By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 11, 2021 11:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : परभणी
परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्याने परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, असं राज्याचे पशुसंवर्दन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.
खड्ड्यात केमिकल टाकून कोंबड्या मारणार
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत. कोंबड्या मारण्यासाठी पाच फुटाचा खड्डा खोदण्यात येणार येईल. त्यात केमिकल्स टाकून कोंबड्या मारण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
या जिल्ह्यांना धोका
नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील कोंबड्यांचे सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी वर्तवली.
वाऱ्यावर सोडणार नाही
राज्याने 2006मध्येही बर्ड फ्ल्यूचं संकट पाहिलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत केली होती. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही अर्थ व्यवस्था डबघाईला जाऊ देणार नाही. पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रयोगशाळेची प्रतिक्षा
बर्ड फ्ल्यूचं निदान करण्याची प्रयोगशाळा महाराष्ट्रात आहे. पुणे आणि नागपूर येथील या प्रयोगशाळांना केंद्राने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भोपाळला नमुने पाठवले जात आहेत. कोरोना संकट काळात लॅब उघडण्यासाठी जशी केंद्राने परवानगी दिली होती, तशीच परवानगी आता बर्ड फ्ल्यूचं निदान करण्यासाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय नौदलातील एका जवानानं INS बेतवावर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक प्रक....
अधिक वाचा