By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान 12 मे रोजी होत आहे. या टप्यात दिल्लीतील मतदारसंघांचा समावेश आहे. परंतु, या मतदानापूर्वीच भाजप आणि आम आदमी पक्षात जोरदार वाकयुद्ध सुरु झाले आहे. एकमेकांवर आरोप करण्याच्या नादात दोन्ही पक्षांचे नेते पातळी सोडून वक्तव्य करत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर आणि आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरने पाठविलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या नोटीसीवरुन ‘तू भडकावू भाषणातून अब्रुनुकसानीच्या दाव्याची धमकी दे’ अशी टीका गंभीरवर केली आहे. भाजपनेही आपल्या ट्विटरवरुन सिसोदिया यांना तसेच उत्तर दिले आहे.
आतिशी मार्लेना विरोधात गंभीरने पत्रके काढून अतिशय गलिच्छ दर्जाची भाषा वापरल्याचा आरोपा केल्यानंतर गंभीरने सिसोदिया, अतिशी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावरुन सिसोदिया यांनी गंभीरवर टीका केली. “गौतम गंभीर चोरी आणि सिनाजोरी? अशा हरकतींसाठी तू माफी मागितली पाहिजे, उलट तू अब्रुनुकसानीच्या दाव्याची धकमी देत आहेस, उलटा चोर कोतवाल को डाटे? अब्रुनुकसानीचा दावा आम्ही दाखल करु, तुझी हिम्मतच कशी झाली अशी पत्रके वाटण्याची आणि बिनलाज्यासारखे मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप करण्याची.” अशी टीका सिसोदिया यांनी आपल्या ट्विटरवरुन केली आहे.
सिसोदिया यांच्या या टीकेलाही भाजपने जशास तसे उत्तर दिले. भाजपने ट्विट करुन म्हटले आहे की, “लाजेची गोष्ट तू तर करुच नको, थुकून चाटण्याची तुमची सवयच आहे, या आधीही तुम्ही अशा हरकती अनेक वेळा केल्या आहेत. तुम्ही मतांसाठी एवढ्या खालची पातळी गाठली आहे, याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागणार आहे. यावेळी तुम्ही वाचणार नाही आणि यावेळी माफीही होणार नाही.”
गौतम गंभीरने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आप उमेदवार आतिशी मार्लेना यांना अब्रुनुकसानीचे नोटीस पाठवली आहे. गंभीरने आतिशी यांच्या विरोधात अपशब्द वापरुन पत्रके वाटली आहेत. असा आरोप आपने केला आहे. आपच्या या आरोपांमुळे चिडलेल्या गंभीरने म्हटले आहे की, “आपचे हे आरोप खरे ठरले तर मी माझी उमेदवारी मागे घेतो.”
गुरुवारी आतिशी मार्लेना आणि मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिषी विरोधात पत्रके वाटल्याचा आरोप गंभीरवर केला आहे. या पत्रकातील मजकूर वाचून अतिशी मार्लेना यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले. दरम्यान गंभीरनेही आपच्या या आरोपांना उत्तर देत अनेक ट्विट केली आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत गुगमाल राष्ट्रीय उद्यानात पाण्याच्या डोह....
अधिक वाचा