By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 07:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लेखनाला आवड,व्यासंग,छंद गंध म्हणण्याइतपत भारदस्त शब्द माझ्या शब्द गाठोड्यात नितांत भरून आहेतच पण हल्ली सगळे लेखनकरी धंदेकरी झाले आहेत म्हणून लेखनाला छानपणे धंदा म्हटलं.
तसे लेखनाचे विविध प्रकार आहेत पण त्यातला त्यात आणि मोजक्या शब्दात मनात ओथंबलेलं जाणिवेचं, नेणिवेच आभाळ मुक्त करण्याचं साधन आणि साध्य म्हणजे कविता. तशी कविता ही जगणं सुंदर करणारी नितांत सुंदर गोष्ट.पण लिहिणाऱ्यांनी हल्ली तिला हव्यासाच्या सर्वोच्य पातळीवर नेऊन तिचा गल्लेभरू बाजार मांडला आहे.आणि त्या बाजारात प्रत्येकजण विदूषक रुपी व्यापारी होऊन मनसोक्त नाचतोय.ट ला ट लावून कविता लिहिणारे आणि ती कविता मिरवणाऱ्या कवड्यांची तर हल्ली साहित्य बाजारात भरघोस चलती आहे .त्यांच्या या चलतीला माझा विरोध नाहीच,त्या चलतीच्या नावावर खरी कविता बदनाम होते याचं कविमनाला विषण्ण दुःख आहे.
खरंच का रे? बाबा कविता समजायला आणि लिहायला इतकी सोप्पी आहे का? आपलं काहीतरी लिहावं आणि द्यावं कवितेच्या नावाने चिकटून,आणि लोकांची वाहवा मिळवत कवी कवयित्री म्हणून घ्यावी स्वतःची पाठ थोपटून.भराभर लिहून कविता होत नाहीत ,होतात ते फक्त शब्द आणि खरी कविता राहते कोसो दूरच..त्या कोसोदूरवरून कवितेचं भरलेपण लिहिणार्यांना जपता आणि व्यापता ही आलं पाहिजे.एखादी ओळ किंवा एखादी कविता सुचणे हाच क्षण त्या लेखकाच्या आयुष्यातला जगण्याचा क्षण असतो,भोवतालच सारं जग विसरून कलावन्त तो भारलेला क्षण जगत असतो ,माझ्या मते लेखकाचा हा क्षण म्हणजे असीम प्रसूतीचा काळ बाकी तो फक्त जगतो ,पण कवितेचा हा गर्भारपणा जेव्हा त्याच्या वाट्याला येतो तेव्हा तो मोहरून जातो.लेखकाचा असीम आनंदाचा हाच तो अभूतपूर्व काळ.
कवीता लिहिणे आणि कविता जगणे यात ही फरकचं,अवतीभवती कुठंल्या सत्कार समारंभाला न जाता,कुठेही न मिरवता फक्त कविता लिहिणारी निस्सीम माणस ही पहिली आहेत मी , त्यांची कविता जळत असते पोटाच्या भुकेत..देशाच्या -राज्याच्या कुठल्या तरी कानाकोपड्यात रहाणारी ही माणसे यांच्या कविता ही अश्याच कुठल्या तरी कागदावर बंदिस्त पडून असतात पण त्यांची आभाळवलये जग विहारत असतात,भटकंतीत अशी खूप माणसे भेटली कोल्हापूरचा शिरपा ,सिंधुदुर्गचा बन्या,गडचिरोलीची सुंती असो व औरंगाबादचा वकील रमेश ही,अशी यादी लांबलचक आहे पण या माणसांना ज्या टोपणनावाने हाक मारली जाते तीच नावे ठेवून मी इथे त्यांना लिहिलं आहे,कारण माती जगणारी ही माणसे खऱ्याखुऱ्या अस्सल मातीतली आहेत आणि खर साहित्य खरी कविता ही अशी सुपीक मातीतून जन्माला येते,आजूबाजूला जीवन्त माणसांच्या प्रदेशात घडणाऱ्या घटनांचा भावनाकल्लोळ ही खऱ्या कवितेत साकार होत असतो मानसिक पातळीवर आकार घेत असतो,चकचकीत झरोक्यात बसून माती लिहिता येत नसते त्यासाठी ती मातीही आणि कविताही जगावी लागते तेव्हा कुठे जातिवंत शब्दांच्या गर्भार कळा सुरू होतात. रानावनात राहूनही कविता लिहिता लिहिता जगण्याचा आणि जगता जगता लिहिण्याचा काय तो अभूतपूर्व सोहळा ही माणसे करत असतात. सुशेगाद जगण्याचा आनंद आज काय तो असेल....
पूर्वी कविता प्रसिद्ध व्हायच्या आता कवी प्रसिद्ध होण्याचे दिवस आहेत.दोन चार कडवी लिहून वा एकादा काव्यसंग्रह प्रसिद्ध करून व्यासपीठावर बिनबोभाट मिरवणारे आताचे कवी पाहिले की,लिहीणार्या हाताला धरधरूनकंप सुटू लागतो.चार पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यावर प्रसिद्ध होणाऱ्या त्या कवींचा काळ खरच कालबाह्य झाला की काय हा प्रश्न कवी मनाला पडत रहातो.कवींनी प्रसिद्ध व्हावंही जरूर व्हावं त्याबद्दल माझ्या पोटात पोटशूळ उठण्याचा प्रश्नच नाही.पण लगोलग प्रसिद्धी डोक्यात जाते आणि मग खरी कविता अधिकाधिक चांगली होण्याची प्रकिर्या थांबते.आणि मग लिहिले जातात ते फक्त आणि फक्त वांझोटे शब्द आणि भावनांची पोखरलेली दुखणी .पुरस्कार घेण्याच्या इर्ष्या त्यासाठी वाटेल तो स्तर गाठायचा.जत्रा भरवावी तशी भरणारी साहित्य संमेलने तिथे होणारे ते रटाळ काव्यवाचन ,साहित्यावरील चर्चा ,कवी व्यासपीठावर कविता वाचता असतात आणि खरी कविता केव्हाच तिथून आपलं गाठोडं घेऊन पसार झालेली असते.कवींचे तयार झालेले घोळके समूह (ग्रुप)मग पंगती फिरवाव्या तश्या आपल्या आपल्यातच कवी संमेलनाची आमंत्रणे पुरस्कार फिरवत रहातात,ही कवितेतली टोळकी आता उदंड होऊन रोज प्रसिद्ध होत आहेत. मराठीत कविता लिहिणाऱ्या कवींची मुलं शिकणार कॉन्व्हेंट मध्ये आणि हे मराठी वाचवा यासाठी पानेच्यापाने खर्च घालणार, हा सगळ्यात मोठा विनोद....कवितेला वाचक नाही ,काव्यसंग्रह विकले जात नाही असही एक जुनंच रडगाणं आहेच,मनाची पाखरे हाकण्याऐवजी आपण रसिकांचे ,प्रेक्षकांचे देणेकरी आहोत.या भावनेतून लिहावं ना,मुळात कविता ही तालसुरातली गोष्ट पण मुक्तछदात लिहिता लिहिता आपण कवितेलाच तालासुरातून मुक्त करत सुटलो आहोत याचाही विचार बेताल सुटलेल्या महामार्गावरून वळून जाणिवेच्या पायवाटेवर येऊन आपल्याला करायला हवा.कवितेसारख्या नाजूक गोष्टीला ओरबाडून ओरबाडून घायाळ करून तिची धिंड काढून तिच्या धिंडीत सामील होऊन कवी म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. मला स्वतःला कवितेतलं खूप काही कळतं अस ही काही नाही ,आणि ते आयुष्यभर कळणार ही नाही ,विद्यार्थी होऊन कवितेच्या विद्यापीठात संचार करण्याचा सजगपणा जगायचा आहे मला...खरी कविता कळायला अनेक जन्म घ्यावे लागतील,आणि कवितेच्या चांदण्यात न्हाऊन ते जन्म ही सार्थकी होतील.मोठमोठ्या कवींच्या गोतावळ्यात हल्ली पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात कवितेच्या पुस्तकाचं बारसं होत कविता मात्र बाळसं न धरताच कोनाड्यात झुरत बसते,परवा अश्याच एका थोर कवयित्रीचा काव्यसंग्रह वाचताना आला,त्यात मनोगतात तिने लिहिले होते ,माझी पहिली कविता मला कशी सुचली यावर तिने ढीगभर रामायण लिहिलं होतं,मुळात तुम्हाला कविता सुचण्याचं नेमका काळ,वय अस काही नसतंच...कोणाला ती पंधराव्या वयात सुचते आणि कोणाला ती पन्नासाव्या वयात. मुळात कवीला लिहिलेली पहिली कविता आहे हे कसे कळते,,म्हणजे मी नेमकी कविता लिहिली आहे याची कविंना कुणकुण कशी लागते.मी आजवर लिहिलेल्या कवितेत मला अजून नेमकी कविता सापडली नाही यांना पहिली कविता आणि त्यावर लिखाण म्हणजे कळसचं, कवी अंतर्यामी वगैरे असण्याचा जावईशोध लागण्याचा आज तो काळ माझ्या आयुष्यातला.कधीही पानावर उतरलेली कविता ही पहिलीच कविता असते,मी आजही जी कविता लिहितो ती पहिलीच कविता समजतो, कारण आधीच्या कवितेपेक्षा ही कविता व्यापक वलयांनी अधिक समृद्ध झालेली असते.तसे नसते तर आजवर लिहिलेल्या आणि फाटून शहीद झालेल्या माझ्याच कविता हजार झाल्या आणि दोन हजार झाल्या म्हणून बोंबलत मिरवत बसलो असतो.हजार निरर्थक कविता लिहून एकादीही चांगली नसण्याचा कोडगेपणा नकोच त्या ऐवजी दोन चार कवितेत हजार कवितांचा व्यापकपणा चिरंजीव करता येईल, आज लिहिलेल्या कवितेत मला अजून काहीतरी उणेपणा राहिल्याची सल मनात सलत रहाते आणि इथे लोक पहीलेपणाच्या कश्या बऱ्या कहाण्या रचतात रे देव जाणे....
त्या देवाच्या पृथ्वीवर भयंकर सुखदुखाचा अवीट खेळ आहे ,आणि पहिली कविता ही अश्याच दुःखातून जन्माला आली,पण हल्ली कवितेतून गॅसवर चहा उकळावा तसा प्रेमभंग उकळत असतो तो उसळावाही प्रेमभंग ही मानवी मनाची भावना आहेच आहे पण तो लिहिताना खऱ्या कवितेचा दुभंग न करता ही साकारता यावा,ती सोडून गेली म्हणत चाहूल आणि पाऊल अस लिहून कवितेवर का करावा बलात्कार, आयुष्यात प्रवासात नदी झालेले आपण प्रवाही होतो आणि वहात राहतो,अनेक जिवाभावाची माणसे या प्रवाहाच्या नादात काठावर आली आणि पालं उठवून निघून ही गेली त्यातलं तीच एक हक्काचं मुक्कामाचं गाव पण ते ही पाठी राहिल्याची खुणगाठ मनाशी बांधून प्रवाही व्हावं.
पुरस्कार घेऊन हल्ली प्रसिद्ध ठरणाऱ्या कवींचं तर जोरात भरघोस पीक आहे.अरे पण खऱ्या कवितेला पुरस्कार लागतोच कुठे ती अमर असते,प्रोत्साहनासाठी पुरस्कार जरूर असावेत,पण पुरस्कारासाठी कविता असू नये परवा अश्याच एका राज्यस्तरीय कविता पुरस्काराची बातमी कानी आली,बरं पुरस्कार दिला हॉल नावाच्या कुराड्यात आणि पुरस्काराचे नाव काय तर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार ,असा पुरस्कार घेणाऱ्यांचीही वा आणि तो देणाऱ्यांचीही भयंकर कींव करावीशी वाटते मला.देणाऱ्या संयोजकाला कवितेतलं काही कळत ही नव्हतं हा भाग अलाहिदा.
कविता अमर ठरते पुरस्कार शोभा,हे या पुरस्कारासाठी लिहिणार्यांना का कळत नाही , माणूस साऱ्या जगाला फसवतो पण स्वतःला नाही, याच स्वतःच स्वतःला लिहिऱ्यांनी विचारून सत्याच्या देवतेला बांधलेली काळीपट्टी सोडून खऱ्याचा निकोप न्याय करावा.तो न्यायचं तुमच्या प्रतिभेन झळाळून उठतो.आणि तुमची प्रतिमा अमर करतो. पुरस्कारांवर त्या साहित्यिकांची उंची आणि कवितेचा दर्जा ठरण्याच्या हल्लीच्या काळात पुरस्कारावर कवी मोठे होत नाहीत तर त्यांची कविता मोठी आहे ती तिच्या मायाजाळ शब्दात भलंमोठं आभाळ व्यापते ,म्हणून त्यांना पुरस्कार मिळतात मिळायला हवे हे कळण्याचे शहाणपण कुठल्या सागराच्या तळाशी शिंपल्यांत मोती होऊन बसले आहे काय माहीत.माझ्या कविता लोकांना आवडल्या तर जितीजागती स्मारके उभी रहातील काळाच्या कसोटीवर त्या त्यांच्या भरीवपणामुळे खऱ्या उतरतील त्यांच्या देखाव्यावर नाही.कवी गेल्यावर ही कविता जीवन्त रहातात पुरस्कारांचा कचरा होतो..पडेल भावातला ....
गावातली माझी म्हातारी आजी भाकऱ्या करता करता मला म्हणते,लिव्हतोस नव्ह हल्ली ,तो अमुक तमुक म्हणत होता, एकादी म्हण बघुया बाबा, मी ही एकादी कविता वाचताच बरा लिव्हतोस बाबा , असं जेव्हा म्हणते, तेव्हा येत की हो उमळ्यांचं आभाळ दाटीवाटीने भरून ...हा पुरस्कार जो कोणाच्या वाट्याला येतो तो यायला ही नशीब लागत की रे .
परवा अश्याच एक थोर साहित्यिका समाजसेविका भेटल्या , आता समाज आणि थोर या दोन शब्दांचा चघळून चघळून एवढा चोथा केला आहे लोकांनी की बस रे बस,समाज सेवक समाज सेवक म्हणून त्या शब्दातला समासच काढून टाकला आणि चोरांनाही थोर थोर म्हणून थोर शब्द बिनघोर करून टाकला.तरीसुद्धा मी थोर म्हणतोय उगाच कमी शब्दांची भानगड नको. या समाजसेविका काय म्हणतात मी वर्षाला एक तरी पुस्तक काढतेच काढते म्हटलं दर वर्षी, हो ना माझ्या कविता चांगल्या असतात प्रसिद्ध होतात ,प्रसिद्धी मिळते .मनात म्हटलं प्रसिद्धी मिळत असेलही पण कविता चांगल्या ? असतीलही बुवा पण कवितेच्या गर्भारतेचा काळ कधी जगतात हे कवी.तो सुचण्याचा काळ कधी येतो यांच्या वाट्याला, निसर्गदत्त कविता सुचणे हा मोहर असतो कधी यांच्या अंगणात ;की नुसते ओढून ताणून शब्दांचा किस पाडला जातो.वांझ पणे फक्त लिहिले जातात शब्द .मला अजूनही चांगली कविता लिहिता येतं नाही ,मी लिहितोय ते कवितेच्या गाभाऱ्यापासूनच्या
अगदी शेवटच्या पायरीवरचा फकीर होऊन.....
त्या मोहरलेलल्या फकिरीपणात मला कविता जगायची आणि लिहायची आहे ,कविता जगता जगता लिहीत आणि लिहिता लिहिता जगत आयुष्य नावाच्या प्रवासात मला आभाळाएव्हढा भरगच्च आनंदोस्त्व साजरा करायचा आहे .रस्त्यावरचे कागद वाचता वाचता बालपण गेलं आज त्याच कागदांवर भावनांचे ,जाणीवांचे भावपूर्ण रंग बेहोषीने भरत निघालोय..
हे कविते रंगू दे रंग माझे
हे शब्द ,
तुझ्यात दंग माझे.......
महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक होत असून आता खर्या अर्थाने प्रचारात रंग भ....
अधिक वाचा