By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी एशियाई विकास बँकेने (एडिबी) केंद्र सरकारला 1 हजार 440 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कर्ज रूपात उपलब्ध होणा-या निधीतून राज्याच्या 34 जिल्हयांतील ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहे.
येथील नॉर्थ ब्लॉक स्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात राज्यातील ग्रामीण रस्ते सुधारणांकरिता एशियाई विकास बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये 1 हजार 440 कोटींच्या कर्जाच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. एडिबी बँकेचे भारतातील वरिष्ठ अधिकारी सब्यासाची मित्रा आणि केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव समीर खरे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या.
यासोबतच केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव वॉल्टर डी मेलो, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण किडे यांच्यामध्ये प्रकल्प करारावर स्वाक्ष-या झाल्या.
या करारामुळे राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होऊन या भागातील शेती उत्पादकता वाढेल. पर्यायाने शेतकरी कल्याण साधण्यास मदत होईल व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव समीर खरे यांनी यावेळी सांगितले.
34 जिल्ह्यांतील 2 हजार 152 किमी रस्त्यांचा सुधार
राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे असून एकूण रस्त्यांपैकी दोन तृतियांश रस्ते हे ग्रामीण भागातील आहेत. या करारानुसार राज्याच्या 34 जिल्हयातील 2 हजार 152 किलो मीटर लांबीच्या 799 रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सर्व ऋतुंमध्ये उपयुक्त ठरतील असे बनविण्यात येणार आहेत. मुख्यत्वे पावसाळयात या रस्त्यांवरून विना अडथळा व सुलभरित्या दळण-वळण करता येणार आहे. रस्ते सुधारांमध्ये सुरक्षा हा केंद्रबिंदू असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे वित्तीय नियंत्रक सुनिल मोने यांनी दिली.
आजच्या करारासोबतच, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवेळी रस्ते व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, सर्व ऋतुपूरक बांधकाम प्रारूप आणि वेब आधारीत प्रकल्प देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेला 1 दशलक्ष डॉलर्सचा तांत्रिक सहायता निधी कर्जस्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्तावि....
अधिक वाचा