ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 

शहर : मुंबई

काय लिहावं , हा सध्या पडलेला प्रश्न,जे लिहावं ते खर आणि बर लिहावं हे त्यावरचं साधसोप्प उत्तर..अशी साधिसोप्पी उत्तर देणारी आटपाट नगरं लहानपणापासून तुम्ही आम्ही वाचत आलेलो आहोत, मोकळ्या मोबाईलन नुकताच जन्म घेतलेलं वय त्यामुळे  मी ही या गोष्टी वाचल्या तुम्ही ही या आटपाट नगरातल्या गोष्टी  हटकून  वाचल्या असतीलचं......
असच एक आटपाट नगर .....नगर कसलं  पृथ्वीवरील  स्वर्ग समजल्या जाणाऱ्या तुमच्या आमच्या नंदनवन अश्या कोकणातलं जेमतेम दोन हजार वस्तीच  जिवाभावाचं टुमदार गावं...
हिरवागार अश्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं(तळ कोकणातलं) मालवण तालुक्यातलं कर्ली नदीच्या काठावर वसलेलं मौजे तळगाव ,आणि याच जिवंत माणसांच्या तळगावातल्या एका नसलेल्या बंधाऱ्याची ही   असलेली गोष्ट.....
गोष्ट तशी खरीखुरी ,गोष्ट कसली... एक  चाळीस वर्षाचा खडतर प्रवासाच...जो अश्वत्थाम्यासारखा  वनवनतचं  राहिला.
गोष्टी वाचूनं बोध घेण्याचा काळ  इतिहासजमा होण्याची प्रकिया सध्या जोरदार सुरू आहे.पण ही गोष्ट खर्याखुऱ्या लोकशाहीत राहणाऱ्या माणसांची त्यांच्या यातनामय प्रवासाची फक्त वाचून बोध घेऊन न बसता  वाचताना माणूस म्हणून मनाने पूर्णपणे जागं  व्हावं..आणि जाग झाल्यावर डोळ्यात आळसावलेली  सकाळ न ठेवता रातीच्या गर्भार  उष कालाने पेटून उठाव असच....
याचं मौजे तळगावात येळपीचा  वहाळ बारमाही वहात असतो साधारण दरवर्षी पंधरा  मार्च नन्तर  उपरोक्त वहाळात कर्ली नदीच्या भरतीचे खारे पाणी चढत असल्याने त्या पाण्याचा बारमाही पिकांवर वाईट परिणाम होतो.त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना  सदर  बंधाऱ्याची नितांत आवश्यकता आहे.या बंधाऱ्यातून दरवर्षी पंधरा मार्चपर्यँत शंभर एकर जमिनीस पाणीपुरवठा करणाऱ्या या बंधरातून पंधरा मार्च नन्तर नदीचे खारे पाणी वहाळात  चढत असल्याने शेतीसाठी हे पाणी निरुपयोगी ठरते, 
सध्या वहाळावर जिल्हा परिषदेचा दहा अश्वशक्तीचा एक व पाच अश्वशक्तीची दोन इंजिने कार्यरत  आहेत  त्यामुळे सुमारे पस्तीस  एकर शेत जमिनीत आज प्रत्यक्ष पिके घेतली जातात.येथील शेतजमिनीस पंधरा मार्च नन्तर खरी वहाळातील या पाण्याची गरज भासते,वहाळ बारमाही वाहणारा असल्याने  साठवलेल्या पाण्याचा उपसा केला तरी पाण्याचा तुटवडा भासणार नाही
याच मागणीसाठी गेली चाळीस बेचाळीस वर्ष स्वतःची पदरमोड  करत श्री वसंत अंनत दळवी हे शासकीय दरबारी,स्थानिक खासदार आमदार,जिल्हा परिषद ,ग्रामपंचायत  यांच्याकडे सतत  वरील  बंधाऱ्याबाबत पत्रव्यवहार करत आलेले आहेत.त्यांच्याच पत्रव्यवहाराची दखल घेऊन सन 1989 मध्ये लघु पाटबंधारे विभाग ,कणकवली यांच्याकडून सदर बंधाऱ्याबाबत माहिती पडताळणी(सर्व्हे )होऊन  बंधाऱ्यामुळे नदीचे खारे पाणी  वहाळात  येण्यास प्रतिबंध होईल असे  निदर्शनास आणले;तसेच त्यांच्या अंदाज पत्रकाप्रमाणे बंधाऱ्यात पाणी साठविण्याची क्षमता चार दशलक्ष घनफूट गृहीत धरून 59 एकर शेत जमिनीस  पाणी पुरवठा होण्यासारखा आहे असे त्यांच्या पाहणी अहवालात नमूद केले असून  येथील लागवडीखाली येणारे क्षेत्र 100 एकर शेतजीमिनीचे आहे.
सन 1984  साली 3 लाख रुपये खर्च करून पाटबंधारे खात्याने  बांधलेल्या या बंधाऱ्याचे  सदोष बांधकामुळे थोड्याच दिवसांत तीन तेरा वाजले,भगदाडे पडून भरतीच्या वेळेस नदीचे खारे पाणी  वहाळात घुसू लागले.आजूबाजूची शेतजमिन वाहून गेली. बंधारा फुटून एक नदीच तयार झाली .
आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळूनही गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासनाच्या अकार्यक्षम धोरणामुळे येळपीच्या वहाळावरील या बंधाऱ्याचे काम आजवर रखडलेलेच आहे..
  चाळीस वर्ष रखडलेले  या बंधाऱ्याचे काम मार्गी लावून शेतीचे होणारे नुकसान टाळावे म्हणून  तळगावच्या  शेतकरी ग्रामस्थांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरांना निवेदन देऊन झालं
पण परिस्थिती जैसे थे, परिस्थिती बदलायचं नावच घेत नाही.पालकमंत्र्यांनी पालकांसारखं वागायला हवं,आपल्या एकाद्या मुलाला जर जखम झाली तर दिवसरात्र  जागून आई त्याची काळजी करते,याच काळजीपोटी  तर  झालेली जखम बरी करावी नाहीतर ती चिघळते आणि  या मौजे तळागावच्या गावाची जखम त्यांनी त्याच  आईच्या मायेने जाणून घेऊन ही भळभळती जखम कशी बरी होईल यासाठी जातीने लक्ष द्यायला हवं. हे गाव ज्यांच्या विधानसभा मतदारसंघात येत ते आमदार वैभव नाईक आहेत कुठे....?
..का या निवडणुकीपासून पुढील निवडणुकीपर्यंत हे  गाव त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे हे ही द्यावं सांगून. लोकप्रतिनिधी असे तर इकडे आधीकारी तर नुसते शब्दांचे खेळ  करण्यात मग्न आहेत ,काम करणे तर सोडाच पण याच एक पाऊल पुढे म्हणजे  वर गावकऱ्यांना मालवणचे जल उपअभियंता पाणी वापर करण्याचा अजब सल्ला देतात,ज्या गावातील उंबरठयांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे,ज्या गावाचं अजूनही  पायवाटेतुन डांबरी रस्त्याकडे परिवर्तन झालं नाही..जिकडे अजूनही शासनाची  एसटी वेळेवर जात नाही,जे गाव विकासापासून कोसो दूर आहे तिथे पाणी वापर  संस्था निर्माण  करण्याचा  सल्ला प्रशासनातले लोक देतात,आहे की नाही गंमत. यांच्या अश्या गंमती सामान्यांच्या जीवावर उठतात.तीवरे धरणाचं उदाहरण ताज आहेच लोक जीवानिशी गेली अनेकजण बेपत्ता झाले, तीवरे धरण बांधणारा खेकडा परदेशी पळून गेला आणि नाव आलं  बिचाऱ्या पाण्यातल्या खऱ्या खेकड्यांवर. आहे की नाही जीवावर उठलेली गंमत .यांनी अश्या गंमती करायच्या यांच्या गंमतीची आता जनतेला सवय झाली आहे.लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही शाही सुकवून वाळत पडली आहे,
निवडणूकीपूरत यायचं  विकासाच्या गप्पा मारायच्या आणि निघून जायचं,मग आहेत गावकरी   माणसे तुमच्या पायऱ्या झिजवायला.
1987 पासून ते आतापर्यंत मुख्यमंत्री ,मंत्री ,पालकमंत्री,आमदार खासदार अधिकारी  या सर्वांना अनेकदा निवेदनं देऊनही बंधारा  काही पूर्णवत झाला नाही.तश्याच जखमा तसाच प्रश्न सगळं काही तस आयोध्येत राममंदिर बांधणार्यांनी या तळगावतल्या लोकांच्या आयुष्यातून त्या येळपीच्या बंधार्यातून हरवलेला राम परत आणावा. ज्या कोकणाने या जिल्ह्याने  शिवसेनेला भरभरून दिल त्या पक्षाचे पालकमंत्री आमदार खासदार बघतो करतो याच्यापुढे जात नाहीत.भावनेशी खेळून निवडणुका जिंकता येतात आणि येतीलही पण या भावना ज्या माणसांच्या असतात ती माणसे या रोजच्या प्रश्नांनी जर हतबल होत असतील तर खासदार तुमचं करायचं  काय. लोकप्रतिनिधी शब्दांचे खेळ तर अधिकरी कागदाचे खेळ करण्यात मश्गुल आहेत.आपल्या  देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष होत आली  आमचं दुदैव म्हणावं लागेल की, आम्ही अजूनही व्हॉटर मिटर गटर यावर निवडणुका लढवतोय एक बंधारा गेली चाळीस वर्षे वर्षेच मोजतोय विकासाच्या गप्पा मारणार्यांनी विकास नेमका आहे कुठे हे तरी सांगावं.यांनी त्यांनी 60 वर्ष काय केले म्हणायचे त्यांनी यांच्यावर सोडून मोकळं व्हायचं,अरे ते वांझोटे होते म्हणून तुम्हाला सत्ताधारी बनवलं या कोकणी माणसाने तुमच्या हाती सत्ता दिली मग तुम्ही तुमच्या गर्भार कामाने तो विकास जास्तीत जास्त जन्माला घालायला हवा होता,तो विकास करायला हवा होता.पण तुम्ही त्यांच्यापेक्षा वांझोटे  निघालात मग या गावकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे. हवा भरभरून भरलेले सत्ताधारी आणि हवा काढून घेतलेले विरोधी पक्ष या सगळ्यात कोकणी माणसाचं नुकसान होत आहे.
लालफितीत अडकून पडलेला कारभार  काम करण्याची मानसिकता हरवून बसलेले लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी यांच्या या टोलवाटोलावीला गावकरी कंटाळून गेले आहेत.
पाच  पाच वर्षे आयाराम गयाराम  जयश्रीराम चालूच आहे अशीच कित्येक पाच वर्षे या लोकांच्या गावकऱ्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहेत.कोकण कँलिफोर्निया होतय पण त्या कोकणाला जिवन्त ठेवणार अश्या अनेक गावातलं एक गाव असणार  तळगाव  अश्वत्थाम्यासारखी भलभळती जखम घेऊन का उभं .
1987 पासून खेटे मारून1984 साली बांधलेला बंधारा थोड्याच कालावधीत कोसळला पुढे अठरा वर्षांनन्तर जाग आलेली शासनाने 2000 जी आर (शासकीय निर्णय) काढला पण त्यालाही  लालफितीचे ग्रहण लागून तो ही शासकीय निर्णयांप्रमाणे हरवून गेला.
अशी आहे  या बंधाऱ्याची अजब गोष्ट गावकऱ्यांच्या अथक  कष्टाने बंधारा उभा राहिला आणि काही दिवसांत  कोसळला ,कोसळला तो कोसळला त्याच्याकडे बघायला लोकशाहीतल्या  ना राजाला ना त्याच्या अधिकारी कारभार्याला  वेळ आहे सगळे सत्तेचे वारकरी जनतरुपी पांडुरंगाला लालफितीत अडकून खुशाल आहेत.
हाच बंधारा कधी तरी होईल माझ्या गावाला न्याय मिळेल म्हणून याच बंधाऱ्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवून थकलेले वसंत दळवी आजही उभे आहेत.80 वर्षाचा हा माणूस डोळ्यात प्राण आणून आजही लढतोय.सगळ्या सगळ्यांच्या पायऱ्या झिजवूनही न्याय नाहीच तो नाही.आयुष्याची संध्याकाळ जवळ आलेले वसंत दळवी आजही शासनाला जाग येईल बंधारा पूर्ण होईल म्हणून आस लावून बसले आहेत .या दळवींच्या कधीही घरी जावं  तर प्रकृती साथ देत नसतानाही हा माणूस कागडांचा ढीग समोर काढून मंत्र्यापासून अनेक अधिकाऱ्यांना केलेले पत्रव्यवहार नोंदी दाखवत हो बघा जरा यांना कधी जाग येईल ते बघा, माझ्या गावाला कधी न्याय मिळेल तेवढं बघा जरा केसरकर म्हणून हात जोडून विनवत असतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अमुक कायदे अमुक सोयी यांची घोषणा करनाऱ्यांना या जेष्ठ माणसाची वणवण दिसत नाही का.की  झोप न येताच झोपेचं सोंग घेऊन चिडीचुप झालेल्यांनी या गावकऱ्यांनी न्याय मागावा तर कुठे अन कुणाकडे......तुमच्या अकार्यक्षमतेचा तुमच्या नतद्रष्टेचा या वसंत दळवींच्या डोळ्यातलं पाणी  हा त्याचा हिशोब आहे..बांधलेले बंधारे वाहून जातात वाहिलेल्या बंधाऱ्याला मग कोणी वाली नाही अशी अवस्था हाच या तळगावची झाली आहे.पाणी वाहून अख्या गावाची नदी होते सारी शेती वाहून जाते गावचा दुसऱ्या गावांशी संपर्क तुटतो जनजीवन विस्कळित होते त्याची दखल शासनदरबारी घेतली जावी कोकण कोकण म्हणून ऊर बडवून घेणाऱ्यांनी कोकणातल्या  या गावाकडे लक्ष द्यावे तिवरे सारखा हा ही बंधारा अवघ्या दोन वर्षात पडतो भेगा पडतात ज्या तालुक्यात 350 वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजून  ताठ मानेने उभा आहे तिथे या तळगावतला बंधारा कोसळतो गावात नदी तयार होते हे या डिजिटल कोकणाला ही शोभणारी  गोष्ट नाही आणि डिजिटल भारताला ही
कोकणी माणूस संयमी शांत तो मोर्चे आंदोलने करत नाही धरणे धरत नाहीत म्हणून त्याच्याकडे कुणीच न बघणे हा करंटपणा करू नका.फार काही मागत नाही जे आहे त्यांच्या हक्काचं ते त्यांना द्या ..विनंत्या करून हात थकले आणि सरकार दरबारी खेट्या मारून चप्पल झिजून पाय निस्तब्ध झाले इतक काही झालं आहे या लोकशाहीतल्या आटपाट नगरात,न्याय कधी मिळेल माहीत नाही पण आज ही डोळ्यात बंधाऱ्यांची स्वप्ने घेऊन वसंत दळवी उभे आहेत...त्यांना  त्यांच्या गावकऱ्यांना खात्री आहे उशिराने का होईना शासनाला जाग येईल .आमचा बंधारा पुन्हा उभा राहील,पाण्याने नदी होणार गाव शेती वाचेल ..ही आशाच कोकणी माणसाला जिवन्त ठेवते...आटपाट नगरात ही शेवटी राजा प्रजेच दुःख जाणून त्यांना  समतोल न्याय द्यायचा.....

 

मागे

ईव्हीएम मधील “नोटा” चा पर्याय ही बिन कामाचा
ईव्हीएम मधील “नोटा” चा पर्याय ही बिन कामाचा

निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वाधिक चर्चा आहे ती “नोटा” ची “नोटा” चे द....

अधिक वाचा

पुढे  

खेळांचा राजा - मल्लखांब!
खेळांचा राजा - मल्लखांब!

ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या ....

Read more