By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2020 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटामागे काहीना काही वादांचा ससेमिरा सुरु झाला आहे. आता गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या सर्वांवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचा पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे.
‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा होता. परंतु, त्याआधीच हा चित्रपट अडचणीत आला आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे.
कायदेशीर तक्रार दाखल होणार?
आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि हुसेन जैदी यांच्याविरूद्ध महिलांचे आक्षेपार्ह तसेच, एखाद्याचे गोपनीय वैयक्तिक आयुष्य प्रसारित केल्याबद्दल बाबूजी रावजी शाह यांचे वकील फौजदारी तक्रार दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वृत्ताला दुजोरा देताना बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वेश्या कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मानसिक त्रासामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना गंभीर दुखापत झाल्याचा खुलासाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
आलिया भट्ट चित्रीकरणात व्यस्त
दरम्यान, ‘गंगूबाई काठियावाडी’च्या चित्रीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. या चित्रपटात आभिनेत्री आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती जयंतीलाल गडा आणि संजय लीला भन्साळी करत आहेत. आलिया भट्ट व्यतिरिक्त हुमा कुरेशीही या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती एक आयटम साँग करताना दिसणार आहे.
मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परव....
अधिक वाचा