ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बारावीचा निकाल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बारावीचा निकाल

शहर : देश

काल बारावीचा निकाल लागला आणि मन एकदम २3 वर्ष मागे गेलं. खरं तर बारावीच्या निकालाचा आणि त्या गोष्टीचा अर्थाअर्थी तसा काहीच संबंध नव्हता, पण जे घडलं ते नेमकं निकाल लागल्याच्या दिवशीच म्हणून सगळ आठवलं. त्यावेळी निकाल असे दुपारी एक वाजता आणि on line लागायची पद्धत नव्हती. त्यामुळे सरळ शाळेत किंवा कॉलेज मध्ये जाऊन mark sheet हातात पडेपर्यंत काय उजेड पडलाय ते समजायचं नाही. त्यातल्या त्यात जर कुणाचे नातेवाईक सचिवालय किंवा मंत्रालयात असले तर आदल्या दिवशी निकाल समजायचा. माझी मामी होती सचिवालयात, पण असं आदल्या दिवशी कळण्यात मला काही रस नव्हता म्हणून मी कधीच नंबर द्यायच्या भानगडीत पडले नाही. आणि आपला result आपल्या आधी दुसऱ्या कुणाला तरी कळणार म्हणजे कल्याणच… तेव्हा नकोच.

त्या दिवशी काहीतरी ११ च्या सुमारास मी आणि माझी एक खास मैत्रीण सविता धडधडत्या जीवाने कॉलेज मध्ये गेलो. जातानाच जाणवलं मागून कुणीतरी येतय. हळूच पाहिलं तर बच्चाचा भाऊ. सविताला सांगितलं सुद्धा तसं कि "बघ न गं, तो बच्याचा भाऊ आपल्या मागे येतोय." तर ती म्हणे, "काही नाही गं, तू लक्ष नको देऊस, तो आमच्या समोरच्याच bldg मध्ये राहतो, जात असेल कुठे तरी, आपला कशाला पाठलाग करेल? आणि मला तर तो बहिण मानतो."

'हिला बहिण मानतो म्हणजे संपलंच, हा नक्कीच माझा पाठलाग करत असणार. जाऊ दे, बघू पुढचं पुढे. एक तर हे result च tension आणि त्यात हा असा मागे मागे येतोय.' माझी आपली मनातल्या मनात बडबड सुरु. Result घेऊन आम्ही बाहेर पडलो तर समोरच्या बस stop वर उभा. नेमका मलाच दिसला (माझे डोळे त्यालाच शोधत होते कि काय देव जाणे) सविताला म्हटल सुद्धा, "बघ बघ, तुझा so called भाऊ जो काही कामासाठी बाहेर पडला होता तो सगळी कामं संपवून कसा तुझ्या स्वागताला उभा आहे." आता तिला पण जरा वेगळं वाटायला लागलं. म्हणाली, मरू दे त्याला, चल आपण घरी जाऊ." घरी निघालो तर हा आपला आहेच मागोमाग… मुद्दाम काही वळून नाही पाहिलं, पण एखाद्या टर्निंग वर हळूच पहायचो आम्ही. असं करत करत एकदाचं घर गाठलं. ती तिच्या घरी, मी माझ्या घरी आणि हा आमच्या bldg समोर.

मग घरी येउन जरा मिळालेल्या मार्कांवर चर्चा बिर्चा झाली, आणि B.Com ला admission घेऊन टाकू असा ठरलं. या सगळ्या गोंधळात Result च्या Xerox काढायचं राहुनच गेलं. आई वैतागली सुद्धा कि लक्ष कुठे असत गं तुझं? आता आईला काय सांगणार? खाल्ला ओरडा मुकाटपणे आणि संध्याकाळी जाऊन काढेन असं सांगितलं.

पाचच्या सुमारास निघाली आमची स्वारी Xerox काढायला. खाली उतरले तर हा आहेच समोर. याला काय साक्षात्कार बिक्षात्कार होतात कि काय? याला कसं कळल कि मी बाहेर पडणार आहे? टपलाय मेला माझ्या येण्याजाण्यावर. पण आता माझी खरी कसोटी होती. आल्या पावली मागे फिरले तर त्याला वाटणार कि मी त्याला घाबरले, आणि सरळ निघाले तर परत हा कुत्र्यासारखा मागोमाग येणार. काय करावं बरं? शेवटी निघाले एकदाची. जो होगा देखा जायेगा. अज्जिबात मागे वळून पाहिलं नाही. आमची कॉलनी संपली आणि एक जरा सामसूम रस्ता लागला तसा त्याने स्पीड वाढवून मला गाठलं. मी भीतीने गारठले होते पण चालायची अज्जिबात थांबले नाही.

पाच दहा पावलं माझ्या बरोबर चालल्यावर आपल्या भसाड्या आवाजात तो मला म्हणाला, "जर थाम, मला बोलायचं हाये तुज्याशी."

"काय बोलायचं आहे?"

"मला चिट्टी द्यायची हाये"

"कसली चिट्ठी? आणि मला का?"

"मी लीवलीय तुज्यासाटी"

"काय ते तोंडाने सांग, मला नको तुझ्या चिठ्या बिठ्या" भीतीने नुसती गळण उडाली होती, पण अगदी उसनं अवसान आणून मी घाबरले नाहीये हे दाखवताना पार वाट लागली होती.

"मला पिरेम जालंय तुज्यावर" शेवटी expected वाक्य आलं पण ते अशा पद्धतीने आल कि पोटात नुसत ढवळायला लागलं होतं.

"पण मला नाही झालं रे, sorry"

"बग विचार कर, तुला रानीसारकी ठेवेन"

आता अगदी कहर झाला, म्हटल बास झाल हे घाबरणं बिबरणं, आत्ता जर मी स्पष्ट नाही बोलले तर हा आयुष्यभर असाच मला त्रास देत राहील. म्हटलं "तू मला राणीसारखी ठेवशील रे, पण जेव्हा तुझा gangster भाऊ पोलिसांना सापडत नाही तेव्हा ते तुला कुत्र्यासारखा फरफटत घेऊन जातात तेव्हा या राणीने काय करायचं याचा विचार करून ठेव आणि मग प्रेमाच्या गोष्टी कर. तुमच्या आणि आमच्या आयूष्यात खूप फरक आहे. उगीच मला प्रेमाच्या नावाखाली यापुढे त्रास देऊ नकोस." चेहरा पडला त्याचा, पण झालं ते बरं झालं. उगीच त्याच्या गुंडगिरीला किती दिवस घाबरून रहणार होते मी. नंतर सुद्धा त्याने बराच वेळा पाठलाग केला, पण बोलायला मात्र नाही आला परत कधी.

बारावीच्या result च्या निमित्ताने हे सगळ आठवलं इतकंच. त्याच्या भावाचं encounter झाल्याचं वाचलं पेपरात, तो जिवंत असेल कि मेलाय देव जाणे.

मागे

स्री सत्व.....
स्री सत्व.....

स्री सत्व..... जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको मरते... तेव्हा त्याला विधवा म्हण....

अधिक वाचा

पुढे  

पुणे आणि तिथले पाव्हणे
पुणे आणि तिथले पाव्हणे

पुण्यात आल्यावर पुण्याची उणी दुणी काढणे हे मुंबईकरांचे पाहिले काम पण तरी ए....

Read more