By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई- मराठीतील नावाजलेले कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत बोनस सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं. पोस्टरवरून सिनेमा कशावर भाष्य करेल याचा अंदाज बांधता येत आहे. पोस्टरमध्ये गश्मीर आणि पूजा एका बाकडावर बसलेले आहेत. दोघं एकमेकांशी बोलण्यात गर्क आहेत. गश्मीरच्या बाजूला एक बॅग दिसते. यावरून हा सिनेमा प्रवासाशी निगडीत असेल असा अंदाज बांधला जात आहे. कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा आकार घेतो.
या पोस्टरमुळे या सिनेमाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.बोनस सिनेमापूर्वी गश्मीर महाजनी देऊळबंद, कान्हा, वन वे तिकीट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमांमध्ये दिसला होता. अगदी कमी वेळात गश्मीरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून बोनस सिनेमातूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.पूजानेही अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. आतापर्यंत पूजाने दगडी चाळ, वृदांवन, पोश्टर बॉइज, लपाछपी, जंगली या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
'बोनस' सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ भावेने केलं आहे. सौरभची ओळख ही प्रख्यात कथा आणि पटकथा लेखक अशी आहे. त्याने आतापर्यंत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. आपल्या या आगामी सिनेमाबद्दल बोलताना सौरभ म्हणाला की, 'बोनस म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. काहींना आयुष्यात चांगला बोनस मिळतो तर काहींना काहीच मिळत नाही.'
सौरभ पुढे म्हणाला की, बोनस ही एका अशा मुलाचा आनंद प्रवास सांगणारी गोष्ट आहे ज्यात नायक स्वतःचे अनुभव जगासोबत शेअर करत असतो. हे अनुभव शेअर करताना कळत नकळतपणे त्याचं आयुष्य आणि विचार करण्याची पद्धत बदलते. ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेला हा सिनेमा २८ फेब्रुवारी २०२० रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा बहुचर्चित 'छपाक&....
अधिक वाचा