By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2020 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचं भाजप सदस्यांचे म्हणणं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने मात्र विरोधकांच्या या सर्व आरोपाचे खंडन केलं आहे. असं असलं, तरी साहित्य खरेदीवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आता 16 हजारांचा टप्पा ओलांडला असून कोरोना बळींची संख्या देखील 500 पर्यंत जाऊन पोहचली आहे. एका बाजूला जिल्ह्यात अशी गंभीर स्थिती असताना जिल्हा परिषदेने कोरोना काळात केलेली साहित्य खरेदी चर्चेचा विषय बनली आहे. कारण, या साहित्य खरेदी 30 ते 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी भाजपच्या सदस्यांनी केला आहे.
साहित्य खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरुन हा ढपला पडल्याचं भाजप सदस्यांच म्हणणं आहे. विरोधकांचा हाच आरोप काल झालेल्या सर्वसाधारण सभेच्यावेळी कळीचा मुद्दा बनला. विरोधकांना सभागृहात यायला मज्जाव केल्याने भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात बाहेरच निषेध व्यक्त केला.
कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, पल्स ऑक्सिमिटर, व्हेंटिलेटर असंच सगळं साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप करत याची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडी न मात्र भाजप आणि मित्र पक्षांना केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. कोणतीही खरेदी बेकायदेशीर किंवा चढ्या दराने केले नसल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. इतकंच नाही, तर विरोधकांकडून होणारे आरोप सिद्ध झाल्यास पदांचा राजीनामा देण्याची तयारी ही या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मार्च ते मेपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मग, या काळात मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी का केली? कोट्यावधीची साहित्य खरेदी असतानाही रुग्णांना बेड मिळत नसल्यानं मरावं का लागतंय? खरेदी केलेलं साहित्य नेमकं कोणाच्या खिशात गेलं?, असे अनेक प्रश्न आता भाजपने उपस्थित करत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे.या सगळ्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप आणि मित्रपक्षांनी लावून धरल्याने ऐन कोरोना रुग्ण वाढीच्या काळात जिल्हा परिषदेतील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
बुधवारी संध्याकाळी माटुंगा येथे राहणारे 41 वर्षीय प्रसिद्ध चित्रकार राम का....
अधिक वाचा