By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. माणसालाही तो लागू होतो. बदलत्या काळानुसार माणूसही बदलत आहे. त्याच्या राहणीमानात आणि विचारसरणीतही आमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळतात. याच नियमानुसार राजकारणातही फरक जाणवत आहे. तसेच राजकीय पक्षांच्याही भूमिका बदलताना दिसत आहे. याचाच अनुभव सध्या महाराष्ट्रातही येत आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे होत असलेले कार्यक्रम ते नव्या-वळणावर असल्याचे स्पष्ट आहे. या दोन्ही पक्षांच्या या नव्या भूमिकेचा राज्याच्या राजकारणावर काय परिमाण होतील, ते नजिकच्या काळात पहायला मिळणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांना त्यांच्या गरजानुसार त्यांना नव्या वळणावर येण्यास भाग पडल्याचे चित्र दिसत आहे.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीचे निमित्त साधून शिवसेनेने वचनपूर्ती झाल्याचा आनंदात बीकेसीत जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेने परिस्थितीनुसार आपल्या धोरणात वारंवार बदल केले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेने जी नवी वाट चोखाळली ती सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. ठाकरे कुटुंबातील कुणीही आजवर प्रत्यक्षात कोणतीही निवडणूक लढविली नव्हती किवा सत्ता पद स्वतःकडे घेतले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरुन रिमोट चालवून राजकारण करीत असतं. ही परंपरा मोडीत काढीत प्रथम आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवून जिंकली. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केलेच शिवाय या सरकारचे मुख्यमंत्री पदही त्यांनी स्वीकारले. त्याचवेळी प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या पूत्र आदित्यला कॅबिनेट मंत्रिपदी बसविले. त्यासाठी भाजपशी असलेली जुनी मैत्रीही तोडली. अशाप्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले. ही शिवसेनेने चोखाळलेली नवी वाट महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेणार? शिवसेनेला त्याचा कितपत लाभ होणार? इत्यादी प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. मात्र शिवसेनेच्या या नव्या भूमिकेचे शिवसैनिकांनी स्वागत केल्याचे आजतरी पहायला मिळत आहे.
दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणारे राज ठाकरे अध्यापही राजकारणात चाचपडत असल्याचे दिसत आहे. गेल्या १४ वर्षात प्रथमच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिवेशन गोरेगावमधील नेस्को मैदानावर पार पडत आहे. या अधिवेशनात राजपूत्र अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरणही केले आहे. गेल्या १४ वर्षात मनसेला अपेक्षित अशी राजकारणावर पकड बसवता आली नाही. उलट गेल्या पाच-सहा वर्षात पक्षाची गती इतकी मंदावली की, पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेतर्फे उमेदवार उभे न करताही राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला. पण त्या भाषणाचा भाजपविरोधी पक्षांना विशेष काही लाभ झाला नाही. तर केवळ प्रचारासाठी राज ठाकरेंचा उपयोग करून घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विधानसभा निवडणुकीपासूनच मनसेकडे पाठ फिरविली तर शिवसेनेला साथ देत शरद पवारांनी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकत्र मोट बांधून महाविकास आघाडी सत्तेवर आणण्याचा चमत्कार केला. सहाजिकच मग आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. आजच्या या अधिवेशनात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांची ही वाटचाल नव्या वळणावरुन सुरू होणार असल्याचीच चिन्हे दिसत आहेत.
इंटरनेटमुळे जग जवळ आलं पण माणूस हरवला. एकमेकांमधील संवाद संपुष्ट....
अधिक वाचा