By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2020 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेची सुरुवात राज्यात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देखील कारवाई तीव्र केली आहे. 20 एप्रिल ते 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 234 मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यात आलीय. यात तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. आता 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 (दोनशे रुपये) करण्यात आला आहे.
यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबईत 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यामध्ये 200/- रुपये दंडाची रीतसर पावतीही नियम मोडणाऱ्याला देण्यात येत आहे. त्यामुळे 'मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर 200 रुपये भरा!' असा इशाराच पालिकेने या कारवाईतून दिला आहे.
13 सप्टेंबरपासून 9 हजार जणांवर कारवाई
मुंबईत 20 एप्रिल ते 12 सप्टेंबर या कालावधीत 4989 जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 33 लाख 68 हजार 500 रुपयांची वसुली केली आहे.
तर दंडाची रक्कम 200 रुपये केल्यानंतर 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 9 हजार 245 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 19 लाख 13 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अंधेरी, विले पार्ले, जोगेश्वरीत सर्वाधिक कारवाई
पालिकेच्या के/पश्चिम म्हणजेच अंधेरी, विले पार्ले आणि जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 918 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 21 हजार 200 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
गाडी चालवताना खोटे कागदपत्र दाखवून ट्रॅफीक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकत....
अधिक वाचा