By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरुन आता नवा वाद उभा राहिला आहे. निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धर्मदास यांनी गुरुवारी गृहमंत्रालयाला एक नोटीस बजावली आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेली नाही, ती अवैध असल्याचं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय. तंसच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या ट्रस्टची निर्मिती आणि नियंत्रण असावं, अशी मागणीही महंत धर्मदास यांनी केली आहे.
निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी राम मंदिर ट्रस्टची स्थापना अवैध असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध, मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचं महंत धर्मदास यांनी नोटीसमध्ये म्हटलंय. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करु, असा इशाराही देण्यात आला आहे.
राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संत समाजाच्या इच्छेनुसार झालेली नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आणि संपत्ती हडपण्यासाठी या ट्रस्टची निर्मिती झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपल्याला या ट्रस्टमध्ये का घेण्यात आलं नाही? असा सवालही धर्मदास यांनी केला आहे.
‘राजकारणाशी संबंध असलेल्यांना संधी’
जे लोक 1949 पासून टायटल सूट प्रकरणात सुनावणी करत होते, त्यांना ट्रस्टमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं नाही. पण जे लोक 1989 नंतर त्यात सहभागी झाले त्यांना ट्रस्टमध्ये घेण्यात आलं. कारण, त्यांचा मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहे, असाही आरोप महंत धर्मदास यांनी केला आहे.
गुरु बाबा अभिराम दास हे 1949 पासून रामललाचे पुजारी होते. त्यांच्या परिवारातील कुणालाही ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आलं नाही, असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. अनुसूचित जातीतील सदस्याला ट्रस्टी बनवून हिंदूंमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सातत्यानं झाल्याचा आरोप मंहत धर्मदास यांनी केला आहे. हे एका राजकीय अजेंड्याप्रमाणे करण्यात आल्याचंही महंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं आहे. आता राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्याव....
अधिक वाचा