By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार यंदाही मुंबईकरांना पाण्यात बुडवणार यात काही शंका नाही. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई पावसाळा आला तरी अजून सुरूच आहे. मेट्रो आणि बांधकामा करता अध्र्याहून अधिक मुंबई पोखरण्यात आली आहे.अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाचे तर काही विचारायलाच नको त्या शिवाय अधिकार्यांचे पोट्च भरत नाही.सखल भागांसह मुंबईतील भूमिगत नाल्यांची सफाई अद्याप सुरू झालेली नाही. या ठिकाणी नालेसफाईसाठी एकही कंत्राटदार पुढे न आल्याने ही प्रक्रिया रखडल्याची कबुली पालिका अधिका-यांनीच दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे जलमय होऊन अवघ्या मुंबईतील वाहतुकीचा फज्जा उडण्याची भीती व्यक्त होत आहे. नालेसफाईतील गाळातील भ्रष्टाचार दोन वर्षापूर्वी बाहेर काढण्यात आला व त्यानंतर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षी कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांवरच बहिष्कार टाकला. तीन वेळा निविदा काढूनही पालिकेला गटारांसाठी गाळ काढून तो वाहून नेणारे कंत्राटदार मिळाले नाहीत. पावसाळ्यात जर मुंबईत पाणी साचले, तर त्याला केवळ आणि केवळ मेट्रोचे कामच जबाबदार असेल, असा दावा करीत पालिकेने आताच हात वर केले आहेत. नाल्यात साठलेला गाळ, कचरा यामुळे तर पाणी साचतेच शिवाय गत दोन-तीन वर्षापासून मुंबई आणि परिसरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची कामे अद्याप संपलेली नाहीत. शहरातील पायाभूत सुविधा जुन्या झाल्या असतानाच पुलांच्या दुरुस्तीसह अनेक घटक त्यात जोडले गेले आहेत. शहरात विविध कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी आता रोजचीच आहे. नालेसफाईबाबत कंत्राटदार आणि अधिका-यांच्या मनमानी बेफिकीर कारभारामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई तुंबणार आणि मुंबईचा पुराचा धोका कायम राहणार हे वेगळे सांगायला नको. दोन वर्षापूर्वी पालिकेने केलेल्या पाहणीत २२५ भागांत पाणी साचून राहत असल्याचे निर्दशनास आले होते. दोन वर्षात यातील १००-१२५ भागांत दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने आता तेथे पाणी साचणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे. असे दावे पालिका दरवर्षी करते आणि दरवर्षी नव्याने पाण्यात ढकलते.
अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी तसेच बिल्डरने अतिक्रमण करून नाल्यांचे मार्ग रोखले आहेत वा दुसरीकडे वळवले आहे. पाणी तुंबू नये यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी उपाय करण्यात आले असून पालिका विभाग सतर्क असल्याचा दावा पालिका प्रशासन करते आहे. मात्र यातील फोलपणा पहिल्याच पावासात उघडा पडणार आहे.पालिकेने ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरीही कंत्राटदार आणि पालिकेची संगनमताने धूळफेक असून अद्याप निम्मे अधिक काम बाकी आहे.. मुंबई आणि उपनगरांत पावसाच्या पाण्याने तुंबणारी ठिकाणे, नाले, मिठी नदीचा परिसर, झोपडपट्टी, बांधकामांचा राडारोडा, बिल्डरकडून होणारे अतिक्रमणे, यामुळे अस्तित्वच संपलेले नैसर्गिक प्रवाह, रेल्वे ट्रॅकशेजारी साचणारा कचरा आणि त्यामुळे थांबणारी रेल्वे वाहतूक या सर्व समस्यांमुळे हैराण आणि विस्कळीत होणारे मुंबईकरांचे जनजीवन या गोष्टी मुंबईचे भ्रष्ट प्रशासन चालवणा-यांना आणि मुंबईकरांनाही नवे नाही.