नका, निर्भेळ खेळ करा, असा सल्ला सर्व खेळाडूंना दिला. 15 ऑगस्ट 1936 रोजी अंतिम सामान्याला सुरवात झाली. काही मिनिटात जर्मनीची दाणादाण उडवीत ध्यानचंद यांनी गोल करायला सुरवात केली. आपल्या संघाची अवस्था पाहून हिटलर मैदानातून निघून गेला. भारताने हा सामना ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे 8-1 अशा फरकाने जिंकून सुवर्णपदक पटकावले.
आता खरी कसोटी पुढे होती. सामन्याच्या दुसर्या दिवशी 16 ऑगस्टला हिटलरच्या हस्ते बक्षीस वितरण होणार होत. त्या रात्री ध्यानचंद यांना झोप लागली नाही. भारतीय प्रसारमाध्यमांपासून सर्वत्र एकच चर्चा होती. हिटलर ध्यानचंद यांना भेटल्यावर काय बोलणार बक्षीस वितरणासाठी आलेल्या गंभीर स्वभावाच्या हिटलरने ध्यानचंद यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यांना वरुन खालपर्यंत न्याहाळल. तेव्हा ध्यानचंद यांच्या फाटलेल्या बुटातून बाहेर आलेल्या अंगठ्याकडे हिटलरची नजर स्थिरावली.
हिटलरने नजर रोखून ध्यानचंदना विचारले "काय करतोस भारतात ?"
ध्यानचंद यांची छाती धडधडट होती. त्यांनी सांगितले, "सैन्यदलात सेवेत आहे" हे ऐकताच हिटलरने पुन्हा त्यांच्या पाठीवर थाप मारली.
"काय करतोस सैन्यदलात?" हिटलरचा पुन्हा प्रश्न "पंजाब रेजिमेंटमध्ये लांस नायक आहे." ध्यानचंद उतरले. “जर्मनीत ये... जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यदलात कर्नल पद तुला देतो.” हिटलरची ऑफर.
"नाही. पंजाब रेजिमेंटवर मला गर्व आहे... आणि भारतभूमीचा मला अभिमान आहे, असे बाणेदारपणे सांगत ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर क्षणात धुडकावली.ज्या हिटलर समोर उभ राहण्याची हिमत कोणी करीत नव्हते, त्याला नकार दिल्याने ध्यानचंद यांचं कर्तृत्व उंचावल होत.
अशा या ध्यानचंद म्हणजेच ध्यानसिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबादमध्ये झाला. त्यांचे वडील सामेश्वरसिंग सैन्यात होते. त्यामुळे कुटुंबाच स्थलांतरण ठरलेलच असायचं. त्यामुळे ध्यानचंद फक्त 6 वर्षेच शाळा शिकले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी सैन्यात नोकरी पत्करली. सैन्य दलात रंगणार्या हॉकीच्या सामान्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली. तत्कालीन मेजर बल्लेसिंग तोमर यांनी ध्यानसिंग यांच्या हातात स्टीक दिली. याच हॉकीस्टीकने ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनविले. काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या प्रकाशात हॉकीची प्रॅक्टीस करीत. याच त्यांच्या साधनेमुळे लोक त्यांना ध्यानसिंग ऐवजी 'ध्यानचंद' म्हणून संबोधू लागले.
1926 मध्ये ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाचा हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौर्यावर गेला होता. त्यावेळी ध्यानचंद 21 वर्षाचे होते. तेथे भारतीय हॉकी संघाने 21 पैकी 18 सामने जिंकले. या संपूर्ण दौर्यात भारतीय सैन्य दलाने 192 गोल केले त्यातील शंभरएक गोल फक्त ध्यानचंद यांच्या नावावर होते. त्यामुळे संपूर्ण क्रीडा विश्वाची नजर ध्यानचंद यांच्यावर पडली.
न्यूझीलंडवरुन आलेल्या भारतीय हॉकी संघाचे स्वागत ढोल ताशांच्या कडकडाटात झाले. ध्यानचंद यांना शिपाई पदावरून लांस नायक पदावर बढती मिळाली. 1928 ऑलिंपिक स्पर्धेआधी फोल्कस्टोन फेस्टिवलमध्ये भारताने ब्रिटनला 11 सामन्यांमध्ये पराभूत केल होत. हा पराभव ब्रिटनच्या जिव्हारी लागला. कारण आपल्याच गुलाम राष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागेल , असे ब्रिटनला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. त्यानंतर ऑलिंपिक सामन्यात भारताने औस्ट्रियाला 6-0 बेल्जियमला 9-0 स्वीत्झर्लंडला 6-0 डेन्मार्कला 5-0 आणि नेदर्लंड ला 3-0 ने पराभूत करीत सुवर्णपदकावर नाव कोरल होत. ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीच पहिलं सुवर्ण पदक मिळालं. सुवर्ण पदक घेवून येणार्या भारतीय हॉकी संघाला विशेषता हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना पाहण्यासाठी मुंबईत डॉकयार्डवर हजारो लोकांनी गर्दी केली होती. पेशावरपासून केरळपर्यंतचे लोक जमले होते. त्यादिवशी तब्बल 24 तास जहाजांची ये-जा बंद होती. भारतात हे प्रथमच घडत होत.
1932 चे ऑलिंपिक लॉस एंजिलीसमध्ये झाले. तत्पूर्वी सरावासाठी श्रीलंकेत (सिलोन) गेलेल्या भारतीय हॉकी संघाने श्रीलंकेचा पहिल्या सराव सामन्यात 20-0 आणि दुसर्या सामन्यात 10-0 असा दारुण पराभव केला. यातील 30 गोलपैकी निम्याहून अधिक गोल ध्यानचंद यांनी केले होते. नंतर अमेरिकेत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने 11-1 अशी जपानवर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. तर अंतिम सामन्यात यजमान अमेरिकेला 24 गोल करून भारताने धूळ चारली आणि सुवर्णपदक पटकावल. या सामन्यात ध्यानचंद यांनी 8 तर त्यांचा भाऊ रूपसिंगने 10 गोल केले होते.
1935 मध्ये भारतीय संघ औस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौर्यावर होता. त्यावेळी क्रिकेट महर्षि डॉन ब्रॅडमन स्वत: ॲमस्टरडॅमचा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. तेव्हा ध्यानचंद यांचा खेळ पाहून ब्रॅडमन प्रभावित झाले होते. या दौर्यात 48 सामन्यात ध्यानचंद यांनी 201 गोल केले. 'हे हॉकीप्लेयरचे गोल आहेत की क्रिकेट प्लेयरचे रन आहेत.' अशा शब्दात आश्चर्य व्यक्त करीत ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांचं कौतुक केल.
अशा या हॉकीच्या जादूगाराला ध्यानचंद यांना 1937 मध्ये लेफ्टनंटपदावर बढती देण्यात आली. पुढे त्यांना कॅप्टन आणि शेवटी मेजरपद देण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय हॉकी फेडरेशनने एशियन स्पोर्ट्स असोसिएशनकडे (ईस्ट आफ्रिका) सामने खेळू द्यावेत, अशी विनती केली, तेव्हा एशियन असोसिएशनने स्पष्ट शब्दात कळवल की, "ध्यानचंद खेळणार असतील, तरच या" . त्यावेळी ध्यानचंद यांचं वय 42 वर्षे होत. नोव्हेंबर 1974 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात विभाजनाच्या आगीचा धूर निघत असताना 42 वर्षाच्या ध्यानचंद यांनी आफ्रिकेत नेलेल्या संघात लाहोर, कराची आणि पेशावरचे खेळाडूही होते. यानिमिताने ध्यानचंद यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या कर्तृत्वासमोर व्देषाच्या सीमारेषा गळून पडल्याचे दिसून आले.
स्वातंत्र्यानंतर भारताने हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला. भारतीय हॉकीचे सुवर्णयुग साकारणार्या ध्यानचंद यांना उतारवयात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. 3 डिसेंबर 1979 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी कॅन्सरशी लढताना हॉकीच्या या जादूगाराच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाल. ध्यानचंद यांच्या इच्छेनुसार झाशीतील हॉकी मैदानावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याच मैदानावर ते तासनतास हॉकीचा सराव करायचे. अशा या हॉकीतील अनभिषिक्त सम्राटाला 'भारतरत्न' हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार बहाल केला जावा, अशी असंख्य क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे.
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दोघे यांची आज 18 वी पुण्यतिथी आहे. म्हणजेच ....
अधिक वाचा