By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2020 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एखाद्या पुरुषाला दोन पत्नी असतील आणि दोघीही त्याच्या पश्चात मिळणाऱ्या भरपाईसाठी दावा करत असतील, तर फक्त पहिली पत्नीच त्यासाठी पात्र ठरेल. परंतु दोन्ही विवाहापासून झालेली अपत्ये यातील रक्कम मिळवू शकतात, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने याआधी अशाच प्रकारचा निर्णय दिल्याचे राज्य सरकारने सांगितल्यावर न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवले.
कोविड19 च्या संसर्गाने 30 मे रोजी निधन झालेल्या महाराष्ट्र रेल्वे पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांच्या दुसर्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती काठावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली. राज्य सरकारच्या ठरावानुसार कर्तव्य बजावत असताना कोविड19 ने मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना 65 लाख रुपये नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
सुरुवातीला दोन महिलांनी आपण हातणकर यांची बायको असल्याचा दावा केला होता. नंतर हातणकर यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी श्रद्धानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्याला आणि आपल्या आईला उपासमारी आणि बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी भरपाईच्या रकमेचा सम प्रमाणात वाटा मिळावा, अशी विनंती तिने केली.त्यावर कोर्टाने म्हटले की, “कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीला काहीही मिळणार नाही. परंतु पहिली पत्नी आणि पहिल्या लग्नातील मुलगी यांच्यासोबतच दुसऱ्या पत्नीची मुलगीही याची हकदार असेल.”
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात उपस्थित असलेल्या हातणकर यांची पहिली पत्नी शुभदा आणि मुलगी सुरभी यांनी दावा केला की, हातणकर यांना “दुसरे कुटुंब” असल्याची माहिती त्यांना नव्हती. परंतु श्रद्धाचे वकील प्रेरक शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की, “सुरभी आणि शुभदा यांना हातणकर यांच्या दोन लग्नांबद्दल माहिती होती, त्यांनी आधीही सुरभीशी फेसबुकवर संपर्क साधला होता.”
शर्मा म्हणाले की, हातणकर हे त्यांची दुसरी पत्नी व मुलीसह धारावीतील रेल्वे पोलिस क्वार्टरमध्ये राहत होते. हातणकर यांनी 1992 मध्ये प्रपहिले, तर 1998 मध्ये दुसरे लग्न केले होते.
श्रद्धाने आपल्या याचिकेत कोर्टात सांगितले की, दोन्ही विवाह रजिस्ट्रारकडे हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदवले गेले आहेत. हातणकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे अपत्य असल्याने आपल्यालाही कौटुंबिक पेन्शन आणि मृत्यू/सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटीचा हक्क असल्याचा दावा तिने केला.
मराठा आरक्षण प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी ....
अधिक वाचा