By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 07:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत.
ईडीकडून रियाची आज (7 ऑगस्ट) जवळपास पाच ते सहा तास चौकशी होऊ शकते. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते.
रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसोबत ईडी कार्यालयात जाताना दिसली होती. मात्र, काही तासांच्या चौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. यावेळी त्याने प्रसारमाध्यांना कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला.
रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच कंपन्यांसंबंधित कागदपत्रे घेण्यासाठी शौविक तिच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.याआधी ईडीकडून रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची जवळपास 9 तास कसून चौकशी झाली. मिरांडा काल (गुरुवार) दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाला. मिरांडा रियाचे आर्थिक व्यवहार पहायचा. बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे तो करायचा.
रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. रियाला आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.
रियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याने त्याचा तपास आता ईडीचे अधिकारी करत आहेत.
ईडीने आतापर्यंत या प्रकरणात चौघांचे जबाब घेतले आहेत. आधी सुशांतचे सीए संदीप श्रीधर आणि सुशांतच्या एका मित्राचा जबाब घेतला आहे. यानंतर आता रियाशी सबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत. 15 कोटी रुपयांची मनीं लाँड्रिंग कशी झाली, सुशांतच्या बँक खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे गेले आहेत, ती व्यक्ती कोण आहे, याचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत.
दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकसीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग केला आहे. सीबीआयनेही त्यावर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचं रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे.
“प्रत्यक्षात गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यास बिहार पोलिसांकडे कोणताही कायदेशीर आधार नाही. बिहार पोलिसांनी कायदेशीर बाजू असलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडे गुन्हा वर्ग करायला हवा होता. रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्याची दखल घेतली आहे. याचमुळे सुप्रीम कोर्टाने सर्व प्रतिवादीना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे” असे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.
सध्याचा काळ कलाजगतासाठी काही फारसा बरा नाही. मागील काही दिवसांपासून कलाकार....
अधिक वाचा