By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी - पुलाच्या बांधकामासाठी नदीत खोदकाम करताना गणपतीची प्राचीन मूर्ती सापडली आहे. डावी सोंड असलेली आणि एका हातात परशू असलेली गणपतीची ही मूर्ती शेकडो वर्षे पुरातन असावी, असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे. गणेश मूर्ती पाहण्यासाठी पंचक्रोषीतील नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र, नेमकी ही मूर्ती नदीत कशी आणि कुठून आली याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तर या मूर्तीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कोकणातल्या राजापूर तालुक्यात रायपाटण हे गाव आहे. या गावाशेजारून अर्जूना नदी वाहते. याच गावातल्या बागवाडी, कदमवाडी, खाडेवाडी, आणि बौद्धवाडी या चार वाड्या नदीपलीकडे आहेत. याच चार वाड्याना रायपाटणशी जोडणाऱ्या पुलाचे काम सध्या सुरु आहे. पुलाच्या खांबांसाठी नदीपात्रात खोदकाम सुरु असताना जेसीबी मशीन ऑपरेटला बकेटमधून मातीसोबत एक पाषाण वर आलेला दिसला.
इतर दगडांप्रमाणे हा दगड नसून हे काहीतरी वेगळं आहे, हे जेसीबी मशीन ऑपरेटरच्या लक्षात आले. त्याने लगेच उत्खननाचे काम थांबवले आणि खाली उतरून दगड निरखून पाहायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की, हा नुसता दगड नसून ती कोणत्यातरी देवतेची मूर्ती आहे. त्याने मग आजूबाजूला असलेल्या आपल्या साथीदार कामगारांना बोलावले. सगळ्यांनी मिळून त्या पाषाणावरची माती दूर केली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही गणपतीची मूर्ती आहे.
मग या सर्वांनी गावकऱ्यांचा कानावर ही बाब घातली. गावकरी गोळा झाले आणि त्यांनीही ही मूर्ती गणेशाची आहे. याची खातरजमा केली. ही मूर्ती सध्या त्याच नदीकिनारी ठेवण्यात आली आहे. डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची उंची 16-17 इंच आहे. मूर्तीच्या एका हातात परशू आहे. ही मूर्ती प्रत्यक्षात काळ्या दगडाची असावी आणि बरीच वर्षे जमिनीखाली राहिल्यामुळे तिचा रंग फिका पडला आहे.
पण मूर्ती नेमकी नदीत कुठून आली याबाबत आता अनेक अंदाज बांधले जात आहेत. रायपाटण गावाची एकूण भौगोलिक रचना लक्षात घेता, इथे अर्जूना नदीच्या परिसरात शेकडो वर्षांपूर्वी एखादे गणपतीचे मंदिर असावे आणि मूर्तीभंजनाच्या काळात आक्रमकांकडून या मूर्तीचं रक्षण करण्यासाठी त्याकाळात ती नदीपात्रात लपवून ठेवली गेली असेल का? अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.
अथवा फार वर्षांपूर्वी या भागात मोठा पूर आला असावा, पुराच्या लोंढ्यात ही मूर्ती नदीपात्रात वाहून आली असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही मूर्ती किती पुरातन असावी, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पुरातत्व आणि भूगर्भ अभ्यासकांसाठी आता ही मूर्ती म्हणजे एक संशोधनाचा विषय ठरली आहे
मुंबई - भारतीय-अमेरिकन वंशाचे 'गुगल' आणि 'अल्फाबेट'....
अधिक वाचा