By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’ इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ यांचा आहे. राजमाता जिजाऊंची यशोगाथा म्हणजेच ‘जिऊ’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या आयुष्यावर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. या चित्रपटाचे नाव ‘जिऊ’ असे आहे. फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत ‘जिऊ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस.के. पाटील करीत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
तसेच अनुजा देशपांडे यांचा ‘जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून ह्या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यास करून ‘जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. तर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा ‘जिऊ’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील उत्सुक आहेत.
अनुजा देशपांडे सांगतात, “महिलांच्या हाती केवळ पाळण्याचीच नाही तर संपूर्ण राज्याच्या जडणघडणीची दोर देखील सक्षमपणे सांभाळण्याची ताकद आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणारी ही आई आपल्या लेकींना सांगू पाहतेय उठा.. सज्ज व्हा.. स्वालंबी व्हा…प्रगतीची नवी दालनं शोधा.” त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाचे पोस्टर पाहूनच चित्रपट कसा असेल याची उत्सुकता लागली आहे.
मुंबई : आपण चित्रपट पाहण्यासाठी सेनेमाघरात किवा आपल्या घरच्या ....
अधिक वाचा