ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मकर संक्रांतीचे महत्व

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 मकर संक्रांतीचे महत्व

शहर : मुंबई

           सर्वसाधारणपणे दरवर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला येते. मात्र यावर्षी ती १५ जानेवारीला आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या संक्रमणास मकर संक्रांत असे म्हणतात. तथापि ज्योतीष शास्त्रात या सणाचे महत्व वेगळ्या पद्धतीने सांगण्यात येते. ही संक्रांत कोणत्या वाहनावर आहे, तिने काय परिधान केले आहे, यावरून होणारे संभाव्य परिणाम काय असतील? ते कशावर आहे? हे त्यासाठीच आवर्जून पाहिले जाते. त्यामुळेच एखाद्या अनिष्ट घटनेविषयी भाष्य करण्यास संक्रांत या शब्दाचा उपयोग केला जातो. पण संक्रांतीपासूनचे पुढचे सहा महीने शुभ मानले जातात.

       मकर संक्रांतीला उतरायण असेही म्हणतात. म्हणजेच या दिवसापासून पुढचे सहा महीने हा उतरायणाचा कालावधी असतो. वर्षाचे दक्षिणायन आणि उतरायण असे दोन कालखंड मानतात. यातील उतरायणात मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशी धारणा आहे. म्हणूनच महाभारतात इच्छा मरणाचे वरदान प्राप्त असलेले पितामह भीष्म दक्षिणायन सुरू असताना शरपंजरी पडले. परंतु त्यांनी उतरायण सुरू होताच प्राण त्याग केला. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करतात. त्याचबरोबर व्रत करणं, कथा वाचन करणे, दान करणे आणि सूर्याची उपासना करण्यालाही महत्व दिलं जातं.

          मकरसंक्रात हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पुजा केली जाते. या सुगडांमध्ये धन-धान्य टाकले जाते, आणि मनोभावे पुजा केली जाते. त्यानंतर गृहिणी एकमेकींना वाण देतात. आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किवा सुगडे आणले जातात. त्यांना दोर्‍याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये उसाचे काप टाकले जातात. त्याबरोबरच तीळ, गुळ, गाजर, गव्हाचा लोंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही आटोल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गूळ देऊन, छोट्या भेटवस्तू देवून, हा सण साजरा करतात यालाच वाणं देणं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशीच गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन झाले होते, अशी आख्यायिका आहे. 

          या संदर्भात प्रसिद्ध पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीची तारीख पुढे सरकत जाणार आहे. याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. तेथे सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असते. सूर्य ३१ डिसेंबर रोजी धनू राशितून मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिनमान वाढत जाते. परंतु आपली पंचांगे ही निरयन असल्यामुळे सूर्य निरयन मकर राशित जेव्हा प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रांत असते. मकर संक्रांत नेहमी १४ जानेवारीलाच येते असे नाही. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ पर्यंत मकरसंक्रांती १३ जानेवारीला येत होती. १९७२ पासून २०८५ पर्यंत मकर संक्राती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल, सन २१०० पासून मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल, असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले. 
         यावर्षी संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा बुधवार दि.१५ जानेवारीला सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी ९ वाजेपर्यंत असेल. 
          मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पंतगोत्सवही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. असंख्य अबालवृद्ध या दिवशी मोठ्या हौसेने पतंग उडवितात. मात्र या पतंग उडविण्याचा नादात अनेक पक्षीही जखमी होतात, तर काही पक्षी मांजात सापडून मरतात. त्यामुळे पतंग उडविताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पक्षी प्रेमींनी केले आहे.                    

 

मागे

आत्महत्या शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या
आत्महत्या शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या

          महाराष्ट्रावर जवळपास ५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर असल्य....

अधिक वाचा

पुढे  

लष्कर दिनाचे महत्व
लष्कर दिनाचे महत्व

         आपल्याला १५ ऑगस्टला स्वतंत्र दिन, २६ जानेवारीला प्रजासत्ताक द....

Read more